वसई:- विरारच्या विवा महाविद्यालयात सुरू असलेल्या नवरात्रोत्सावसंदर्भात समाजमाध्यमावरून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकूरामुळे वाद निर्माण झाला आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप भाजपाने करून गरबा हा केवळ हिंदूसाठीच अशी भूमिका घेतली आहे. माजी आमदार हिंतेद्र ठाकूर यांनी भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर देत गरबा सर्वांसाठी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या आक्षेपार्ह चॅट प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरारच्या विवा महाविद्यालयात गुजराथी मित्रमंडळ आणि यु टू ३८ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. या गरब्यात येणाऱ्या मुलींसंदर्भात दोन तरूणांचे आक्षेपार्ह चॅट व्हायरल झाले आहे. हे चॅट व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संभाषणात गरब्यात असलेल्या मुलींवर कशा प्रकारे अत्याचार केला जात असल्याचे त्या तरुणाने सांगितले आहे. गरब्याआडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी केला आहे.
हितेंद्र ठाकूरांकडून आरोपाला प्रत्युत्तर
ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांच्या एवढे मूर्ख जगात कुठेही बघायला मिळणार नाही. या गरब्याचा महाविद्यालयाशी काही संबंध नाही. खासगी संस्थेचा हा गरबा असून तो केवळ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला जातो. त्यात सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन होते. गरबा हा सर्वधर्मियांसाठी खुला आहे. कुणावरही बंदी घालणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गरबा फक्त हिंदूंसाठी- भाजपची समाजमाध्यमावर मोहीम
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी गरबा फक्त हिंदूसाठी अशी मोहीम समाजमाध्यमावर सुरू केली आहे. भाजप नेते मनोज पाटील, अशोक शेळके यांनी आपल्या फेसबुक खात्यावर तशा पोस्ट केल्या आहेत. त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
‘त्या’ तरुणांविरोधात गुन्हा दाखल
या घडलेल्या प्रकरणाबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून बोळींज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९,३(५) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश सावंत यांनी दिली आहे.