वसई : वसई विरार शहरात गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या गुन्हे शाखा २ च्या पथकाने उध्वस्त केल्या आहेत. यात ३० लाखांच्या दारूचा मुद्देमाल नष्ट करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वसई विरार शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने जंगल परिसर व कांदळवन भागात दारूच्या हात भट्ट्या लावल्या जात आहेत. अशा बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली आहेत. नुकताच नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गस्तीवर असताना पाणजू बेटावर बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारु निर्मिती करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
पोलीस निरिक्षक अविराज कुराडे यांच्या पथकाने ८ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास पाणजू बेटावर छापा टाकला. त्यावेळी व्दारकानाथ पाटील व पुंडलिक म्हात्रे हे दोघे गावठी दारु तयार करण्याचे साधन सामग्रीसह दारु निर्मीती करीत असतांना आढळून आले. छापा कारवाई दरम्यान १५० लीटर गावठी तयार दारु, १६२ ड्रम्समध्ये ३२ हजार ४०० लीटर वॉश, सत्तेले व इतर सामग्री असा १७ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत व्दारकानाथ पाटीलला (५०) ताब्यात घेतले. त्याचा सहकारी पुंडलिक म्हात्रे घटनास्थळावरुन पळून गेला.
तसेच दुसऱ्या पथकाचे प उपनिरीक्षक संतोष घाडगे यांनी पोलीस पथकासह छोटे पाणजू बेटावर (भाईंदरची खाडी) छापा टाकला. त्यावेळी सदर ठिकाणी तुषार पाटील (३४) हा गावठी दारु तयार करण्याचे साधन सामग्रीसह दारु निर्मीती करीत असतांना मिळून आला. या कारवाई दरम्यान ९० लीटर तयार गावठी दारु, ११९ ड्रम्समध्ये २३ हजार ८०० लीटर वॉश, सत्तेले व इतर सामग्री असा १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. असा एकूण ३० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, मनोज मोरे, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, राहूल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे आदींच्या पथकाने केली आहे.