देशातील बहुतेक राज्यांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असून महाराष्ट्रातही एकाच पक्षाचे सरकार असले पाहिजे. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी ही निव्वळ ‘सौदेबाजी’ असून त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे काहीही भले झालेले नाही. असल्या युती-आघाडीवर माझा अजिबात विश्वास नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्यव्यापी पक्ष बनणे व स्वबळावर सत्ता आणणे हेच मनसेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेबरोबर युतीची शक्यता फेटाळली. ‘राज्यात मनसेची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री मीच असेन आणि महाराष्ट्राचा विकास हेच माझे ध्येय असेल’, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
निवडणुकीनंतर शिवसेना आणि मनसे यांची युती होणार असल्याच्या वावडय़ा गेल्या एक-दोन दिवसांपासून उठविल्या जात आहेत. त्यासंदर्भात गुरुवारी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात राज यांना बोलते करण्यात आले. यावेळी झालेल्या दिलखुलास गप्पांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशीलही उघड केला. ते म्हणाले, सेना-मनसे युती शक्य आहे का, त्यांच्या मनात काय आहे, हे केवळ जाणून घेण्यासाठीच मी त्यांच्याशी संवाद साधला होता. पण जेथे कोणतेही धोरण नाही, दृष्टी नाही, क्षणक्षणाला निर्णय बदलले जातात, अशा लोकांकडून काय होणार हे मला अगोदरच माहिती होते. त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. परंतु मला कोणी आडमुठा ठरवू नये म्हणून मी उद्धवची भूमिका जाणून घेतली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यावेळी सेना-भाजपमध्ये सुसंवादाचे वातावरण होते. तथापि १९९९ नंतर सेना व भाजपमध्ये जे काही चालले होते ते केवळ ‘डील’ होते, अशी कडवट टीका करून ते म्हणाले, की राष्ट्रीय पक्षांनी केंद्रात राज्य करावे, मात्र राज्यात राष्ट्रीय पक्ष टिकूच नये असा आमचा प्रयत्न आहे. राज्यात गेली पंधरा वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती. आता आघाडी तुटल्यानंतर दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी वेळेत फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी करत आहे, तर राष्ट्रवादीने वेळोवेळी कशी अडवणूक केली याचे दाखले काँग्रेसचे नेते देत आहेत. याचाच अर्थ आघाडी किंवा युती ही राज्यासाठी उपयुक्त नाही, एकाच पक्षाचे सरकार राज्यात गरजेचे असून मनसेची हीच भूमिका राहिली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मोदी यांना दिलेला पाठिंबा, पंतप्रधान म्हणून आजची मोदी यांची भूमिका व त्याला केलेला विरोध, मोदी यांची बदललेली भूमिका, मराठी बाणा, सेना-भाजप तसेच मनसे व भाजप संबंध, युत्या व आघाडय़ांची गणिते, महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष का रुजू शकला नाही, परप्रांतीयाविषयीची भूमिका, भूमिपुत्रांचा मुद्दा, स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न, मनसेचा विकास आराखडा तसेच मुंबई तोडण्याचा डाव पुन्हा एकदा कसा टाकला जातो यावर या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केले.  
..तर दोष देऊ नका!
घाटकोपरमध्ये भाजपचे उमेदवार प्रकाश मेहता यांच्या प्रचाररथावर सर्वत्र गुजराती भाषेत लिहिलेले दिसत आहे. आता हे सर्व डोके वर काढत आहे. त्यामुळे जर मराठी माणूस उभा राहिला तर दोष देऊ नका, असा इशारा राज यांनी दिला. जे मुंबईत आज सुरू  झाले आहे ते अन्य राज्यांत करण्याची कोणाला हिम्मत झाली असती का, असा सवालही त्यांनी या वेळी केला.
(सविस्तर वृत्त रविवारच्या अंकात)