वसई: गेल्या काही काळात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसईच्या बाजारात होणारी भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, ३० ते ४० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. वाढती महागाई आणि त्यात वाढलेल्या भाजीच्या दरामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

वसईत होळी, अंबाडी, पापडी आणि निर्मळ अशा विविध ठिकाणी भाजी बाजार भरतो. यापैकी होळी आणि अंबाडीच्या बाजारात नाशिक बाजार समीतीतून भाज्यांची आवक होते. तर निर्मळ आणि पापडीमध्ये नाशिक बाजार पेठ तसेच स्थानिक विक्रेत्यांकडून पिकवला जाणारा भाजीपाला देखील उपलब्ध असतो. या बाजारातून दररोज बरेच नागरिक भाजी खरेदी करतात पण, जून-जुलै महिन्यात ३० ते ४० रुपयांनी वाढलेल्या भाजीच्या दरांमुळे नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

मटारच्या भाजीने शंभरी पार करीत २०० ,रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. तर भेंडी, गवार, शिमला मिरची, वांगी या भाज्यासुद्धा ८० ते १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. पालेभाज्यांच्या दरातही १० ते २० रुपयांची वाढ झाली असून मेथी, पालक, मुळा, शेपू या पालेभाज्यांची एक जुडी ३० रुपये दराने विकली जात आहे. अळू सारखी हंगामी भाजीसुद्धा महागली असल्याचे निदर्शनास आले आहे. आलं आणि लसणीच्या दरांनीही शंभरी पार केली आहे. तर कोथिंबीर, मिरची, कांदे, बटाटे, टोमॅटो यांच्या स्थिरावलेल्या दरांमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय.

बाजारसमीतीतून येणारी भाजीची आवक अशीच घटत राहिली तर भाज्यांचे दर अजून वाढण्याची शक्यता स्थानिक भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे भाजीच्या वाढलेल्या दरामुळे दैनंदिन बजेट कोलमडल्याचं खरेदीदारांचं म्हणणं आहे.

भाजी पुरवठा कमी झाल्याने वाढ

मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. वेळेआधी पडलेल्या या पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे तसेच, काही ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी होणारा भाजीपाल्याचा पुरवठा तुलनेने कमी झाला आहे.

भाज्यांचे दर (रुपये प्रति किलो )

फरसबी -आधीचे दर ८०रुपये प्रति किलो, आताचे दर १२० रु. प्रति किलो
भेंडी – आधीचे दर ८०, आताचे दर १२०
मटर – आधीचे दर १५०, आताचे दर २००
वांगी – आधीचे दर ५०, आताचे दर ८०
शिमला मिरची – आधीचे दर ४०, आताचे दर ८०