मंदार लोहोकरे
अनाथ आणि तीही एचआयव्हीबाधित-एड्सग्रस्त बालके, जी दोन वर्षेही जगणार नाहीत असे सांगितले गेले होते, तीच मुले वाढली, शिकली, कमवती झाली आणि आज समाजात प्रतिष्ठित आयुष्य जगत आहेत. त्या सगळ्याच्या मागे आहेत, मंगलताई आणि त्यांची ‘पालवी’ ही संस्था. १८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेत आज १०० मुले असून यांतील २२ मुले इथेच मोठी होऊन स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत. तर अनेकांचे वैवाहिक आयुष्यही सुरू झाले आहे. समाजानेच वाळीत टाकलेल्या मुलांच्या आई झालेल्या आजच्या दुर्गा आहेत, मंगल शहा.
निराधार, अनाथ आणि तीही एचआयव्हीबाधित-एड्सग्रस्त बालके, ज्यांना समाजाने वाळीत टाकलेले, इतके की त्यातील कुणी कुत्र्या-मांजरांची शिकार झाले तर कुणी गोठय़ात गाई-म्हशींच्या बरोबरीने वाढत होते, अशा लेकरांची आई होऊन त्यांना प्रतिष्ठित आयुष्य देणाऱ्या मंगलताई शहा. त्यांच्या ‘पालवी’ या संस्थेत गेली १८ वर्षे वाढत असलेली ही मुले आज स्वत:च्या पायावर उभी असून मंगलताईंच्या या कार्याचा यज्ञ अखंडित आणि अव्याहत सुरू आहे.
अठरा वर्षांपूर्वी एच.आय.व्ही.विषयी बोलणेही पाप समजले जात होते त्या काळात मंगलताई एच.आय.व्ही -एड्सबाबत प्रबोधन करण्याकरिता एका खेडेगावांमध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांना गुरांच्या गोठय़ात टाकून दिलेली दोन बालके नजरेस पडली. त्या बालकांची अवस्था अतिशय दयनीय होती. अंगावरती बोटभर चिंधी नाही, केसांच्या जटा झालेल्या, इतकेच नाही तर संपूर्ण अंगावर जखमा झालेल्या, अशा अवस्थेत ही मुले पडलेली. गोठय़ातल्या जनावरांचे आणि या मुलांचे मलमूत्र एकत्र होत होते. हे सारे पाहून मंगलताई अस्वस्थ झाल्या आणि या दोन्ही मुलांना थेट घरी घेऊन आल्या. एचआयव्ही, एड्सबाधित झालेल्यांना अक्षरश: वाळीत टाकले जाण्याचा तो काळ होता. अशा वेळी मंगलताईंनी मोठा विधायक निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने अशा वंचित आणि बाधित मुलांसाठी आशेची एक ‘पालवी’ फुटली. मंगलताईंनी त्यांच्यासाठी ‘पालवी’ नावाने संस्थाच सुरू केली.
या दोन बालकांचे संगोपन चालू असताना काहींनी अमुक एका गावात एड्सग्रस्त बालक जन्माला आले आहे, त्याला सांभाळता का? असे विचारत अशा मुलांना मंगलताईंकडे आणायला सुरुवात केली आणि अशा बालकांची संख्या वाढू लागली. शहराजवळ कोर्टी या ठिकाणी सुरुवातीला एका छोटय़ा खोलीत या बालकांच्या संगोपनाचे काम सुरू झाले. ही बालके बाधित तर होतीच शिवाय अनाथही होती. त्यामुळे त्यांना सांभाळण्यासाठी मदतीला दुसरे कोणी येईना. त्या वेळेस मंगलाताईंची मुलगी डिंपल हिने आईला साथ द्यायचे ठरवले. तिचा पती राजकुमार घाडगे हेही या कार्यात सामील झाले. वास्तविक पाहता यामध्ये आर्थिक फायदा तर नव्हताच उलट आर्थिक सोय करावी लागत होती. शासकीय तुटपुंजी मदत मिळवण्यासाठी वेगळाच आटापिटा करावा लागत होता. अशा कठीण परिस्थितीतही मंगलताईंनी आपले कार्य चालूच ठेवले.
या एचआयव्हीबाधित वा एड्सग्रस्त मुलांचे आरोग्य हा कायमच चिंतेचा विषय होता. त्यांना सातत्याने तपासणीची आणि औषधांची गरज होती. सुरुवातीच्या काळात त्यांना तपासण्यासाठी येण्यास डॉक्टरही नकार देत असत. अशा वेळी मंगलताईच या मुलांच्या अंगावरच्या जखमांचं ड्रेसिंग करीत असत. मंगलताई आणि परिवाराचं हे नि:स्वार्थी काम हळूहळू आपला परिणाम दाखवत गेलं आणि मुले बरी होऊ लागली. हसू, खेळू लागली. मुले वाढू लागली आणि एक यक्षपश्न निर्माण झाला. या मुलांच्या शिक्षणाचे काय? या मुलांना घेण्यास कोणतीच शाळा तयार नव्हती. पण या बाधित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे तर त्यांना शिकवणे भाग होते. उद्याची पिढी सक्षम होणे गरजेचे होतेच, पण पुढच्या काळात या मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे अधिक गरजेचे होते. मंगलताईंनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी सरकारदरबारी खेटे घालणे. विविध दाखले, परवानगी घेणे त्यासाठी पैसेही खर्च केले. सातत्याच्या आणि अथक प्रयत्नांना यश आले आणि या मुलांसाठी शाळेला मंजुरी मिळाली.
‘पालवी’ जोमाने वाढू लागली. बघता बघता इथल्या मुलांची संख्या १०० वर येऊन पोहोचली. या शाळेत आजही नियमित शालेय शिक्षणाबरोबर मुलांवर वेगळे संस्कार व्हावेत यासाठी शूर वीरांच्या कथा, गोष्टी, विविध गाणी, भारतीय साहित्याची ओळख त्यांना करून देण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित उपचारांमुळे येथील मुलांची वयोमर्यादा वाढलेली असून विविध संधीसाधू आजारांवर त्यांनी मात केली आहे. १८ वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण झालेल्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. इतकेच नाही तर इथेच मोठय़ा झालेल्या तरुणांचे वैवाहिक आयुष्यही सुरू झाले आहे. ‘आम्ही प्रकाश बीजे’ या पालवीतील बालकांचा नृत्य-संगीतात्मक व्यावसायिक कार्यक्रमाचे महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. तो अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
या मुलांना, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी टाकाऊतून टिकाऊ अशा पर्यावरणपूरक, इकोफ्रेंडली वस्तू निर्मितीचा उद्योगही मंगलताईंनी सुरु केला असून पर्सेस, गोधडय़ा, टोपल्या, पुष्पगुच्छ अशा वस्तू मोठय़ा प्रमाणात तयार होत आहेत. मात्र त्याला योग्य ती बाजारपेठ मिळत नाही, ही मंगलताईंची खंत आहे.
खरे तर एचआयव्हीसह जगणारी विपन्नावस्थेतील दोन बालके सापडल्यामुळे ‘पालवी’ची सुरुवात झाली होती. त्या वेळी या मुलांना फक्त जगवण्याचे उद्दिष्ट होते. बघता बघता ती जगती झाली, लिहिती झाली, शिक्षित झाली, कमवती झाली आणि मग १८ वर्षे पूर्ण करून प्रपंचालासुद्धा लागली. आज इथले २२ तरुण स्वत:च्या पायावर उभे आहेत.
एच.आय.व्ही.सह जगणारी जी मुले दोन-चार वर्षेही जगणार नाहीत असे वाटले होते ती आज विशी पूर्ण करून प्रतिष्ठित आयुष्य जगत आहेत. पण अजूनही अडचणीचा डोंगर मोठाचा होत चालला आहे. दुर्दैवाने येथे येणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कुत्र्या-मांजराने अक्षरश: फाडलेल्या लेकरांना जगवायचं कसं? असा प्रश्न समोर ठाकतो आहे; कारण अपुरा निधी, अपुऱ्या सेवा-सुविधा यांच्याशी लढताना बळ कमी पडत आहे. हे बळ समाजातली लोकच मिळवून देतील, कुटिरोद्योगाला चालना मिळून येथील मुले, तरुण-तरुणी स्वयंपूर्ण होतील अशी मंगलताईंना आशा आहे. ‘पालवी’च्या कार्याचा विस्तार आणि प्रचार होणे म्हणूनच गरजेचे आहे.
पालवी, पंढरपूर, जिल्हा सोलापूर
संपर्क : ९८८१५३३४०३, ९८६००६९९४९
वेबसाइट : http://www.palawi.org
ईमेल : info@palawi.org
cglohokare@gmail.com
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा
सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक, इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)
टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा