गिरीश कुबेर
गेल्या आठवडय़ात या स्तंभात ‘द लॅन्सेट’ या साप्ताहिकाने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या मलेरियाच्या औषधाचा करोनाग्रस्तांवर काय परिणाम होतो यासाठी केलेल्या अभ्यासावर लिहिले. या प्रयोगासाठी जवळपास ९६ हजार रुग्णांचा सर्वात मोठा नमुना साठा ‘लॅन्सेट’ने निवडला होता. विविध खंडांत विविध वयोगटांतल्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन दिले गेले आणि त्यानंतरच्या परिणामांची शास्त्रीय नोंद ठेवली गेली. त्याचा निष्कर्ष असा होता की हायड्रॉक्सीक्लोरोक्विनने करोनाबाधितांचा काहीही सकारात्मक फायदा होत नाही. उलट झालाच तर अपायच होतो. लॅन्सेटच्या या लेखाने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे करोनावर औषध नाही, यावर शिक्कामोर्तबच झाले असे मानले गेले.
पण लॅन्सेटनेच आपला हा अहवाल रद्दबातल ठरवला. म्हणजे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे करोनावर औषध नाही यावर काही मतभेद नाहीत. पण तरीही लॅन्सेटने हा आपला अहवाल मागे घेतला. डॉ. मनदीप मेहरा यांच्यासारख्या विख्यात शल्यकाचा या पाहणीत सहभाग होता. त्यांनी प्रथम हा अहवाल मागे घेत असल्याचे निवेदन दिले आहे. लॅन्सेटच्या या कृतीने संबंधित वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली यात नवल नाही. लॅन्सेटला का करावे लागले असे?
कारण या पाहणीसाठी जो डेटा जमा केला गेला त्यातील छिद्रे समोर आली. म्हणजे काय? काही रुग्णांची नोंद आशिया खंडात असताना त्यांची गणना ऑस्ट्रेलिया खंडात केली गेली. मृतांचे तपशील अचूक नव्हते. संख्येत तफावत आढळली. रुग्णांची वर्गवारी या पाहणीत ‘आशियापॅसिफिक’ अशी केली गेली होती. तत्त्वत: भौगोलिकदृष्टय़ा तसे करणे बरोबर आहेही. पण वैज्ञानिकदृष्टय़ा चूक. या सर्व चुका समोर आल्या ‘द गार्डियन’च्या शोधपत्रकारितेमुळे. हे वर्तमानपत्र तेथेच थांबले नाही. या प्रयोगासाठीचा तपशील कोण गोळा करीत आहे त्याच्या मुळाशी ‘गार्डियन’ गेले. त्यातून एक भलताच प्रकार उघड झाला.
‘सर्जीस्फिअर’ नावाच्या एका कंपनीचे नाव यात समोर आले. ही लहानशी अमेरिकी कंपनी. या प्रयोगात तळाचा जो तपशील असतो.. म्हणजे रुग्णाचे नावगाव पत्ता, वय, त्याची लक्षणे, वैद्यकीय नोंदी.. तो जमा करण्याचे कंत्राट या कंपनीला दिले गेले होते. ही कंपनी स्वत:ला, इस्पितळसंदर्भात नोंदी असलेली जगातील सर्वात मोठी कंपनी असे म्हणवून घेते. या कंपनीत एक ‘विज्ञान संपादक’ आहे. दुसरी कर्मचारी या कंपनीची विपणन प्रमुख वगैरे आहे. याआधी २००८ साली या कंपनीने काही अचाट प्रयोगासाठी इंटरनेटच्या माध्यमातून निधी गोळा केला होता. प्रत्यक्षात तो प्रयोग आणि ज्यासाठी पैसे गोळा केले ते उत्पादन कधीही तयारच झाले नाही.
सपन देसाई हा या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी. ‘गार्डियन’ने या कंपनीची पुरती लक्तरे चव्हाटय़ावर आणल्यानंतर या कंपनीचे आणि या देसाईचे वादग्रस्त वास्तव समोर आले. त्याच्यावर याआधीही काही वैद्यकीय घोटाळे केल्याचे आरोप झाले होते. आताही तेच झाले आहे. या कंपनीचा जो ‘विज्ञान संपादक’ आहे तो प्रत्यक्षात एक जेमतेम विज्ञानकथा लेखक आहे. म्हणजे विज्ञानापेक्षा कल्पनेतच राहण्यात त्याला रस. दुसरी जी विपणन अधिकारी आहे ती तर अधिकच ‘काल्पनिक’ जगातली अशी. ही महिला प्रौढांसाठीच्या ध्वनिचित्रफितीत काम करणारी निघाली. वैद्यकीय क्षेत्राशी तिचा संबंध काय हा प्रश्नच.
असे बरेच काही ‘गार्डियन’ने उघडकीस आणल्यानंतर या कंपनीने जी काही माहिती गोळा केली तीबाबत प्रश्न निर्माण झाले. ज्या ज्या रुग्णालयांचा उल्लेख या सपन देसाई यांच्या पाहणीत होता त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ‘गार्डियन’ने खातरजमा केली. या पाहणीतील आकडेवारी आणि प्रत्यक्ष तपशील यांचा मेळ काही जुळत नसल्याचे ‘गार्डियन’ने दाखवून दिले. म्हणजे ज्या काही ९६ हजार रुग्णांवर प्रयोग झाल्याचे बोलले गेले त्याबाबतच शंका उपस्थित झाली. आणि इतक्या मूलभूत मुद्दय़ावरच संबंधित कंपनीने तडजोड केल्याचे दिसू लागल्याने पुढच्या निष्कर्षांविषयीही असाच संशय घेतला जाण्याचा धोका होता.
तो ओळखून आपण ही पाहणी कचऱ्याच्या डब्यात टाकत असल्याची घोषणा डॉ. मेहरा यांना करावी लागली. डॉ. मेहरा मॅसेच्युसेट्सला असतात. तिथले ते विख्यात हृदयशल्यक आहेत. लॅन्सेटचा हा गाजलेला अहवाल त्यांनीच लिहिला होता. सपन देसाई यांनी तयार केलेला हा आंतरराष्ट्रीय अहवाल मागे घेण्याची वेळ मनदीप मेहरा यांच्यावर आली. त्याबाबतचे निवेदन प्रसृत करताना डॉ. मेहरा यांनी देसाई यांच्या ‘सर्जीस्फिअर’ या प्रकरणाच्या चौकशीत असहकार करीत असल्याचे नमूद केले. देसाई यांच्या कंपनीने दिलेल्या तपशिलाची स्वतंत्र पडताळणी त्यामुळे होऊ शकत नसल्याचे सांगितले आणि आपल्या अहवालाला मूठमाती दिली.
दरम्यान आता हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे नव्याने मूल्यमापन केले जाईल.
विज्ञान म्हणजे काही सरकार नव्हे. त्यास आपली चूक मान्य करण्यास कमीपणा वाटत नाही. चुकायचे, शिकायचे आणि पुन्हा नव्या चुका करत पुढे जात राहायचे हा कोणत्याही विज्ञानाचा प्रवास. सध्या करोनाकाळात तो ठसठशीतपणे उठून दिसतो. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाने उडालेला धुरळा हे एक या प्रवासातील लक्षणीय उदाहरण. त्याच्या केंद्रस्थानी दोन भारतीय असावेत आणि त्यातील एकाचे वास्तव ‘असे’ असावे हा दुर्दैवी योगायोग.
@girishkuber