वसई: वसई विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेने सादर केलेल्या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. सोमवारी पालिकेने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. यात २९ प्रभाग असणार आहेत. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. वसई विरार महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध केला होता. मुदतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत महापालिकेकडे १६० हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या होत्या. विशेषतः यात २९ गावांतील दोन हजाराहून अधिक नागरिकांच्या सामूहिक हरकतींचा ही समावेश होता.

प्राप्त हरकती व सूचनांवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या सभागृहात सुनावणी पार पडली होती. यावेळी १६० हरकतदारांपैकी १५४ हरकतदार उपस्थित होते. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी ३ ऑक्टोबर रोजी वसई विरार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिकेने सादर केलेल्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिल्याचे पत्र नगरविकास विभागाला दिले आहे. त्यानुसार पालिकेने सोमवारी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात साधारणपणे ३८ ते ४७ हजार इतकी लोकसंख्या असणार आहे. यात २८ प्रभाग हे ४ सदस्यांचे तर एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असणार आहे. २९ प्रभागात ११५ नगरसेवकांसाठी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. 

२९ गावे पालिकेतच

वसई तालुक्यातील २९ गावे महापालिका क्षेत्रातून वगळण्या ची मागणी संबंधित गावांमधील २ हजारांहून अधिक नागरिकांनी केली होती. या मागणी पत्रासोबतच पालिकेने २९ गावे पालिका क्षेत्रात सामाविष्ट करून तयार केलेल्या प्रभाग रचनेवर सुद्धा याच नागरिकांकडून हरकत नोंदविण्यात आली होती. या संदर्भात सुद्धा सुनावणी घेण्यात असून निवडणूक आयोगाने सदर हरकती फेटाळल्या आहेत. परिणामी अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि नागरी भाग अशा वादात अडकलेल्या २९ गावांचा समावेश अखेर वसई विरार पालिकेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रभाग क्रमांक ४ आणि १३ च्या हद्दीबाबत निर्णय

पालिकेने प्रारूप प्रभाग रचनेमध्ये सर्व प्रभागांची हद्द निश्चित केलेली आहे. प्रभाग क्रमांक ४ आणि १३ च्या हद्दींसंदर्भात दाखल झालेल्या हरकतींवर आयोगाने निर्णय दिला आहे. त्यानुसार पालिकेकडून बदल करण्यात येणार आहे. तारवाडी नाल्याकडील परिसर प्रभाग क्रमांक १० मधून प्रभाग क्रमांक ४ मध्ये सामाविष्ट करण्याऐवजी सदर हद्द प्रारूप प्रभाग रचेनमध्ये प्रसिद्ध केल्यानुसारच ठेवण्यात यावी असा निर्णय आयोगाने दिला आहे. तसेच प्रभाग क्रमांक १३ च्या कळंब व वाघोली या गावांच्या सीमेवर असलेली हद्द प्राधिकृत अधिकारी यांनी प्रास्तावित केल्यानुसार सुधारित करण्यास हरकत नाही असे मत आयोगाने नोंदविले आहे. विशेष म्हणजे हद्दींचे विभाजन करताना पालिका क्षेत्रातील मतदार वगळले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत सुद्धा आयोगाने सूचना केली आहे.

राजकीय हालचालींना वेग

वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २०२० च्या जुलै महिन्यात संपुष्टात आली होती. मात्र करोनाच्या संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली. पाच वर्षांनंतर निवडणूका होणार असल्याने राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे .