प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील दोन वर्षांपासून लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव देशात होत आहे. यंदा उत्तर भारतात या रोगाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाला आहे. महाराष्ट्रातही ७१ गावांतील पशुधनाला या रोगाचा संसर्ग झाला आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सद्य:स्थिती, सरकारी उपाययोजना आणि पशुपालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? या साऱ्याचा या दोन लेखातून घेतलेला आढावा..

एकेकाळी सातासमुद्रापार असलेल्या ‘लम्पी’ या संसर्गजन्य आजाराने विदर्भ व मराठवाडय़ातील पशुपालकांची चिंता वाढवली आहे. सध्या विदर्भ व मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढत आहे. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे त्यावर प्रभावी असा उपचार उपलब्ध नाही. उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये, या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘लम्पी’ आजाराने असंख्य जनावरे बाधित होत आहेत. ‘लम्पी’ त्वचा रोग हा गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील ‘कॅप्रीप्लॉक्स’ या प्रवर्गात मोडतात. हा एक संसर्गजन्य व साथीचा आजार. या विषाणूचे शेळय़ा मेढय़ांमधील देवीच्या विषाणूशी साम्य आढळून येत असले तरी हा आजार शेळय़ा मेंढय़ांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवास होत नाही. आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. हा रोग सर्व वयोगटातील (नर आणि मादी) जनावरात आढळतो. मात्र, लहान वासरात प्रौढ जनावरांच्या तुलनेत प्रमाण अधिक असते. उष्ण आणि दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक असते.

या आजाराचा रोग दर हा सर्वसामान्यपणे १०-२० टक्के, तर मृत्युदर एक-पाच टक्केपर्यंत आढळून येतो. आजारामुळे जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठय़ाप्रमाणावर घटते, तसेच काही वेळा गाभण जनावरात गर्भपात होतो आणि प्रजननक्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावरं खूप विकृत दिसतात. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ १८ ते ३५ दिवस जिवंत राहू शकतात. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोगद्वारेही याची लागण होऊ शकते. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गाईच्या दुधातून आणि स्तनावरील व्रणातून रोगप्रसार होतो.

आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचिड, चिलटे यांच्यामार्फत होतो. तसेच या आजाराचा प्रसार निरोगी आणि बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १-२ आठवडय़ापर्यंत हा विषाणू रक्तामध्ये राहतो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतो. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळय़ातील पाणी आणि तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा आणि पाणी दूषित होते. हा दूषित चारा पाणी निरोगी पशूंच्या संपर्कात आल्यास या विषाणूचा प्रसार होऊन आजाराची लागण होते. त्यामुळे बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे आवश्यक आहे.

या आजारामध्ये प्रथम जनावराला मध्यम स्वरूपाचा तर काही वेळेस भयंकर असा ताप येतो. जनावरांच्या डोळय़ातून आणि नाकातून पाणी येते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होते. लसिकाग्रंथीना सूज येते, जनावरांच्या शरीरावर अंदाजे दोन ते पाच से.मी. व्यासाच्या कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास  भागात येतात. गाठीमुळे पडलेले चट्टे शरीरावर बऱ्याच कालावधीकरिता अथवा कायमच राहू शकतात. तसेच तोंडात, घशात आणि श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ आणि फोड येतात. तोंडातील पुरळामुळे जनावरांच्या तोंडातून मोठय़ा प्रमाणात लाळ गळत असते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. डोळय़ात व्रण निर्माण होतात. डोळय़ातील व्रणामुळे चिपडे येते तसेच डोळय़ाची दृष्टी बाधित होते. जनावरांना अशक्तपणा येतो आणि भूक मंदावते, वजन कमी होते. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. रक्तातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेटची संख्या कमी होते.

आजाराचे निदान लक्षणावरून करता येते. या प्रकारचे लक्षणे इतर रोगांमध्ये दिसून येतात. त्यामुळे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेमार्फत केले जाते, याकरिता आजारी जनावरांचा उपचार करण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणीसाठी रक्त, रक्तजल, त्वचा आदींचे नमुने घेणे आवश्यक आहे. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाही. बाधा झालेल्या जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जीवाणूजन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असल्याने उपचारासाठी प्रतिजैविके, तापनाशक, दाहनाशक, वेदनाशामक औषधे, रोग प्रतिकारशक्तिवर्धक जीवनसत्त्व अ, ई आणि बी, शक्तिवर्धक यकृत टॉनिक आदी डॉक्टरांच्या सल्ल्याने ५-७ दिवस उपचार केल्यास बहुतांश जनावरे पूर्णपणे बरी होतात. शेतकरी व पशुपालकांनी जागृत राहण्याची गरज आहे.

तातडीने उपचार करा

लम्पी त्वचा रोग संसर्गजन्य आहे. औषधोपचाराने बरा होतो, पशुपालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. रोगाचा प्रादुर्भावच होऊ नये, याची प्रथम काळजी घेतली पाहिजे आणि जर संसर्ग झालाच तर कमीत कमी नुकसान होईल, असे नियोजन केले पाहिजे. संसर्ग झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसांत उपचार सुरू झाले पाहिजेत. अन्यथा जनावरांची अवस्था गंभीर होते. संसर्ग झालेल्या जनावरांचे काटेकोर विलगीकरण केले पाहिजे. खासगी पशुवैद्यकांनी केलेल्या उपचाराला जनावरे प्रतिसाद देत नसतील, तर तातडीने सरकारी यंत्रणेला कळविले पाहिजे. राज्यात निरोगी जनावरांचे लसीकरण सुरू आहे. संसर्ग झालेल्या जनावरांवरील उपचाराबाबत मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात आल्या आहेत. संसर्ग झालेल्या परिसरातील जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. सरकारकडून युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. – धनंजय परकाळे, अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

सध्या भारतात या रोगावरची लस उपलब्ध नाही. मात्र शेळय़ात देवीवर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येऊ शकतो. बाधित गावांमध्ये आणि बाधित गावापासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील चार महिने वयावरील गाय आणि म्हैस वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले, तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.

डॉ. धनंजय दिघे, सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.

आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लम्पी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा. निरोगी जनावरांना बाधित जनावरापासून वेगळे बांधावे, गाई आणि म्हशी एकत्र बांधू नयेत, योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तत्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते. – प्रा. डॉ. सुनील वाघमारे, चिकित्सालय अधीक्षक, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.

बाधित परिसरात स्वच्छता करावी आणि निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ टक्के यांचा वापर करता येईल. या रोगाचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठय़ात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त भागात तसेच १० किमी. परिघातील जनावरांची वाहतूक बंदी ठेवावी. – डॉ. महेश इंगवले, सहा.प्राध्यापक, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.

prabodhpdeshpande@gmail.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preventive measures to control lumpy skin disease in cattle zws
First published on: 06-09-2022 at 02:05 IST