वसई: १ जूनपासून वसई विरार महापालिकेने महिलांना बससेवेत ५० टक्के सवलत लागू केली आहे. या सवलतीच्या बस प्रवासाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून अवघ्या महिनाभरातच ९ लाख १५ हजार ४०७ इतक्या महिलांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे.
वसई विरार शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाकडून शहरातील ३६ मार्गांवर बससेवा पुरवली. दररोज ५० ते ६० हजार प्रवासी या बसमधून प्रवास करतात. ज्यात मध्यमवर्गीय, नोकरदार महिला तसेच शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. १ जून रोजी महापालिकेकडून बसने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटाच्या किंमतीत ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या या घोषणेनंतर बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात तब्बल ९ लाख १५ हजार ४०७ महिलांनी प्रवास केला आहे. म्हणजे दिवसाला सरासरी ३० हजार महिला बसने प्रवास करत असल्याचे समोर येत आहे.
सुरवातीला परिवहन सेवेच्या बसमधून सरासरी २४ ते २५ हजार महिला प्रवास करीत होत्या. सवलत लागू झाल्यानंतर प्रवासी महिलांची संख्या चार ते पाच हजारांनी वाढली असल्याचे परिवहन बस व्यवस्थापक रवी किरण शेरेकर यांनी सांगितले आहे. शहरातील नागरिकांना चांगली परिवहन सेवा उपलब्ध व्हावी असा परिवहन विभागाचा प्रयत्न असतो असे पालिकेचे परिवहन विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले आहे.
महापालिकेने महिलांना बस प्रवासात दिलेल्या या सवलतीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास अर्ध्या किंमतीत करणं शक्य झालं आहे. दैनंदिन बसप्रवास करणाऱ्या महिलांसाठी हा निर्णय अत्यंत उपयोगाचा ठरला आहे, असे मत अश्विनी काळे यांनी व्यक्त केले. तर बसप्रवासात मिळालेल्या या सवलतीमुळे रिक्षाने होणारा महागडा प्रवास बराच आटोक्यात आला असल्याचे प्रणाली सूर्यवंशी यांनी सांगितले.
वेळेस बस येत नसल्याची तक्रार
एकीकडे सवलतीमुळे बस प्रवास सुखकर झाला असला तरी, दुसरीकडे वेळापत्रकाच्या कोलमडलेल्या अवस्थेमुळे काही महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा बराच वेळ थांबूनही बस वेळेत न आल्याने, बससाठी लागलेल्या लांबच लांब रांगा, गर्दी आणि घरी पोहोचण्याची घाई यामुळे महिलांना नाईलाजाने जास्तीचे पैसे देऊन रिक्षाने प्रवास करावा लागतो. विशेषतः पावसाळा सुरू झाल्यापासून बस उशिरा येण्याची समस्या अधिक गंभीर बनल्याचे महिला प्रवाशांचे म्हणणे आहे.