एजाजहुसेन मुजावर aejajhusain.mujawar@expressindia.com

गेल्या ७ वर्षांत तहसीलदारपदावर राहून १ हजार वाळू वाहतुकीची वाहने जप्त करणाऱ्या, त्यातून ७ कोटी रुपयांचा दंड वसूल करणाऱ्या शिल्पा ठोकडे यांनी त्याशिवाय नदी पुनरुज्जीवन, ‘जटामुक्ती’, ‘दाखलेमुक्त शाळा’ आदी अनेक कल्याणकारी उपक्रम, योजना राबवीत तहसीलदारपदाचं महत्त्व सिद्ध केलं आहे. वाळूमाफियांसाठी रणरागिणी ठरलेल्या आजच्या दुर्गा आहेत, कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे.

देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची ‘आधुनिकता’ ही स्त्रियांसाठी जमेची बाजू आहे. असंख्य पुरुषप्रधान क्षेत्रांत स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे, तर काही कर्तबगार स्त्रियांनी त्याही पुढे जाऊन पुरुषांच्याच कामात आपलं वर्चस्व सिद्ध केलं. महसूल खात्यात तहसीलदारपदी असलेल्या, वाळूमाफियांच्या पायाखालची वाळूच संपवणाऱ्या शिल्पा ठोकडे त्यांपैकीच एक उत्तम उदाहरण ठरावे. गुंडगिरी वा राजकीय दबावाला झुगारून वाळूमाफियांसाठी रणरागिणी बनत शिल्पा ठोकडे यांनी गेल्या ७ वर्षांत १ हजार वाळू वाहतुकीची वाहने जप्त करून ७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतकंच नव्हे तर नदी पुनरुज्जीवन, ‘जटामुक्ती’, ‘दाखलेमुक्त शाळा’ आदी अनेक कल्याणकारी उपक्रम, योजना गोरगरीब, वंचितांपर्यंत पोहोचवत आपल्या तहसीलदारपदाचं महत्त्व सिद्ध केलं आहे.

सोलापूर जिल्ह्य़ातील कुर्डूवाडी येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेली आणि सर्वसामान्य परिस्थितीतून शालेय शिक्षण घेतलेली एक सामान्य मुलगी अशीच शिल्पा ठोकडे यांची सुरुवातीची ओळख होती. घर आणि शेतीची कामं करीत असतानाच त्यापलीकडे जाण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं. प्रतिकूल परिस्थितीतही घरातून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे आणि शिक्षकांच्या पाठबळामुळे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयाची विज्ञान शाखेची पदवी त्यांनी मिळविली. आत्मविश्वास वाढण्यासाठी ते मोठं पाऊल होतं. पुढे हेच पाऊल दमदार ठरत फौजदारपदापर्यंत पोहोचलं.

१९९७-९८ मध्ये पुण्यात जाऊन शिल्पा ठोकडे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या पोलीस खात्यात फौजदार झाल्या. अशोक कामटे (नंतर ते शहीद झाले.) यांच्या देखरेखीखाली मुंबईत पोलीस प्रशासनात काम करीत असताना पोलीस खात्यापेक्षा महसूल खाते त्यांना अधिक महत्त्वाचं वाटलं. स्पर्धा परीक्षेद्वारे त्या तहसीलदार बनल्या. २००३ मध्ये त्यांची निवड झाली ती नायब तहसीलदार म्हणून. सोलापूर जिल्ह्य़ात सांगोला व पंढरपूर आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडल्यानंतर शिल्पा यांची तहसीलदार म्हणून २०१२ नेमणूक झाली ती दक्षिण सोलापूरमध्ये. भीमा आणि सीना नदीचं पात्र असलेला दक्षिण सोलापूर हा तसा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेला तालुका. गुंडगिरी, वाळूतस्करी राजकीय आश्रयाने वर्षांनुवर्ष चालत आल्यामुळे हा तालुका तसा बदनाम झालेला. त्या वेळी जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही साथ कितपत मिळेल, याची शंका होती. तालुक्यात फिरताना राजरोसपणे चालणाऱ्या वाळू तस्करीकडे आणि त्यात अडकणाऱ्या तरुणांकडे, त्यांच्या गुंडगिरीकडे पाहताना शिल्पा अस्वस्थ व्हायच्या. हा गैरव्यवहार थांबवणं लोकांच्या, परिसराच्या, पर्यावरणाच्या, राज्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं होतं. वाळू तस्करांना कायद्याची े भीती नव्हती आणि वाळू तस्करांची भीती शिल्पा यांना अजिबात नव्हती. त्यातल्या धोक्यांची त्यांना पूर्ण कल्पना होती, तरीही कुणी तरी ते करणं भाग होतंच. मग मी का नाही, असा रास्त सवाल करत त्यांनी वाळू तस्करांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला. येथील तीन वर्षांच्या काळात त्यांनी सहाशेपेक्षा अधिक वाळू वाहतुकीच्या मालमोटारी पकडल्या. १५० गाडय़ांवर गुन्हे दाखल केले. त्यातून तीन कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला. वाळूउपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नदीच्या पात्रातील बोटीही जप्त केल्या. काही वेळा अशा बोटी जाळूनही टाकल्या. रात्री-अपरात्री होणाऱ्या अशा कारवाईच्या वेळी शिल्पा यांना नदीपात्रात अगदी कर्नाटक हद्दीपर्यंत पोहत जावं लागलं. इतकंच नाही तर अगदी चित्रपटात शोभतील अशा पाठलागाच्या घटनाही घडल्या. अवैध वाळू वाहतूक करणारा पाठलाग लक्षात आल्यावर मालमोटर रस्त्यातच सोडून पळून जायचा. अशा वेळी शिल्पा यांनी स्वत: त्या गाडीचं स्टीअरिंग हातात घेऊन गाडी पोलीस ठाण्यापर्यंत आणलेली आहे. अशा ठोस कारवाईच्या वेळी त्यांच्यातील ‘फौजदार’ जागा व्हायचा. इतका की वाळू तस्करांच्या पायाखालची वाळू सरकायची. पण माफियाही गप्प बसणारे नव्हतेच. त्यांनी शिल्पांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या. २०१२ पासून सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात तहसीलदारपदी कार्यरत असणाऱ्या शिल्पा यांनी आत्तापर्यंत १००० वाळू वाहने जप्त केली असून सुमारे ७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई सोपी नव्हतीच. यातला संघर्ष अपरिहार्य होता.

वाळूमाफियांचे हस्तक त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवू लागले. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. नुसत्या फोनवरून नाही तर ग्रामीण रस्त्यावर त्यांना प्रत्यक्ष धमकावण्याचेही प्रकार घडले आणि त्याचंच रूपांतर वाळू तस्करांशी, त्यांच्या हस्तकांशी प्रत्यक्ष दोन हात करावे लागले. तेव्हा वाळू तस्करांना संरक्षण देणारे हितसंबंधी राजकीय पुढारी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना, ‘जिवाला धोका होईल एवढे धाडस दाखवू नका, हवी तर बदली करून घ्या. एखाद्या इच्छित स्थळी बदली हवी असेल तर आपण करून देऊ,’ असा साळसूदपणाचा सल्ला देत; परंतु त्या नमल्या नाहीत.

वाळूमाफियांविरुद्ध लढा सुरू असतानाच त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीही केल्या.

शासनाच्या ‘समाधान’ योजनेसाठी उभारलेल्या मंडपातच एखाद्या गरीब मुला-मुलीचे लग्न लावून देण्याची कल्पना त्यांना सुचली. एका अनाथ मागासवर्गीय तरुणाचे लग्न ठरले खरे पण मुलीच्या बाजूने ही जबाबदारी घेईल असे कोणी नाही, हे लक्षात आले तेव्हा शासकीय कार्यक्रमातच त्या मुला-मुलीचे लग्न थाटात करण्यात आले. या दुष्काळी तालुक्यात अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी भरीव प्रयत्न हाती घेतले. कोल्हापूर जिल्ह्य़ात आजरा येथे तहसीलदार असताना शिल्पा ठोकडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे दाखले मोफत वाटप करीत १८ गावं ‘दाखलेमुक्त’ केली. सहा गावांतील पाणंद रस्त्यांचे प्रश्न सोडवून हजारो शेतकऱ्यांना दिलासा दिला. बहिरेवाडीतील सहा स्त्रियांना ‘जटामुक्त’ करून समाजातील अंध:श्रद्धा, अनिष्ट रूढी व परंपरांना छेद देण्याचाही प्रयत्न केला. अशा प्रकारे केलेल्या प्रशासकीय सेवेची दखल समाजातील विविध संस्था-संघटनांनी घेत, शिल्पा ठोकडे यांना अनेक पुरस्कारांनी गौरविलं आहे.

आपल्या पदाचा मान राखत धोक्याशीच दोन हात  करणाऱ्या आणि राज्याबरोबरच पर्यावरणाचंही संरक्षण करणाऱ्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना आमचा सलाम!

शिल्पा ठोकडे shilpathokde@gmail.com

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि

व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स

पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि.,

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक,

इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ)

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा