वसई:– मुंबई रेल्वे विकास महामंडळाने विरार ते डहाणू या ६४ किमी मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू केले आहे. त्याच प्रकल्पाच्या विस्ताराचा भाग म्हणून आता रेल्वे मार्गिकेच्या दरम्यान सात नवीन रेल्वे स्थानकांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे येथील भागातील प्रवास अधिक सुखकर होईल असा दावा रेल्वेने केला आहे. मात्र मागील काही वर्षांपासून निवडणूकीच्या तोंडावर अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

मागील काही वर्षांपासून पालघर जिल्ह्याचा परीसर हा झपाट्याने विकसित होत आहे. पालघरच्या विविध ठिकाणच्या भागातून पश्चिम रेल्वेवरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. सध्या विरार आणि डहाणू रोड दरम्यान वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर आणि वाणगाव ही फक्त नऊ स्थानके आहेत.स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. विरार मधून साधारपणे ५ ते ६ लाखाहून अधिक प्रवासी आणि डहाणूमध्ये अडीच लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. याशिवाय वैतरणा आणि बोईसर या स्थानकातूनही प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एम आर व्हीसी) या विरार ते डहाणूरोड या ६४ किमी मार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ३ हजार ५७८ कोटी रुपये इतका निधी प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे. जून २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत ४१ टक्के काम पूर्ण झाले आहे. याच प्रकल्पांच्या विस्ताराचा भाग म्हणून विरार ते डहाणू या दरम्यान सात नवीन रेल्वे स्थानिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यात वाढीव, सरतोडी, माकुणसार, चिंतुपाडा, पांचाळी, वंजारपाडा, बीएसईएस कॉलनी अशा स्थानिकांचा समावेश आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि आवश्यकतेनुसार नवीन स्थानके टप्प्याटप्प्याने विकसित केली जाणार आहेत असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न

पालघर आणि बोईसर सारखी औद्योगिक केंद्रे वेगाने वाढत आहे. याशिवाय विविध प्रकल्प ही याच भागात उभे राहत असल्याने या भागाला विशेष महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. आगामी काळात नव्याने तयार होणारे थांबे प्रवासी वर्ग व विद्यार्थी यांना दिलासादायक ठरतील असा दावा रेल्वेने केला आहे.

निवडणुकांच्या तोंडावर घोषणाबाजी ?

विरार आणि डहाणू दरम्यान सात नवीन स्थानकां बद्दल सातत्याने घोषणा केली जात आहे. मात्र अजूनही ठोस कोणत्याही प्रकारची उपाययोजना आखली नाही. निवडणूकांच्या तोंडावर नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी अशा घोषणा पुन्हा पुन्हा केल्या जात असल्याचा आरोप येथील प्रवाशांनी केला आहे.अजूनही येथील चौपदरीकरण नऊ वर्षात केवळ ४० टक्के झाले आहे तर उर्वरित काम कधी पूर्ण होईल असा प्रश्न वैतरणा डहाणू प्रवासी सेवा भावी संस्थेचे हितेश सावे यांनी उपस्थित केला आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटाव्या यासाठी आम्ही सातत्याने रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत आहोत.असेही त्यांनी सांगितले आहे.