वसई : विरारच्या रमाबाई अपार्टमेंट या इमारतीच्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या वारसांना शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केली होती. ५० दिवसांनंतर वसई तहसीलदार कार्यालयातून या मदत निधी वाटपाला सुरुवात झाली आहे.

२६ ऑगस्ट रोजी विरारच्या विजय नगर येथील वरील इमारत दुर्घटनेत १७ जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला व ९ जण गंभीर जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात ही दुर्घटना घडल्याने राज्यात याचे पडसाद उमटले होते. या इमारतीत राहणारे सर्वसामान्य नागरिक होते. आयुष्याची जमापूंजी साठवून त्यांनी घरे घेतली होती. मात्र विकासकाने अनिधिकृत आणि निकृष्ट बांधकाम केले होते. त्याचा फटका रहिवाशांना जीवावर बेतला. १७ निरपराध इमारतीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सरकारी मंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन रहिवाशांना सहानभूती दर्शवली. मदतीचे आश्वास दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी ५ लक्ष रुपये आणि जखमींना विनामूल्य उपचार देण्यात येतील अशी घोषणा केली होती. मात्र सव्वा महिना उलटून गेला तरी मयताच्या नेतावाईंकांना नुकसान भरपाई मिळालेली नव्हती. जाहीर करण्यात आलेली मदत मिळावी अशी मागणी नातेवाईकांमधून करण्यात येत होती. अखेर त्यांच्या वाटपाला वसईच्या तहसील विभागाकडून सुरवात करण्यात आली आहे.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून मयतांच्या वारशांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्यात आली आहे. मदतीचे धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. त्यांच्या वारसांची पडताळणी करून त्यांच्या धनादेशाचे वाटप सुरू केले आहे. आतापर्यंत १७ पैकी ११ जणांना मदतीचे धनादेश दिले आहेत. उर्वरित धनादेश ही वितरित करण्यात येतील असे वसईचे तहसीलदार डॉ अविनाश कोष्टी यांनी सांगितले आहे.

अखेर जोविल कुटुंबाला मदत

या इमारत दुर्घटनेत जोविल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर विशाखा जोविल ही गंभीर जखमी झाली होती. ती अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने जोविल कुटुंब अडचणीत सापडले होते. त्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी त्यांच्याकडून सातत्याने शासनाकडे मागणी केली जात होती. जी काही मदत जाहीर झाली आहे ती मिळाली तर त्यातून विशाखा हिचा उपचार खर्च करता येईल. ५० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी आम्हाला मदतीचे धनादेश दिले असे अनिल जोविल यांनी सांगितले आहे.