मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही उच्चपदस्थ अधिकारी नागपूरला असल्याने मंत्रालयात सारेकाही सुशेगात होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह उच्चपदस्थ विदर्भात होते, तर काही मंत्री देवदर्शन व सत्कारात मग्न होते. त्यामुळे शपथविधी होऊनही मंत्र्यांनी पदभार स्वीकारुन कामकाज सुरु केले नाही. नवीन मंत्री बुधवारी पदभार स्वीकारुन कामकाज सुरु करण्याची शक्यता आहे.
शपथविधी सोहळा शुक्रवारी झाल्यावर खातेवाटप रविवारी झाले. मुख्यमंत्री फडणवीस हे रविवारी दुपारी नागपूरला गेले व तेथे त्यांचा जंगी सत्कार झाला. तर मिहान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी नागपूरला बैठक बोलाविली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, अर्थ, नगरविकास व अन्य खात्यांचे उच्चपदस्थ अधिकारी सोमवारी नागपूरला होते. रविवारी खातेवाटप होऊनही नवीन मंत्र्यांना कार्यालये व दालनांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे मंत्रालय सोमवारी सुरु असूनही मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही. महसूलमंत्री एकनाथ खडसे कार्तिकी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला गेले होते. तर प्रकाश मेहता हे शिर्डीला गेले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही विदर्भात होते.
त्यामुळे मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयातच नव्हे तर काही खात्यांमध्येही शुकशुकाट होता. उच्चपदस्थ अधिकारी व कामकाजच नसल्याने कर्मचारी सुशेगात होते. आता मंगळवारी मोहरमची सुटी असल्याने मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री बुधवारीच मंत्रालयात येतील. मंत्रिमंडळाची बैठकही त्यादिवशी होणार असून काही खात्यांचे सादरीकरणही होईल. त्याचदिवशी दालने, कार्यालये व बंगल्याचेही वाटप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रालयाचा प्रशासकीय गाडा आता दोन दिवसांनी सुरु होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis busy with homage activities