पैठणी ही अनेकींसाठी मर्मबंधातली ठेव, महाराष्ट्राचा वस्त्रवारसा आणि संस्कृतीही. हाच धागा पकडून पैठणीच्या निर्मिती क्षेत्रातली पुरुषी मक्तेदारी खोडून काढत स्वत:चा ब्रॅन्ड तयार करणाऱ्या अस्मिता. सुरुवातीला विक्री, त्यानंतर निर्मिती आणि नंतर ‘विव्हर्स ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या माध्यमातून येवल्यात शास्त्रीय पैठणी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून त्यांनी अनेकांना या व्यवसायात उभे राहाण्यास मदत केली. पैठणी विक्री आणि निर्मिती बरोबरच स्त्री पैठणी विणकर तयार करणाऱ्या, आजच्या दुर्गा आहेत, पैठणी उद्योजिका अस्मिता गायकवाड.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय स्त्रियांच्या पारंपरिक साड्यांमध्ये पैठणीला मोलाचे स्थान आहे, महाराष्ट्राची कला आणि संस्कृती जपणारी ही साडी अनेकींच्या जिव्हाळ्याचा विषय! मात्र पैठणी तयार करण्याच्या पूर्वापार व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी होती, ती मक्तेदारी मोडीत काढत अस्मिता गायकवाड पैठणी निर्मितीच्या क्षेत्रात तर उतरल्याच, परंतु पुढच्या पिढीला या निर्मितीचा वारसा देण्याच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमही तयार केला. त्यातून आज अनेक विद्यार्थी तयार झाले असून अनेकांनी आपला स्वतंत्र व्यवसायही सुरू केला आहे. अस्मिता गायकवाड गेली १२ वर्षं पैठणी निर्मिती क्षेत्रात असून ५० हजार रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा पैठणी व्यवसायाचा प्रवास २ कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे.

पूर्वी या व्यवसायात स्त्रियांची भूमिका कच्च्या मालाची तयारी, हातमागाची स्वच्छता, जर काढून देणे, पैठणीची नीटनेटकी घडी घालणे इथपर्यंत मर्यादित होती. परंतु, पैठणी व्यवसायात स्वत: उतरून येवला येथील अस्मिता यांनी आज प्रसिद्ध पैठणी उद्याोजिका असा नावलौकिक मिळविला आहे.

हेही वाचा >>> Loksatta Durga 2024 :अनाथ नाथे..

पैठणी ही महाराष्ट्राचे कलावैभव असली, तरी या अमूल्य वारशाचे जतन होण्यासाठी फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. ही बाब अस्मिता यांना खटकत होती. मायक्रोबायोलॉजीत पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या अस्मिता यांची ही अस्वस्थताच पैठणी निर्मितीच्या त्यांच्या स्वतंत्र व्यवसायाची बीजे रोवणारी ठरली. पदवीनंतर नोकरी न करण्याचे ठरवून अस्मिता यांनी नाशिक गाठले. वडील विक्रम गायकवाड यांनी त्यांच्यापुढे विविध पर्याय ठेवले. त्यांनी कुठलीही पार्श्वभूमी आणि अनुभव नसताना पैठणी निर्मितीच्या व्यवसायाची निवड केली. वडिलांची ‘विणकरांशी असलेली ओळख’ या फक्त एका धाग्यावर त्यांनी या नवख्या क्षेत्रात उडी घेतली. पैठणीचा इतिहास, ती कशी विणली जाते, त्याचे तंत्र, त्यातील वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी येवला येथील शांतीलाल भांडगे यांची मदत घेतली. आणि हळूहळू त्यांनी यातील सगळ्या क्षेत्रांचा बारकाईने अभ्यास सुरू केला. अनुभवी लोकांचे म्हणणे जाणून घेताना अस्मिता यांनी स्वत:चे काही मुद्दे नोंदविण्यास सुरुवात केली. आणि २००९मध्ये त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यावेळी स्त्री म्हणून खऱ्या अर्थाने अडचणी जाणवण्यास सुरुवात झाली. परंतु, ‘शिकत राहण्याच्या वृत्ती’ने त्या कार्यरत राहिल्या. अल्पावधीतच त्यांनी कारागिरांना पैठणी निर्मितीच्या पूर्वतयारीपासून विपणनापर्यंतची माहिती देणारा ‘डिप्लोमा इन पैठणी हॅण्डिक्राफ्ट अॅण्ड मॉडर्न गारमेंट’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’च्या मदतीने तयार केला. त्यामुळेच ‘विवर्स ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’ च्या माध्यमातून येवला येथे शास्त्रीय पैठणी प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. या केंद्रातील पहिल्या तुकडीत २०० विद्यार्थी प्रशिक्षित झाले. या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना पारंपरिक पैठणी उद्याोगात कुशल कारागीर म्हणून मुख्य आर्थिक प्रवाहात सामावून घेण्यात आले. या कारागिरांना बदलत्या बाजारपेठेच्या गरजा लक्षात येण्यासाठी ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’च्या माध्यमातून विपणनासाठी त्यांनी आणखी एक १५ दिवसांचा संगणकीय- ऑनलाइन प्रशिक्षणाचा उपक्रम तयार केला. हे सर्व करीत असताना येवला औद्याोगिक वसाहतीत प्रशिक्षण केंद्रासाठी जागा मिळविणे, तयार उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे, कामात सातत्य ठेवणे, ही आव्हाने अस्मिता यांनी लीलया पार पाडली.

या प्रशिक्षणानंतर तसेच मुंबई, दिल्ली येथे काही प्रदर्शनात पैठणी विक्रीला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आपण स्वत: हा व्यवसाय का करू नये, या विचारांचं बीज अस्मिता यांच्या मनात रुजले आणि त्या विचारातूनच ‘गोल्डन विवज’ या ब्रॅण्डचे रोप लावले गेले. आज त्याचा भरघोस वृक्ष तयार झाला आहे. मधल्या काळात करोनाच्या साथीमुळे प्रशिक्षण केंद्रातील हातमाग हे विणकरांच्या हाती सोपवण्यात आले. त्याचा फायदा असा झाला की, संबंधित कारागिरांनी ही कला आपल्या घरी कुटुंबातील सदस्यांनाही शिकवली. येवल्यासारख्या शहरात स्त्रियाही आता पैठणी विणकर झाल्या. अनेक हातांना काम मिळाले. त्यांच्या उत्पादनातही भर पडली. आज ५०० पेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळाला आहे.

‘गोल्डन विव्हज’मध्ये पैठणीबरोबर या पैठणीची नक्षी, कलाकुसर, नजाकत वापरत पर्स, की चेन, बँगल बॉक्स, दुपट्टा, कुर्ती, जाकीट, मोबाइलचे आवरण, अशी वेगवेगळी ‘सबकुछ पैठणी’ असलेली उत्पादने आली. या उत्पादनांचे ऑनलाइन विपणन सुरू झाले. हे करीत असताना अस्मिता यांना कौटुंबिक अडचणींनाही तोंड द्यावे लागले. परंतु, पती सचिन कळंबे, मुलगा अन्वय, वडील विक्रम गायकवाड आणि आई यांच्या मदतीने त्यांनी जिद्दीने काम सुरू ठेवले. इतके की त्यांच्या कामातील वेगळेपणामुळे ‘गोल्डन विव्हज’ने सातासमुद्रापार आपला ठसा उमटवला आहे.

पैठणीची ऑन आणि ऑफलाइन विक्री, अनेक प्रकारच्या पैठणींची निर्मिती आणि पुढे जाऊन पैठणीचा इतिहास, संस्कृती, कलेचा वारसा पुढच्या पिढीच्या हाती सोपविणारा अभ्यासक्रम तयार करणाऱ्या पैठणी उद्याोजिका अस्मिता गायकवाड यांना ‘लोकसत्ता’चा सलाम!

charu.kulkarni85@gmail.com

संस्थेचे नाव महात्मा फुले अकादमी, 

नाशिक संचालित विव्हर्स ट्रेनिंग ,

रीसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, येवला

पत्ता गोल्डन विव्हज पैठणी, येवला

प्लॉट ५०, गोल्डन विव्हज पैठणी शोरूम, अंगणगाव, येवला

संपर्क क्रमांक — ९४२२२९२२५६

७२१९२६५५५५

ईमेल :

asmitagaikwad18@gmail.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta durga 2024 paithani manufacturer asmita gaikwad in yeola zws