वसई : पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीस गुन्हे शाखा २ च्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी त्याने हत्या करून मृतदेह कॉटच्या आत लपविल्याचे उघड झाले होते. मीरा रोड येथे राहणारा हार्दिक शहा (२६) या तरुणाचे नालासोपारा येथे राहणाऱ्या मेघा मोरादी (३६) या तरुणीशी मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
सहा महिन्यांपासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. एक महिन्यापूर्वीच ते नालासोपारा पूर्वेच्या तुळिंज येथील सीता सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भाडय़ाच्या घरात राहण्यासाठी आले होते. हार्दिक हा बेरोजगार होता तर मेघा परिचारिका होती. त्यांच्यामध्ये सतत आर्थिक कारणांवरून भांडणे व्हायची. सोमवारी संध्याकाळी हार्दिक याने मेघाच्या मावशीला मेसेज करून तिचा मृत्यू झाल्याचे कळवले.
मी पण आत्महत्या करणार असल्याचे त्याने या मेसेजमध्ये म्हटले होते. यानंतर त्याचा फोन बंद होता. मेघाच्या मावशीने पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी दार उघडले असता घरातील कॉटच्या आत मेघाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह दोन ते तीन दिवस पूर्वीचा असावा अशी शक्यता तुळिंज पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गुन्हे शाखा २ च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुजी रणावरे यांच्या पथकाने हार्दिकचे शेवटचे लोकेशन काढले असता पोलिसांनी तो मध्य प्रदेशात ट्रेनने प्रवास करत असल्याच अंदाज आला. तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीची छायाचित्रे पाठवली. आरोपी मध्य प्रदेशातील नागद येथून पश्चिम एक्स्प्रेसने प्रवास करतानाच स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने सोमवारी रात्रीच त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.