वसई:- नवरात्री उत्सवाच्या आनंदात गरबा खेळताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वसईत घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजता सुमारास वसई पश्चिमेकडील ओम नगर विघ्नेश्वर मंडळ येथे घडली.

फाल्गुनी राजेश शहा (४६) असे मृत महिलेचे नाव असून ती वसई पश्चिमेच्या ओमनगर परिसरात राहत होती. फाल्गुनी नवरात्र उत्सव सुरु असल्याने ओमनगर येथील परिसरात गरबा खेळण्यासाठी गेली होती. गरबा खेळून झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटून त्या अचानक खाली कोसळल्या. यावेळी आयोजकांनी त्यांना तातडीने जवळच्या योग्यम रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र उपचारादरम्यान फाल्गुनी शहा यांचा मृत्यू झाला.

नवरात्रोत्सवानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असतानाच फाल्गुनी यांच्या मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.