‘अँगेला मर्केल चांगल्या वक्त्या आहेत. पण एवढय़ाने अख्खा देश सरकारच्या पाठीशी कसा?’ – या प्रश्नाचे उत्तर शोधू पाहणारा हा पत्रलेख. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखानंतर लिहिलेला, पण त्यातल्याच मुद्दय़ांची चर्चा करण्याऐवजी जर्मनीत राहून स्वत:ला अनुभवातून जाणवलेले मुद्दे मांडणारा..
‘उजेडामागचा अंधार’ (६ एप्रिल) हा अग्रलेख विचार करायला प्रवृत्त करणारा आहे. मुळात मानव्यशाखेची विद्यार्थिनी असल्यामुळे आजूबाजूला घडणारी प्रत्येक घटना दहा वेगळ्या दृष्टिकोनांतून बघण्याची सवयच लागली आहे. त्यामुळेच एखादी गोष्ट पटकन सहजासहजी कौतुकास्पद वाटत नाही किंवा लगेच चांगली किंवा वाईट अशी कोणत्याही गोष्टीची विभागणीही करता येत नाही. असे मुळी संस्कारच मनावर घडत गेले आहेत. अग्रलेखासंदर्भात जर्मनीबद्दल आणि इथल्या भारतीय, मराठीभाषक रहिवाशांच्या अनुभवाबद्दल आणखी सांगण्यासारखे आहे, म्हणून हे लिहिते आहे.
‘मराठी कट्टा सपोर्ट फोरम’च्या माध्यमातून काम करत असताना, लोकांना आलेले करोनादरम्यानचे अनुभव अगदी जवळून अनुभवता येत आहेत. त्याआधी ‘मराठी कट्टा सपोर्ट फोरम’बद्दल इथे थोडे सांगावेसे वाटते. जर्मनीमधली सर्व मराठी मंडळींना आपलीशी वाटणारी संस्था ‘मराठी कट्टा जर्मनी’- या संस्थेची स्थापना अजित रानडे आणि त्याच्या काही मित्रमंडळींनी सहा वर्षांपूर्वी केली. सर्वानी मिळून सांस्कृतिक कार्यक्रम करावेत, अडीअडचणीला एकमेकांना मदत करावी हा या संस्थेमागचा मुख्य उद्देश. जर्मनीमधील जवळपास साडेचार हजार मराठी लोकांना या कट्टय़ाने मागच्या काही वर्षांमध्ये एकत्र आणले.
तर.. हा ‘सपोर्ट फोरम’ म्हणजे याच मराठी कट्टय़ाचा एक कौतुकास्पद उपक्रम. पण अगदी हल्लीच सुरू झालेला. करोनामुळे लोकांना अनेक अडचणी आल्या- काहींचे आई-वडील जर्मनीला आले होते, त्यांना परत जाता येत नव्हते, आई-वडिलांची औषधे संपली होती, काहींचे व्हिसा संपत आले होते. सगळ्यात दु:ख तेव्हा झाले, जेव्हा इथे काम करणाऱ्या आणि अन्य कुटुंबीय भारतात असणाऱ्या एका मुलाच्या आईला देवाज्ञा झाली. पण त्याला भारतात काही केल्या परत जाता येईना. अशा एक ना अनेक अडचणींना सर्वानी मिळून तोंड देण्यासाठी, या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांना या परिस्थितीत योग्य मार्ग दाखवण्यासाठी अजित रानडे व त्याच्या मित्रमंडळींनी – नावेच सांगायची तर जीवन करपे, अक्षय जोशी, जान्हवी देशमुख, इंद्रनील पोळ, डॉ. मेघा जाधव, सागर तिडमे यांनी- ‘मराठी कट्टा सपोर्ट फोरम’ तयार केला.
या करोना महामारीची सुरुवात होताच जर्मन आरोग्य यंत्रणा किती दबावाखाली होती, हे आम्ही पाहिले. इथले ११२, ११६, ११७ हे आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक लागतच नसणे, लागले तरी उत्तर न मिळणे, अपॉइन्टमेंट्स मिळायला आता आणखीच वाट बघावी लागणे, असे अनुभव आम्ही सुरुवातीच्याच काही केसेसमध्ये घेतले. हे आलेले अनुभव दुर्दैवाने भीतीदायक आणि आत्मविश्वास कमी करणारे होते. हा मिळालेला प्रतिसाद मला झाकायची किंवा लपवायची इच्छा नाही आणि त्यात कोणालाही दोष द्यायचाही माझा हेतू नाही; कारण हे संकट सर्वासाठीच इतके नवीन होते, की प्रत्येक जण जमेल तसा मार्ग काढायच्या प्रयत्नात होता. एक गोष्ट मात्र इथे दुर्लक्षित करता कामा नये, की जर्मनीमध्ये देशपातळीवर चालणाऱ्या संशोधनामुळेच आज जर्मनीमधली परिस्थिती काही प्रमाणात का होईना, पण आटोक्यात आहे. ऑडी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, फोक्सवॅगन या ऑटोमोटिव्ह कंपन्यांसाठी प्रसिद्ध असणारा हा देश, बायोटेक्नॉलॉजीतील (जैवतंत्रज्ञान) संशोधनात तितकाच प्रगत आहे, हे यातून लगेचच जाणवले.
बरे, फक्त संशोधन नाही तर राजकीय पातळीवरसुद्धा सारासारविचार करून पावले उचलली गेली आणि जात आहेत. म्हणूनच करोना आणि जर्मनी असा विषय असताना, अँगेला मर्केल यांच्याविषयी बोललो नाही, तर तो त्यांचा अपमान ठरेल. माझी एक मैत्रीण परवा बोलता बोलता म्हणाली, ‘‘शी इज अ गुड स्पीकर.. हाऊ कम पीपल ट्रस्ट द गव्हर्न्मेट सो मच?’’- नेतृत्वाकडे वक्तृत्वाचे गुण आहेत कबूल; तरी सरकारवर लोकांचा एवढा विश्वास?
या प्रश्नाने मी अजूनच विचारात पडले. अँगेला मर्केल यांनी लोकांना आत्मविश्वास दिला, आधार दिला, ‘मीदेखील तुमच्यातलीच एक आहे, आपण सर्व मिळून यातून बाहेर पडू’ असे नुसते बोलून न दाखवता, या नेतृत्वाने जर्मनीला या संकटसमयी धीर दिला, तो कसा हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. करोना विषाणूबाबत जे काही संशोधन करायचे होते, त्यासाठी सरकारने पुरवलेला निधी, विलगीकरणाच्या (क्वारंटाइन) बाबतीत उचललेली पद्धतशीर पावले, आणीबाणीसारखे वातावरण जे भारतात किंवा काही युरोपीय देशांमध्ये दिसून आले आणि येत आहे, तसे शक्यतो होऊ नये आणि जनजीवन सुरळीतच राहावे यासाठी केलेली धडपड.. अशा एक ना अनेक गोष्टी. अनेक युरोपीय देशांच्या मानाने आम्ही अंतर ठेवून का होईना, पण खूपच मोकळेपणाने सगळीकडे वावरत होतो किंवा आहोत, असे म्हणायला काही हरकत नाही. टाळेबंदी किंवा एखादा रहिवासी भागच बंद करणे असे इथे नाही.
आर्थिक व्यवस्था कोलमडणार आहे, सामान्य माणूसच त्यात भरडला जाणार आहे, याची पुरेपूर जाणीव इथे आहे. म्हणून मग सुरुवातीपासूनच विविध धोरणे आखून, नियम शिथिल करून, उपक्रम राबवून केली जाणारी मदत; त्यातले काही सरकारी पुढाकाराचे उपक्रम- म्हणजे व्यवसायांना, स्वतंत्र कलाकारांना केली जाणारी आर्थिक मदत याचा उल्लेख इथे करावाच लागेल. त्याहीपेक्षा महत्त्वाची, ठळकपणे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, नागरिकांना अन्नाचा तुटवडा कुठेच जाणवणार नाही याची पूर्ण खात्री इथल्या सरकारने लोकांना दिली आणि निभावलीसुद्धा!
जर्मन शिकायला सुरुवात केली तेव्हापासून अँगेला मर्केल यांचे नाव नेहमीच ऐकायचो. किंबहुना जर्मनीमध्ये आजसुद्धा त्यांना ‘मूटी’ (आई) म्हणून संबोधले जाते. त्यांना नक्की ‘मूटी’ का म्हणतात, त्यांच्या प्रसिद्धीचा आलेख का उंचावतो, विशेषत: आपत्तीच्या काळात त्या आईप्रमाणे देशाला कसा धीर देतात, याचा अनुभव मागच्या काही महिन्यांमध्ये घेता आला. या सगळ्यात सामान्य नागरिकसुद्धा तेवढेच सामील झाले आहेत, हे नंतर नंतर दिसून आले. अंतर ठेवून वावरणे, खरेदीच्या ठिकाणी गर्दी न करणे, बाहेर पडायचे शक्यतो टाळणे, बरे वाटत नसल्यास स्वत:च्या खोलीतूनदेखील बाहेर न पडणे हे आता सगळीकडेच बघायला मिळत आहे. नागरिक खूप संवदेनशील आणि जागरूक आहेत, असे मला या काळात प्रकर्षांने जाणवले.
अँगेला मर्केल काय आणि इथले लोक काय.. ते आदर्श आहेत असे मी म्हणणार नाही, सगळीकडेच हेवेदावे, गुण-अवगुण आहेत. पण सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सगळा देश कसा काम करतो आहे, हे मात्र इथे शिकण्यासारखे आहे, हे नक्की!
– मोहिनी काळे, बर्लिन