शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला लोकशाही जीवनप्रणालीची ओळख होऊन ती अंगीकारता यावी, यासाठी शाळेतच ६२ वर्षांपूर्वी विद्यार्थी लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात आला, असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, बुलढाणा येथे हे घडले आहे. दिवाकरभय्या आगाशे आणि शशिकला आगाशे या दाम्पत्याच्या संकल्पनेतून लोकशाही जीवनमूल्यांचे प्रयोग राबविणारी शाळा म्हणून भारत विद्यालयाची उभारणी झाली. शिक्षणासोबतच निसर्गसहली, सागर सफरी, कँप्स, श्रमसंस्कार शिबिरे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांची लोकशाही, मंत्रिमंडळ, आंतरभारती असे उपक्रम आणि विविध क्रीडा प्रकारांना प्राधान्य देत भारत विद्यालयात संस्काराची जपणूक करण्यात येते. या शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ‘भारत’ घडविण्याचे कार्य अनेक वर्षांपासून निरंतर सुरू आहे.

राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या दिवाकरभय्या आगाशे यांनी १९५४ मध्ये बुलढाण्यात युथ लीग रिक्रिएशन सेंटरची संस्था स्थापन केली. या माध्यमातून भारत विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पाठय़पुस्तकांच्या चाकोरीबाहेरील उपक्रमशील शाळा सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या वेळी यावर टीकाही झाली. मात्र, त्यापुढे न डगमगता शाळेतील जास्तीत जास्त तासिका उघडय़ा पटांगणावर, माळरानावर व निसर्गाच्या सान्निध्यात घेण्यास सुरुवात झाली. त्या काळी देशात लोकशाहीचे वारे वाहत होते. लोकशाही ही फक्त एक उपचार पद्धती न राहता आपण तिचा जीवनप्रणाली म्हणून उपयोग केला पाहिजे, हा विचार मनात आला अन् या विचाराचे बीजारोपण सर्वप्रथम १९५४ मध्ये आगाशे यांनी त्यांच्याच भारत विद्यालयात केले. विद्यार्थ्यांसाठी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. या प्रयोगशील उपक्रमाच्या छोटय़ाशा रोपटय़ाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. विविध अभिनव प्रयोग राबवून शाळा एका नव्या उंचीवर गेली आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक एस.आर. उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली शाळा प्रगतीची नवनवी शिखरे गाठत आहेत. इथे विद्यार्थ्यांच्या सामाजिक संस्कारांचा पायाही मजबूत केला जातो.

बुलढाण्याच्या दक्षिणेला सात एकरांच्या निसर्गरम्य परिसरात भारत विद्यालय कार्यरत आहे. प्रत्येक शाळेत बगीचा असतो; पण ही शाळा बगिच्यात वसलेली आहे का, असे वाटू लागते. शाळेच्या चारही बाजूंना मोठी वनराई फुलवून ती जोपासली आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून विद्यालयाच्या सर्वच इमारती उभ्या राहिल्या आहेत. निसर्गासोबतच पशू-पक्ष्यांवरही प्रेम करावे, हे विचार येथे आचरणात आल्याचे दिसून येते. पक्ष्यांच्या चिवचिवाटांसह राजहंसाच्या पाच-सहा जोडय़ा येथे मुक्तपणे वावरताना दिसतात. मोर पिसारे फुलवून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करीत असतात. यासोबतच ससे, हरीण, मगर, माकडे, विविध जातींचे लव्हबर्ड्स दिसल्यावर जणू आपण प्राणिसंग्रहालयात आल्याचा भास होतो.

शालेय राज्यव्यवस्था

विद्यार्थी मंत्रिमंडळाचे राज्य म्हणजे या शाळेचा परिसर होय. विद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी हे या राज्याची जनता. कार्यालयीन कामकाज व अध्यापन वगळता इतर सर्व बाबतीत विद्यार्थ्यांची सत्ता असते. या राज्यातील नागरिकांना हक्क व अधिकार दिले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक हे राज्याचे अध्यक्ष असतात. विद्यार्थी अध्यक्षांना राष्ट्रपती म्हणून संबोधले जाते. राष्ट्रपतींनाही काही विशेष अधिकार दिले आहेत.

मंत्रिमंडळाची निवड प्रक्रिया

गेल्या ६२ वर्षांपासून ‘विद्यार्थी राज्याचा’ हा प्रयोग सुरू आहे. सुरुवातीला विद्यार्थिसंख्या कमी होती. त्यामुळे एकच मंत्रिमंडळ होते. आता तीन मंत्रिमंडळे कार्यरत आहेत. या मंत्रिमंडळाची निवडणूक ही पसंतीक्रमाने व गुप्त मतदान पद्धतीने होते. निवडणुकीत उभ्या असलेल्या २५ ते ३० उमेदवारांची मिळून जम्बो मतपत्रिका बनते. प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या पसंतीक्रमानुसार १ ते ५ क्रमांकाचे मत देण्याचे अधिकार असतात. गुप्त मतदान झाल्यानंतर या सर्व मतपत्रिकांची मोजणी करण्यात येते. सर्वाधिक मते असणाऱ्या आठ उमेदवारांना विजयी घोषित केले जाते. सर्वाधिक मते मिळालेल्या आठ विद्यार्थ्यांमधून हे विद्यार्थीच आपला नेता निवडतात. हा नेता मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्री निवडून आलेल्या विद्यार्थ्यांमधून गृहमंत्री, सांस्कृतिकमंत्री, क्रीडामंत्री, आरोग्यमंत्री, पर्यावरणमंत्री आणि माहिती व प्रसारणमंत्री यांची निवड करतो. एक उमेदवार हा मंत्रिमंडळाचा सभापती असतो. या सर्व मंत्रिमंडळाचा शपथविधी सर्व मतदारांसमोर भव्य प्रमाणात १ ऑगस्टपूर्वी घेण्यात येतो. संपूर्ण वर्षभर चालणारे सर्व कार्यक्रम या मंत्रिमंडळाच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात येतात. मंत्रिमंडळाच्या शैक्षणिक सत्रात दोन ते तीन आमसभा होतात. विद्यार्थी मतदार आपल्या मंत्र्यांना त्यांच्या कामाविषयी जाहीर प्रश्न विचारतात. मतदारांच्या काही मागण्या, सूचना असल्यास त्याचा निर्णय मंत्रिमंडळ विचार करून घेतो.

वेगळी प्रतिज्ञा

या शाळेच्या राज्याचे एक वैशिष्टय़ आहे. रोज शाळा भरताना जी प्रतिज्ञा म्हटली जाते ती भारताचे पहिले अर्थमंत्री, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सी.डी. देशमुख यांची आहे. ती प्रतिज्ञा म्हणजे ‘प्रजासत्ताक भारतात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेला मी आज सकाळी अशी प्रतिज्ञा घेतो की, मी माझ्या देशाशी निष्ठावंत राहीन. माझे राष्ट्र व माझी जनता यांच्या सेवेसाठी मी माझे सर्वस्व समर्पण करीन आणि माझ्या पवित्र मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करीन व देशाच्या समृद्धीसाठी कष्ट करीन. विश्वबंधुत्व आणि जागतिक शांततेसाठी प्रयत्न करीन.’ यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होऊन नवी ऊर्जा मिळत राहावी असा प्रयत्न असतो.

विद्यार्थ्यांवरील जबाबदारी

मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यावर त्यांना विविध जबाबदारी देण्यात येते. गृहमंत्र्यांकडे शिस्तीची, सांस्कृतिकमंत्र्यांकडे सांस्कृतिक कार्यक्रमांची, आरोग्यमंत्र्यांकडे साफसफाई व त्या संदर्भातील इतर व्यवस्था, क्रीडामंत्र्यांकडे क्रीडा स्पर्धासह क्रीडा साहित्याची देखभाल, पर्यावरणमंत्र्यांकडे शालेय निसर्ग परिसर, विविध निसर्ग स्पर्धाची जबाबदारी असते. विविध मंत्र्यांसोबत सभापती व उपसभापती यांनाही कामे आखून दिलेली असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत येताना शालेय गणवेशात न येता पांढरा पायजमा व नेहरू शर्ट परिधान करून विद्यार्थी येतात. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा राहावी म्हणून शाळेची गृहपद्धती ‘रेड हाऊस’ व ‘ग्रीन हाऊस’ या दोहोंत विभाजित केली आहे.

शैक्षणिक निकालही चढताच

ग्रामीण भागाची पाश्र्वभूमी लाभलेल्या या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेखही चढताच आहे. या सर्व विविधांगी उपक्रमांसह शाळेचा निकाल सातत्याने सुधारत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे नाव अग्रक्रमाने झळकते. स्पर्धात्मक परीक्षांमध्येही त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी उत्तुंग भरारी गाठली आहे. शालेय स्तरावरच्या राज्य क्रिकेट संघात या शाळेतील विद्यार्थी सातत्याने नेतृत्व करीत आलेले आहेत. विविध उपक्रमांमुळे येथील विद्यार्थी सक्रिय राहतात. परीक्षेमध्येही त्यांची गुणवत्ता झळकते. लोकशाही पद्धतीमुळे शाळेतील अनेक विद्यार्थी पुढील जीवनात व्यापारी, उद्योग, प्रशासनात, तर काही जण राजकारणातही यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. लोकशाही जीवनमूल्यांच्या माध्यमातून विद्यार्थिमनावर संवेदनशील संस्कार करणारा हा प्रयोग इतर शिक्षणसंस्थांसाठी आदर्श ठरणारा आहे.

 

प्रबोध देशपांडे

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com