Mira Bhayander Water Scarcity: भाईंदर : दिवाळी सण तोंडावर आल्याने नागरिकांकडून साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. मात्र मिरा-भाईंदर शहराच्या पाणीपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर आणि एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर असा एकूण २२१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात पाणीगळती आणि इतर कारणांमुळे शहराला सुमारे २०० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो. शहराला दररोज २२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाण्याचे वितरण वेळापत्रक आखण्यात आले असून, नियमित पुरवठा सुरू असताना नागरिकांना फारशी अडचण जाणवत नाही. परंतु पाणीपुरवठा बंद राहिल्यास टंचाईची समस्या तातडीने जाणवते.
दरम्यान मागील काही दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.दिवाळीपूर्वी साफसफाईची कामे करण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. तर दिवाळीपूर्वी सुट्टीच्या शनिवार-रविवारी पाणीपुरवठा बंद असल्याने कामावर जाणाऱ्या दांपत्यांचा मौल्यवान वेळ वाया गेला आहे.याशिवाय काही भागात दैनंदिन गरज भागवण्या इतके पाणी नसल्यामुळे टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे.
प्रशासनाच स्पष्टीकरण:-
दरम्यान, एमआयडीसीच्या जांभुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे साकेत पंपिंग ८ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता बंद करण्यात आले होते. हे पंपिंग ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.१५ वाजता पुन्हा सुरू करण्यात आले. यामुळे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला होता. मात्र आता पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केला आहे.
सप्टेंबर महिन्यात सहा वेळा पाणी बंद
मिरा-भाईंदर शहरात सप्टेंबर महिन्यात एमआयडीसीचा पाणीपुरवठा पाच वेळा, तर स्टेमचा एकदा खंडित झाला होता. त्यापैकी तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने, दोन वेळा जलवाहिनीतील गळतीमुळे आणि एकदा देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात आला. या सहा बंदपैकी दोन वेळा शहराचा पाणीपुरवठा तब्बल २६ व ३० तास बंद होता. तसेच प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यास ६० ते ७० तास विलंब झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.