सुमित सप्रू
उत्तर आणि पश्चिम पुण्यातील परिसरांमधील घरांच्या विक्रीत मोठी वाढ होत आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत आलेल्या आकडेवारीनुसार, ज्या भागांत नवीन प्रकल्प आणि कनेक्टिव्हिटी सुधारत आहे, तिथे खरेदीदारांची रुची कायम आहे.
पुणे हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्रस्थान म्हणून ओळखले जात असले, तरी गेल्या काही वर्षांत ते भारतातील सर्वात सक्षम रिअल इस्टेट बाजारांपैकी एक बनले आहे. मागील दशकात घरांची वाढती मागणी, आयटी क्षेत्रातील वाढ, औद्योगिक विकास आणि व्यावसायिक व विद्यार्थ्यांचा सतत वाढत असलेला ओघ यांमुळे इथल्या रिअल इस्टेटला मोठी चालना मिळाली आहे. पुण्याची वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे येथील स्थैर्य. इतर शहरांमध्ये मोठय़ा चढ-उतारांचे चक्र दिसून येते; परंतु पुण्यातील वाढ सातत्यपूर्ण राहिली आहे, ज्यामागे एंड-युजर्स आणि गुंतवणूकदार दोघांचीही मजबूत मागणी आहे.
अहवालांनुसार, उत्तर आणि पश्चिम पुण्यातील परिसरांमधील घरांच्या विक्रीत मोठी वाढ होत आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत आलेल्या आकडेवारीनुसार, ज्या भागांत नवीन प्रकल्प आणि कनेक्टिव्हिटी सुधारत आहे, तिथे खरेदीदारांची रुची कायम आहे. नवीन प्रकल्पांच्या संख्येत घट झाली असली तरी विक्रीचे मूल्य आणि मध्यम-ते-प्रीमियम घरांची मागणी वाढत आहे, ज्यामुळे चांगल्या कनेक्टिव्हिटी असलेल्या उपनगरांमध्ये किमती स्थिर राहिल्या आहेत. पुण्याची व्यावसायिक कार्यालयांसाठीची मागणी तेजीत आहे. इथल्या व्यावसायिक कार्यालयांद्वारे गुंतवणूकदारांना चांगले भाडे मिळत असल्याने यंदाही यात मोठी वाढ अपेक्षित आहे. आयटी आणि बिझनेस हबजवळील निवासी संकुलांच्या मागणीतही वाढ होत आहे. हिंजवडी आणि हडपसरसारख्या भागांत व्यावसायिक संकुले आणि निवासी प्रकल्प यांच्यातील योग्य ताळमेळ राखला जात असल्याने येथे वेगाने विकास होत आहे.
गेल्या काही वर्षांत पुण्यात मालमत्तांच्या किमती वाढल्या आहेत आणि ही वाढ केवळ अंदाजावर नाही तर प्रत्यक्ष राहणी व नोकरीसाठी शहरात येणाऱ्या लोकांच्या मागणीवर आधारित आहेत. आयटी आणि उत्पादन क्षेत्रातील वाढत्या रोजगारनिर्मितीमुळे परवडणाऱ्या घरांपासून लक्झरी प्रकल्पांपर्यंत सर्वच गृहनिर्माण विभागात मागणी जोर धरत आहे. अर्थव्यवस्था आव्हानात्मक स्थितीत असतानाही पुण्याचा रिअल इस्टेट बाजार तेजीत राहिला आहे.
पायाभूत सुविधा विकास हा विस्ताराचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. इनर आणि आउटर रिंगरोड्स, मेट्रो विस्तार प्रकल्प आणि प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटी वाढत आहे. प्रवासाचा वेळ कमी होत आहे आणि नवीन क्षेत्रे विकासासाठी खुली होत आहेत. सुधारलेली पायाभूत सुविधा तुमचे राहणीमान सुधारत नाही, तर दुर्लक्षित भागांनाही नवीन वाढीच्या संधी निर्माण करून देते, ज्याचा फायदा खरेदीदार आणि विकासक दोघांनाही होतो.
पुण्यातील काही विभाग मायक्रो-मार्केट्स हॉटस्पॉट्स म्हणून पुढे येत आहेत. हिंजवडी हे पुण्याचे आयटी कॅपिटल केवळ आयटी पार्क क्लस्टर न राहता एक ट्रान्झिट-ओरिएंटेड निवासी केंद्र बनले आहे, ज्याला राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा फायदा होत आहे. रस्त्यांचे जाळे आणि नागरी सुविधा सुधारल्यामुळे हा भाग व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी पसंतीचा बनला आहे.
पूर्वेकडे हडपसर हा औद्योगिक खेडय़ापासून आयटी पार्क्स, निवासी संकुले आणि रिटेल हब अशा वैविध्यपूर्ण विकासाकडे वळला आहे. मगरपट्टा सिटीने या परिवर्तनाला गती दिली आणि त्याचा प्रभाव हडपसर अॅनेक्स भागात दिसून येतो, जिथे कुटुंबे आणि तरुण व्यावसायिकांसाठी अधिक परवडणारी घरे उपलब्ध होत आहेत.
मुंबई-पुणे महामार्गालगतचा बाणेर- बावधन पट्टा रमणीय परिसर आणि शांत जीवनशैलीसाठी ओळखला जातो, तसेच तो प्रमुख रोजगारकेंद्रांशी उत्तमरीत्या जोडलेला आहे. एक्सप्रेस वे सुधारणा आणि नियोजित रिंगरोड प्रकल्पामुळे प्रवासाची सोय आणखी सुधारत आहे. त्यामुळे निवासी जागा आणि कनेक्टिव्हिटी शोधणारे मध्यम-ते-प्रीमियम खरेदीदार आकर्षित होत आहेत.
हडपसर-सासवड कॉरिडॉर, विशेषत: जाधववाडी परिसरांमध्ये वाढीची क्षमता आहे. प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर एमआयडीसी तसेच जवळील आयटी आणि औद्योगिक हब्स यांमुळे हा दक्षिण पट्टा पुण्याचा पुढचा विकासाचा कॉरिडॉर ठरू शकतो. विकासक आणि गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे आणि सुधारित रस्ते कनेक्टिव्हिटी, एरोसिटी योजना आणि लॉजिस्टिक विकासामुळे जाधववाडी, जेजुरी, सासवड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये निवासी व व्यावसायिक वाढ होण्याची शक्यता आहे.
आजच्या गृहखरेदीदारांसाठी हिंजवडी, हडपसर आणि बावधनसारखे चांगले पर्याय आहेत, तर हडपसर-सासवड कॉरिडॉर उच्च-क्षमता गुंतवणूक संधी उपलब्ध करून देतो. पुण्याची रिअल इस्टेट बाजारपेठ आता केवळ काही प्राइम लोकेशन्सपुरती मर्यादित राहिलेली नाही; ती अनेक कॉरिडॉरमध्ये विस्तारत आहे, ज्यामुळे प्रत्येक प्रकारच्या खरेदीदाराला संधी उपलब्ध होत आहे. (लेखक शापूरजी पालनजी रिअल इस्टेटचे सीईओ आहेत.)