भाईंदर : – ठाणे लोकसभा जागेसाठी शिवसेनेतर्फे नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाल्याने भाजप पाठोपाठ शिवसेना देखील नाराज झाली आहे. भाजपाच्या संजीव नाईक यांनी आपला प्रचार सुरू ठेवला असून त्यांनी बंडखोरी करावी असे कार्यकर्ते जाहीरपणे सांगू लागले आहेत.

ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेकडेच ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. ही जागा शिवसेनेकडे गेल्याने भाजप नाराज असताना प्रताप सरनाईक यांना डावलले गेल्याने शिवसेनाही नाराज झाली आहे. म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे शिवेसना आणि भाजप असे महायुतीचे दोन्ही पक्ष नाराज झाले आहेत. मिरा भाईंदरमधील नागरिकांना नरेश म्हस्के यांची ओळख नाही. शिवाय म्हस्के देखील मिरा भाईंदरमध्ये कधी आल्याचे त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या स्मरणात नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र कोण नरेश म्हस्के असा सवाल केला जात आहे.

हेही वाचा – वसई : आगरी समाजाच्या मतांसाठी राजकीय पक्षांची चढाओढ, आगरी सेनेतही पडले दोन गट

सरनाईकांना डावलल्याने शिवसेना नाराज

या जागेवर शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक हे उमेदवार असणार असल्याची जोरदार चर्चा होती. गेल्या सहा महिन्यापासून सरनाईक हे आपला विधानसभा क्षेत्र सोडून अन्य भागात सक्रिय झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सरनाईक हेच आगमी लोकसभेचे उमदेवार असतील असा विश्वास मिरा भाईंदरमधील शिवसेना संघटनेमध्ये निर्माण झाला होता. मात्र ऐनवेळी सरनाईकऐवजी नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील शिवसेनेमधील सरनाईकांचे समर्थक नाराज झाले आहे. त्यामुळे शिंदे गटातील सरनाईक समर्थक नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी ते पुढे येतील की नाही असा प्रश्न उभा राहिला आहे.

हेही वाचा – वसई : सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू; राष्ट्रीय सफाई आयोगाकडून कारवाईचे निर्देश, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाखांची मदत

संजीव नाईकांच्या भेटी-गाठी सुरूच

ठाणे लोकसभा जागेवर भाजपतर्फे संजीव नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आतुर होते. त्यामुळे मागील वर्षभरापासून ते या क्षेत्रात सक्रीय झाले होते. या जागेवरून उमेदवार घोषित होण्यापूर्वीच त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांना भेटून प्रचारास देखील सुरुवात केली होती. मात्र बुधवारी सकाळी ही जागा शिवसेनाच्या वाटेला जाऊन नरेश म्हस्के हे महायुतीचे उमेदवार घोषित झाल्याने नाईक समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले. त्यामुळे नाईक यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरावे असा आग्रह भाजपमधील पदाधिकारी आता जाहीरपणे करत आहेत. दरम्यान उमेदवार घोषित झाल्यानंतर देखील नाईक हे बुधवारी रात्री मिरा भाईंदरमधील विविध कार्यक्रमांना भेट देऊन प्रचार करत असल्याचे दिसून आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे नाराज झाल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर पडू शकतो, अशी चर्चा आहे.