विरार : शहरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. विरारच्या आगाशी गावातील पेशवेकालीन भवानी शंकर मंदिरात सोमवारी अष्टमीनिमित्त उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी साकारण्यात आली होती. यावेळी देवीचा जागर करण्यात आला. महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने भवानी शंकर मंदिरात भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
विरार पश्चिमेला आगाशी गाव असून या गावात ऐतिहासिक असे पेशवेकालीन भवानी शंकर मंदिर आहे. या मंदिरात गेल्या ७५ वर्षांपासून नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी साकारण्याची परंपरा आहे. सध्या आगाशी महिला मंडळाकडून ही परंपरा सुरु असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण समाजातील काही कुटुंबात ही उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी साकारून कुळधर्म पाळला जातो. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे स्त्रिया हे व्रत करतात.
वसईच्या मोहिमेवेळी चिमाजी आप्पांच्या सोबत कोकणातून अनेक कोकणस्थ कुटुंब वसईत आणि आगाशीत येऊन स्थायिक झाली. इथल्या मातीशी एकरूप झालेल्या या कुटुंबांनी आजही आपल्या परंपरा जपल्या आहेत. तांदळाच्या पिठाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा साकारून तो साच्यावर बसवून त्याची वस्त्रालंकारांनी पूजा केली जाते. मुखवटा तयार करण्याचे काम संध्याकाळी सुरु होते. यासाठी १ किलो तांदळाची उकड काढून त्यापासून मुखवटा साकारण्यात येतो. विशेष म्हणजे हा मुखवटा पुरुषच साकारतात. आगाशी गावातील श्री गणेश दर्शन कला केंद्राचे लेलेबंधू गेल्या साठहून अधिक वर्षे हा सुबक मुखवटा साकारत आहेत अशी माहिती मूर्तिकार सारंग लेले यांनी दिली.
आगाशी गावच्या पंचक्रोशीत ही उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी ‘पिठाची देवी’ म्हणून प्रसिद्ध असून यावेळी भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. पारंपरिक गीते, आरत्या, भजन तसेच देवीपुढे घागर फुंकण्याचा प्रघात आहे. यावेळी महिलांकडून घागरीमध्ये फुंकर मारून तसेच घागर देवीपुढे नाचवित नृत्य केले जाते. रात्री १२ नंतर या देवीची आरती करून तिचे विसर्जन केले जाते.
गेल्या ७५ वर्षांपासून हा महालक्ष्मी उत्सव आगाशीत सुरू आहे. आगाशी महिला मंडळाकडून गेली ३५ वर्षे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात. – सुरेखा बर्वे, आगाशी महिला मंडळ