– गिरीश कुबेर
‘‘हा विषाणू प्रसार माणसांकडून व्हायला सुरुवात झाली आहे, हे आम्ही सरकारला सांगितलं.. पण आम्ही दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडे कोणी लक्षच दिलं नाही’’, ‘‘आम्ही या साथीची भयानकता अनुभवतोय.. पण लढायला आमच्याकडे पुरेशी आयुधं नाहीयेत.. सरकार आमच्या अवस्थेकडे लक्ष देईल का’’, ‘‘या साथीच्या प्रसाराची भयानकता मी अनुभवतीये.. रिकामे रस्ते विषण्णता वाढवतायत’’, ‘‘जनतेमधली अथांग अस्थिरता या विषाणूनं पाण्यावरही पसरवलेली दिसतीये.. समोरचा तलाव हल्ली जरा नेहमीपेक्षा जास्तच गंभीर वाटायला लागलाय’’, ‘‘संकटकाळात नागरिकांमधली सहकार्याची भावना वाढत असेल का? असेलही.. सगळे जण किती एकमेकांना मदत करतायत’’, ‘‘इतकी माणसं या साथीत गेली.. पण एकाही सरकारी अधिकाऱ्याला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटली नाही..’’ , ‘‘..आणि हे सर्व या विषाणूला पराभूत करायचं म्हणतायत, म्हणजे काय?’’
..या आणि अशा अनेक नोंदी आहेत वँग फँग या लेखिकेनं केलेल्या. आपल्या ऑनलाइन दैनंदिनीत त्या हे सगळं लिहित होत्या. रोजच्या रोज. आणि त्या वाचायला झुंबड उडत होती चीनमधल्याच नाही तर जगभरातल्या चिनी नागरिकांची. हे सर्व लिहिणाऱ्या वँग फँग यांचं लेखननाम (पेननेम) आहे फँग फँग. चीनमधल्या त्या लोकप्रिय लेखिका. त्यांचं घराणंच तसं लेखक-विद्वानांचं. २०१० साली तर चीनमधला अत्यंत महत्त्वाचा साहित्य पुरस्कारही त्यांना मिळालाय. त्यांच्या पुस्तकांना त्यामुळे नेहमीच मागणी असते. त्यांचं नवं पुस्तक कोणतं आणि ते कधी येणार आहे.. याकडे चातकानं पावसाच्या पहिल्या थेंबाकडे लक्ष ठेवावं तशी वाचकांची नजर असते. या त्यांच्या नोंदी प्रचंड वाचकप्रिय झाल्या, ‘वैबो’ या ट्विटरसारख्या समाजमाध्यमातील त्यांच्या खात्याची सदस्यसंख्या ३५ लाखांवरनं पुढे-पुढे जात राहिली.. शेवटी सरकारलाच त्यांचं खातं बंद करावं लागलं.
पण आता ही लेखिका एका मोठय़ा चिनी वाचकवर्गाला नकोशी झालीये. ६३ वर्षांच्या फँग फँग यांना कळलंही नाही आपले बहुसंख्य भाषाबांधव अचानक आपले शत्रू कधी आणि का झाले ते. त्यांचा गुन्हा, प्रमाद तो इतकाच..
..की त्या वुहान या गावच्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरात आणि यंदाच्या जानेवारीत करोनाची लाट त्यांच्या डोळ्यांदेखत तयार होत गेली आणि कोटभर वुहानमधल्या किमान चार हजारांचा घास या लाटेनं घेतला. त्याच्या या सजग लेखिकेने केलेल्या नोंदी. त्या जोपर्यंत चिनी बांधवांपर्यंतच वाचल्या जात होत्या तोपर्यंत त्यांच्याविषयी काही तशी तितकी तक्रार नव्हती. पण या नोंदींची लोकप्रियताच इतकी की ती अन्य भाषकांमधेही झपाटय़ानं पसरली. असं झालं की अन्य कोणाही लेखकाबाबत घडतं ते त्यांच्याबाबतही घडलं. हार्परकोलिन्ससह अन्य अनेक प्रकाशकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा हा ऐवज प्रकाशित करायचा मनोदय व्यक्त केला. या नोंदी इतक्या बोलक्या आहेत की इंग्रजीसह जर्मन आदी अनेक भाषांतून त्या प्रसिद्ध करण्याची तयारी या प्रकाशनांनी दाखवली. त्याप्रमाणे तयारी झाली. भाषांतरं झाली. पुस्तकाचं नाव ठरलं.
‘वुहान डायरी’
आणि त्यानंतर मात्र फँग फँग यांचं दुष्टचक्र सुरू झालं. चीन सरकार प्रेरित समाजमाध्यमी जल्पकांच्या झुंडीच्या झुंडी क्षणाक्षणाला फँग फँग यांच्यावर चालून येऊ लागल्या. काहींनी जमेल तितक्या कुजकट भाषेत त्यांची नालस्ती सुरू केली. ‘‘चार हजार वुहानी थडग्यांवर आपली चूल पेटवताय.. अभिनंदन फँग फँगबाई,’’ अशा प्रकारचे व्हॉट्सॅप सदृश चिनी संदेश, वैबो/ट्वीट वगैरे त्यांच्या नावानं, त्यांच्या कुटुंबीयांच्या नावानं फिरायला लागले. किंवा फिरतील अशी व्यवस्था केली गेली. काही ‘वपर्यंत हात’ पोहोचलेले होते त्यांनी या आगामी पुस्तकाच्या प्रकाशकांनाही धमकवायला कमी केलं नाही. हा रेटा, दबाव इतका होता की या पुस्तकाच्या जर्मन आवृत्तीचं मुखपृष्ठ बदलायचा निर्णय जर्मन प्रकाशनांनी घेतला. साधारण केशरी रंगाच्या मुखपृष्ठावर कुळकुळीत काळ्या रंगातली मुखपट्टी आणि त्या आडव्या पसरलेल्या मुखपट्टीखाली हलक्या पिवळ्या अक्षरात पुस्तकाचं नाव : वुहान डायरी.
याचा कळसाध्याय गेल्या आठवडय़ात लिहिला गेला.. सरकारी मालकीच्या सर्वात मोठय़ा वर्तमानपत्रानं फँग फँग यांना ‘राष्ट्रद्रोही’ म्हणून जाहीर केलं. आपल्या मायदेशाची बदनामी करणाऱ्या अस्तनीतल्या निखाऱ्यांना ठेचून काढलं पाहिजे.. या आपल्याला परिचित भाषेचं चिनी भाषांतर त्यांच्याबाबत वापरलं गेलंय. फँग फँग आता एकाकी पडल्यात. सोव्हिएत रशियाच्या काळात आंद्रे साखारॉव्ह यांची जी अवस्था झाली असेल ती आता त्यांची झालीये.
आता जगाला त्यांच्या या पुस्तकाची प्रतीक्षा आहे. जून महिन्यात येऊ घातलंय ते. आणि फँग फँग यांनी जाहीर केलंय.. या पुस्तकाच्या स्वामित्व हक्कापोटी मिळणारी सर्व रक्कम त्या समाजकार्याला देणार आहेत.
अॅन फ्रँकनंतर बहुधा फँग फँग यांचीच दैनंदिनी इतकी ‘श्रीमंत’ ठरेल. दोन्हीत आणखी एक समान धागा आहे.. दोन्ही दैनंदिन्या माणसांचं दारिद्रय़च दाखवतात.
@girishkuber