एजाजहुसेन मुजावर aejajhusain.mujawar@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सततच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या सोलापूर जिल्ह्याने गेल्या काही वर्षांत शेती क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. पारंपरिक ज्वारी, ऊस आदी पिंकांसोबतच येथील शेतकरी मोठया प्रमाणात फळ लागवडीकडे वळले आहेत. यामध्ये प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यातच करमाळा तालुक्यातील कविटगावमध्ये एका शेतकऱ्याने केलेल्या ‘काळय़ा गव्हा’च्या शेती प्रयोगाची सध्या चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यात अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली असून या शेतकऱ्यांनी बौध्दिक कौशल्याने नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून आत्मविश्वासाने शेतीचे अभिनव प्रयोग यशस्वी केले आहेत. सततच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या सोलापुरात पारंपरिक पध्दतीने घेतली जाणारी पिके बाजूला ठेवून निर्यातक्षम केळी, डाळिंब, पेरू, बोरांपासून ते खजूर, सफरचंद, जपानी फळांपर्यंत विविध फळशेतींचे प्रयोगांसाठी सोलापूरच्या शेतकऱ्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यात करमाळा तालुक्यातील कविटगावच्या राम चौधरी या तरूण शेतकऱ्याने केलेल्या ‘काळय़ा गव्हा’च्या शेती प्रयोगाचीही भर पडली आहे.

सोलापूर जिल्हा तसा ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला. विशेषत: येथील मंगळवेढय़ाला ज्वारीचे कोठार म्हणून आजही ओळखले जाते. येथील मालदांडी ज्वारीला प्रचंड मागणी असते. ज्वारीच्या तुलनेत गव्हाचे उत्पादन अपवाद म्हणूनच होते. किंबहुना गव्हाच्या उत्पादनाशी सोलापूरचा फारसा संबंध येत नाही, अशी पूर्वपीठिका आहे. मात्र पारंपरिक गव्हाच्या उत्पादनाच्याही पुढचा विचार करून राम चौधरी यांनी काळय़ा गव्हाची शेती करून त्याची ओळखही करून दिली आहे. चौधरी यांच्यासह जवळच्या सांगोला, माळशिरस भागात तसेच सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात अकोट परिसरातही काही शेतकरी काळय़ा गव्हाच्या शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे या शेतीविषयीचे कुतूहल वाढले आहे. परंतु या काळय़ा गव्हाच्या शेतीबद्दल तेवढाच प्रवादही निर्माण झाला आहे. यात दावे-प्रतिदावे केले जात असल्यामुळे आता शासनानेच अधिकृत भूमिका स्पष्ट करायला हवी, असे वाटते.

कविटगावच्या राम चौधरी यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात प्रयोगादाखल एक एकर क्षेत्रात काळय़ा गव्हाची लागवड केली होती. त्यात आंतरपीक म्हणून सीताफळाची लागवड केली होती. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता शेणखताचा पुरेपूर वापर करून सेंद्रिय पध्दतीने काळय़ा गव्हाचे उत्पादन घेतले. पहिल्या वर्षी एकरी नऊ क्विंटल उत्पादन आले. बाजारात काळय़ा गव्हाचा दर जास्त म्हणजे प्रतिकिलो शंभर रुपये एवढा मिळतो. त्यानुसार चौधरी यांना नऊ क्विंटल काळय़ा गव्हाच्या उत्पादन विक्रीत ९० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु त्यांनी सुरुवातीला निम्म्या दरानेच तेसुध्दा ओळखीच्या व्यक्तींना काळा गहू विकला. तर काही प्रमाणात बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विकला. जेणेकरून इतर शेतकरीही काळय़ा गव्हाच्या शेतीकडे वळावेत हा त्यामागचा हेतू. आता दुसऱ्या वर्षी चौधरी यांनी लागवड केलेल्या काळय़ा गव्हाचे जोमदार पीक बहरू लागले आहे. मात्र पेरणी केल्यापासूनच त्यांच्याकडे काळय़ा गव्हाची आगाऊ मागणी वाढली आहे. यात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर भागातूनही शेतकऱ्यांनी बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. तर काहीजणांनी खाण्यासाठीही काळय़ा गव्हाची विचारणा करीत असल्याचे चौधरी सांगतात.

देशात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन प्रामुख्याने पंजाब-हरियाणाची नावे समोर येतात. गहू म्हटला की डोळय़ांसमोर सहजपणे गव्हाळ रंग येतो. मात्र काळय़ा रंगाचा गहू असतो यावर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. नेहमीच्या गव्हाच्या तुलनेत काळा गहू अतिशय पौष्टिक मानला जातो. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश येथे काळय़ा गव्हाची पैदास होत आहे. त्याचे लोण महाराष्ट्रातही येत आहे. काळय़ा गव्हाचे संशोधन पंजाबच्या मोहाली येथील राष्ट्रीय कृषी खाद्य जैव तंत्रज्ञान संस्थेत झाले आहे. त्याचे श्रेय मोनिका गर्ग यांना दिले जाते. या काळय़ा गव्हाला ‘नबी एमजी’ असे नाव देण्यात आले आहे. हा गहू केवळ काळय़ाच रंगात नव्हे तर निळय़ा आणि जांभळय़ा रंगातही उपलब्ध आहे.

काळय़ा गव्हाच्या लागवडीसाठी येणारा खर्च सामान्य गव्हाच्या लागवडीपेक्षा कमी होतो. कारण त्यावर सहसा कोणताही रोग पडत नाही. जमिनीखालच्या बुंध्याला कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होत नाही. चौधरी हे याविषयी स्वानुभवाने सांगतात. राम चौधरी यांची शेतजमीन हलकी व मध्यम प्रतीची आहे. याच शेतजमिनीवर मुख्य पीक सीताफळ असताना आंतरपीक म्हणून काळय़ा गव्हाची लागवड गेल्या नोव्हेंबरमध्ये केली आहे. आठवडय़ातून एकदा पाटाने पाणी देतो. सध्या काळय़ा गव्हाच्या पिकाची उंची साधारणत: साडेचार फुटापर्यंत वाढली आहे. पाच महिन्यात पीक येते. त्यानुसार येत्या मार्चमध्ये काळय़ा गव्हाचे उत्पादन हाती येईल, असे चौधरी सांगतात.

तज्ज्ञ मंडळींच्या म्हणण्यानुसार काळा गहू सामान्य गव्हापेक्षा बराच पौष्टिक आहे. कारण या गव्हामध्ये िझक म?ग्नेशियम, लोह आदी अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज लवकर भरून येण्यास मदत होते. तसेच काळय़ा गव्हामध्ये प्रथिनांची मात्राही जास्त आहे. अ‍ॅन्टिआ?क्सिडंट आणि अँथोसायनीन हे घटकही सामान्य गव्हापेक्षा जास्त प्रमाणात आहेत. त्यात रोगप्रतिकारक शक्ती आहे. हा काळा गहू मधुमेही आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी पोषक असल्याचे मानले जाते. काळय़ा गव्हामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात. त्यामुळे मल:निसारण व्यवस्थित होते, असे प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव (कळंब, जि. उस्मानाबाद) या अभ्यासकाचा दावा आहे.

अशाप्रकारे काळय़ा गव्हाचे नैसर्गिक गुण विचारात घेतले तर भविष्यात हा काळा गहू खाणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांनाही फायद्याचा ठरू शकतो. मोहालीच्या राष्ट्रीय कृषी अन्न जैव तंत्रज्ञान संस्थेत (नॅशनल अ‍ॅग्रो फूड बायो टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटमधील नबी) एमजी गव्हाच्या लागवडीसाठी झालेल्या प्रयोगानुसार येणारा सर्वसाधारण खर्च याप्रमाणे : नांगरणी-१५०० रूपये, रोटर-१००० रुपये, बियाणे (३५ किलो ६० रूपये दराने)-२१०० रुपये, खत-६०० रूपये याप्रमाणे एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च येतो.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karmala taluka farmers experiment with black wheat zws
First published on: 25-01-2022 at 00:24 IST