Mumbai Nalasopara Murder : नालासोपारा मध्ये एका महिलेेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घरातील जमिनीत गाडल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यात घटनेनंतर पत्नी तिचा प्रियकर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग येथील गांगडीपाडा येथे विजय चौहान (३५) पत्नी चमन देवी चौहान (२८) सोबत राहात होता. मागील १५ दिवसांपासून तो बेपत्ता होता. बिलालपाडा येथे राहणारे चौहान याचे दोन भाऊ त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चमन देवी ही बेपत्ता झाली होती. तिच्या पाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा हा तरुणही बेपत्ता झाला होता. चमनदेवी चौहान आणि मोनू शर्मा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातून ते दोघे पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, सोमवारी सकाळी चौहान यांचे दोन भाऊ गांगडीपाडा येथील ओम साई या निवासस्थानी आले. घरातील टाईल्सचे रंग वेगळे दिसले. त्यांनी टाईल्स काढली दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्याठिकाणी महापालिका डॉक्टर, कर्मचारी, तहसीलदार, फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या साहाय्याने पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही साठी जेजे रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले आहे.