अ‍ॅड. संजय भाटे

नामवंतांची प्रत्येक गोष्ट, त्यांचा प्रत्येक शब्द त्यांच्या चाहत्यांना अनुकरणीय वाटतो. अशा वेळी जबाबदारी येते ती नामवंतांवर. पण विवेक हरवलेल्या समाजात त्याचे भान उरले आहे का?

राजकुमार. कन्नड चित्रपट माध्यमावर अक्षरश: अधिराज्य गाजविणारा अभिनेता. याची एक खासियत होती. तो कधीही चित्रपटात स्वत: धूम्रपान वा मद्यपान करणारे दृश्य देत नसे. याबाबत त्याने सांगितले होते की, ‘‘माझा चाहता वर्ग हा मला प्रत्यक्ष जीवनातही ‘हिरो’ समजतो. मी जर अभिनय व पटकथेची मागणी या सबबीखाली चुकीच्या, समाजघातक बाबी पडद्यावर करू लागलो, तर माझ्यावर प्रेम करणारे लाखो भाबडे प्रेक्षक ती बाब योग्य आहे असे समजून त्याचे अनुकरण करतील. माझ्या प्रेक्षकांना चुकीच्या बाबी मला मान्य आहेत असे पडद्यावर दाखवणे मला योग्य वाटत नाही.’’

नामवंतांच्या जनमानसावरील प्रभावाबाबत मानसशास्त्र असे सांगते की, अशा नामवंतांना सामान्य जनता जेव्हा एक यशस्वी व्यक्ती म्हणून बघते, त्या वेळी त्या नामवंतांची प्रत्येक गोष्ट, त्यांचा प्रत्येक शब्द त्यांची चाहती असणाऱ्या सामान्य जनतेस अनुकरणीय वाटतो. कारण त्या अनुकरणात त्यांना वैयक्तिक यशस्वितेची आशा दिसत असते. असे नामवंत लोकप्रिय असतात. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या चाहत्या वर्गाचे व एकूणच समाजाचे चटकन लक्ष जाते. त्यामुळे ‘तो वा ती काय सांगते’ यापेक्षा ‘ती व तो सांगतो’ एवढेच ते ज्या वर्गास उद्देशून सांगतात त्या वर्गापर्यंत पोहोचण्यास पुरेसे असते. म्हणजे साधनच संदेश बनते आणि साधनाचे संदेशापेक्षा जास्त महत्त्व होते.

उदाहरणार्थ, मागे कीर्तनकार इंदुरीकर यांनी त्यांच्या कार्यक्रमात एका ठिकाणी असे म्हटले की, ‘सम तारखेला स्त्री व पुरुष यांचा शरीरसंबंध झाला तर त्यातून गर्भधारणा होऊन मुलगा होतो आणि जर विषम तारखेला शरीरसंबंध झाला तर मुलगी होते; अशुभ वेळेला असा शरीरसंबंध झाला तर होणारी संतती ही नालायक व खलप्रवृत्तीची जन्मते.’

इंदुरीकरांच्या वरील वाक्यावरून वर नमूद केल्याप्रमाणे प्रसारमाध्यमांत प्रचंड चर्चा सुरू झाली. एकीकडे काही सामाजिक कार्यकर्ते हे इंदुरीकरांचे वाक्य गर्भलिंग निवड सुचविणारे आहे तसेच ते अंधश्रद्धा पसरविणारे आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ‘प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम, १९९४’ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई व्हावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे, इंदुरीकरांचे चाहते त्यांच्या समर्थनार्थ ‘वी सपोर्ट इंदुरीकर’ असे लिहिलेले फलक घेऊन मोर्चे काढतानाही आपण पाहिले. एका ठिकाणी तर त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. या साऱ्यामुळे सामान्यजन मात्र गोंधळले. इंदुरीकरांचे चुकले तरी काय, अशा प्रकारची संभ्रमावस्था जनमानसात तयार झाली.

आपल्या समाजातील पुरुषप्रधानता ही सर्वज्ञात आहे. त्यामुळे आजही ‘एक तरी मुलगा हवा’ ही सर्वसाधारण बहुसंख्य कुटुंबांत इच्छा असते. सत्तरच्या दशकानंतर शासकीय पातळीवर सुरू झालेला कुटुंब नियोजनाचा प्रचार-प्रसार, त्यांच्या परिणामी ‘हम दो, हमारे दो’ या जाहिरातीतील घोषवाक्याप्रमाणे लहान कुटुंबाची संकल्पना समाजात मोठय़ा प्रमाणावर रुजली. तथापि, या लहान कुटुंबातही ‘एक तरी मुलगा हवाच’ ही इच्छा मात्र कायम राहिली. यातून मग जन्म झाला तो भयानक अशा सामाजिक कुकर्माचा, म्हणजे प्रसूतीपूर्व गर्भाचे लिंगनिदान व त्यातून जर लिंगनिदान मुलीचे झाले तर मग त्या स्त्रीलिंगी गर्भाची भ्रूणहत्या. काही वैद्यकीय व्यावसायिकदेखील पैसे कमाविण्यासाठी या वैद्यकीय नीतिमत्तेला काळिमा फासणाऱ्या कृत्यात सहभागी झाले आणि आपल्या व्यवसायाचा त्यांनी ‘मागणीप्रमाणे पुरवठा’ असा धंदा केला. गर्भातील जन्मजात व्यंग किंवा व्याधी अथवा गर्भाची गर्भातील स्थिती, वाढ कळावी म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाने ‘सोनोग्राफी’ची सुविधा आली. पण जर समाज सुबुद्ध नसेल तर प्रगत तंत्रज्ञानाचा समाज किती चुकीचा वापर करतो, हे लिंगनिदानात प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या गैरवापराने अधोरेखित झाले आहे.

यामुळे लोकसंख्येतील मुला-मुलींचे प्रमाण व त्याचा समतोल बिघडला. लोकसंख्येतील मुलींची संख्या झपाटय़ाने कमी होऊ लागली. शासनस्तरावर याची गांभीर्याने दखल घेण्यात आली व परिणामत: भारतीय संसदेने पीसीपीएनडीटी अर्थात ‘प्रसवपूर्व निदान तंत्रे (विनिमय आणि दुरुपयोग प्रतिबंध) अधिनियम, १९९४’ हा कायदा पारित केला. २००३ मध्ये या कायद्याचे नामाभिधान हे ‘प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध)’ असे करण्यात आले.

‘लिंगनिवड’ म्हणजे काय?

वरील कायद्याच्या कलम २ मध्ये या कायद्यात वापरण्यात आलेल्या संज्ञा वा शब्दांचे अर्थ स्पष्ट करण्यात आलेले आहेत. यानुसार ‘लिंगनिवड’ म्हणजे अशी कोणतीही प्रक्रिया, तंत्र वा चाचणी, औषधाची योजना वा तरतूद ज्यायोगे गर्भस्थ असलेले गर्भ (एम्ब्रीयो) एखाद्या विशिष्ट लिंगाचे असेल याची शक्यता वा शाश्वती वाढेल.

आता आपण वरील अधिनियमाच्या कलम २२(२) कडे वळू. त्यानुसार, जेनेटिक प्रयोगशाळा किंवा क्लिनिक यांच्यासह कोणत्याही व्यक्ती वा संघटनेने जन्मपूर्व (प्री-नेटल) लिंगनिश्चिती किंवा गर्भधारणापूर्व (प्री-कॉन्सेप्शन) लिंगनिवडीच्या कोणत्याही- जसे शास्त्रीय वा इतर – साधनांबाबत कोणत्याही प्रकारे जाहिरात प्रसिद्ध, वितरित करू नये व सांगू नये.

इंदुरीकर सम व विषम तारखेनुसार लिंगनिश्चिती होते, असे सांगतात, म्हणजे त्यांचे वाक्य वरील कलमानुसार असलेल्या प्रतिबंधित कृत्यात स्पष्टपणे मोडते. वरील कायद्याच्या कलम २२(१) वा (२) यांचे जी कोणी व्यक्ती उल्लंघन करेल, त्या व्यक्तीस तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा व रुपये दहा हजारांपर्यंतचा दंड अशी शिक्षा कायद्यात नमूद आहे.

वैद्यकीय शास्त्र असे सांगते की, स्त्रीच्या शरीरात ‘’ ही लैंगिक गुणसूत्रे असतात व पुरुषाकडे ‘’ ही लैंगिक गुणसूत्रे असतात. स्त्री व पुरुषामध्ये समागम झाल्यानंतर पुरुषांकडून वीर्याद्वारे स्त्रीच्या शरीरात ‘’ ही लैंगिक गुणसूत्रे सोडली जातात. त्यातील ‘’ गुणसूत्राचा स्त्रीच्या ‘’ गुणसूत्राशी संयोग झाल्यास गर्भ हा स्त्रीलिंगी होतो व पुरुषाच्या वीर्यातील ‘’ गुणसूत्र स्त्रीच्या ‘’ गुणसूत्राशी संयोग झाल्यास गर्भ हा पुल्लिंगी होतो. अर्थात हा दोन गुणसूत्रांचा होणारा संयोग हा केवळ अपघात वा योगायोग आहे. त्याचा सम वा विषम तारखेशी काहीही संबंध नाही. वैद्यकीयशास्त्र त्याची कुठेही पुष्टी करीत नाही.

भारतीय घटनेच्या अनुच्छेद ५१(अ)(६) नुसार, प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य आहे की, त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, चिकित्सक बुद्धी व सुधारणा वृद्धिंगत करावी. विधिशास्त्रानुसार समाज व मानवी वर्तनाच्या नियंत्रण व नियमनासाठी विहित केलेले नियम म्हणजेच कायदा होय. प्रख्यात अमेरिकी न्यायविशारद बेंजामिन काडरेझो हे त्यांच्या ‘द नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस’ या शोधग्रंथात म्हणतात की, ‘कायद्याचे अंतिम ध्येय हे समाजाची प्रगती वा कल्याण हेच असते.’ प्रख्यात भारतीय न्यायाधीश व्ही. आर. कृष्णा अय्यर हे कायद्यास ‘न्याय करण्याचे साधन’ संबोधतात. समाजजीवनातील कायद्याचे हे अनन्यसाधारण स्थान समजून घेतल्यानंतर कोणताही कायदा यशस्वी होण्यासाठी त्यास समाजाचे नैतिक व सक्रिय समर्थन असावे लागते, हे ध्यानात येईल. अन्यथा, हुंडा प्रतिबंधक कायदा समाजानेच निष्प्रभ केला. याउलट माहिती अधिकाराच्या कायद्याला समाजाचे उदंड समर्थन मिळाले व शासकीय कारभारात काही प्रमाणात का होईना, एक प्रकारचा खुलेपणा व जबाबदारी असा गुणात्मक फरक आला.

पीसीपीएनडीटी कायदा हा भारताच्या संसदेने विधिवत घटनामान्य पद्धतीने पारित केलेला कायदा आहे. भारतीय घटनाही तिच्या उद्देशिकेत नमूद केल्याप्रमाणे ‘वी द पीपल ऑफ इंडिया’ म्हणजे भारताच्या सामान्य नागरिकांनीच स्वत:स प्रदान केली आहे. भारतीय घटना म्हणजे शतकानुशतके सामाजिक विषमता, स्त्रियांची दयनीय अवस्था याने गांजलेल्या भारतीय समाजाने समताधिष्ठित व भेदभावरहित समाजाच्या निर्मितीसाठी केलेला हुंकार होय. एका विवेकशील, प्रागतिक व विज्ञाननिष्ठ भारतीय समाज उभारण्याची ती एक सामूहिक प्रतिज्ञा आहे. अशा घटनेतील मूल्यांची जोपासना व संवर्धन करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य:कर्तव्य आहे. इंदुरीकरांच्या प्रतिमेस होणारा दुग्धाभिषेक, त्यांच्या समर्थनार्थ झालेले बंद हे सारे समाजाचा ज्या दिशेने प्रवास होत आहे, त्याचे निदर्शक आहे. त्यामुळेच इंदुरीकरांच्या त्या विधानापेक्षाही भयभीत आणि चिंताग्रस्त करतो तो या प्रकरणात समाजाने गमावलेला विवेक!

(लेखक अधिवक्ता असून त्यांनी गर्भिलगनिदानविरोधी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत स्थापित शासकीय समितीमध्ये काम केले आहे.)

sanjaybhate121@gmail.com