यांत्रिक पद्धतीने भात लागवड

यांत्रिकीकरण पद्धतीत मजूर कमी लागतात व रोपवाटिकेचा खर्च सुद्धा कमी होतो, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

यांत्रिक पद्धतीने भात लागवड
यांत्रिक भात लागवड

हर्षद कशाळकर

कुशल मजुरांची अनुपलब्धता ही शेतीपुढे सध्याची मोठी समस्या आहे. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या रोजगार संधींमुळे दिवसेंदिवस चांगले मजूर मिळेनासे झाले आहेत. भातशेतीसाठी तर ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे.

रायगड जिल्ह्यात वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भातशेतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. यामुळे शेती परवडत नाही, अशी ओरड सुरू झाली आहे. भातशेती लागवडीकडे शेतकरी पाठ फिरवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पूर्वी जिल्ह्यात १ लाख २४ हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जात होती. हे क्षेत्र घटून आता १ लाख हेक्टरवर आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे दर दोन वर्षांनी लागवडीखालील क्षेत्र चार ते पाच हजार हेक्टरने घटत असल्याचे दिसून येत आहे.

शेतीत यांत्रिकीकरणाचा आभाव, अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक असणे ही या मागील प्रमुख कारणे आहेत. जिल्ह्यात १ लाख १८ हजार हेक्टर एवढे पडीक क्षेत्र आहे. त्याशिवाय १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्र हे पडीक जमिनीव्यतिरिक्त लागवडी खालील नसलेले क्षेत्र आहे. यात दरवर्षी वाढ होत आहे. जमिनीची वर्गवारी लक्षात घेतली तर जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार हेक्टर जमीन ही हलकी आहे. १ लाख ७५ हजार हेक्टर जमीन ही मध्यम आहे, तर १ लाख ५५ हेक्टर जमीन ही भारी आहे. म्हणजेच एकूण जमिनीच्या ५५ टक्के जमीन ही हलक्या प्रतीची आहे. जिल्ह्यात सिंचनाच्या फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. सिंचन क्षेत्र हे केवळ ७ हजार हेक्टर एवढे आहे. यातील ४० टक्के क्षेत्र हे विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा विविध कारणांमुळे शेतकरी शेतीपासून दुरावत असल्याचे दिसून येत आहे.

ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे धोरण स्वीकारले आहे. कृषी विभागाच्या वतीने रायगड जिल्हातील खालापूर व रोहा येथील शेतकरी व शेतकरी गटांना यंत्राच्या साहाय्याने भात लावणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यांत्रिकीकरण व पारंपरिक पद्धतीने भात लागवड केल्यास कसा फरक पडतो व यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे भातशेती कशी फायद्याची आहे, याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जात आहे. त्यामुळे या पद्धतीने लागवडीसाठी शेतकरी तयार झाले. यांत्रिकीकरण पद्धतीत मजूर कमी लागतात व रोपवाटिकेचा खर्च सुद्धा कमी होतो, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

भात शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन जिल्ह्यामध्ये करण्यात आले असून यामध्ये चारसूत्री पद्धतीने भात लागवड, एसआरटी पद्धतीने भात लागवड, ड्रम सीडरद्वारे भात लागवड व यांत्रिक पद्धतीने भात लागवड यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचा कल यंत्राद्वारे भातशेतीकडे वाढविण्यासाठी जिल्ह्यातील खालापूर व रोहा येथील शेतकरी व शेतकरी गटांच्या माध्यमातून यंत्राद्वारे यशस्वीरित्या भात लावणी करण्यात आली.

यांत्रिक भात लागवड कशी होते

यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी प्रथमत: रोपवाटिका तयार करण्यासाठी शेतातील माती चाळून घ्यावी लागते. एक हेक्टर क्षेत्राच्या रोपवाटिकेसाठी लागणारी माती चाळण्याचे काम एक मजूर एक दिवसात करतो. मॅट रोपवाटिका तयार करण्यासाठी प्लास्टिक ट्रे २७.५   २१.५ सें.मी.चे २ याप्रमाणे ३०० ट्रे लागतात. ते साधारण तीन हजार रुपये किंमतीचे होतात. प्रत्येक ट्रेमध्ये साधारणपणे ८० ते ९० ग्रॅम बियाणे प्रति ट्रे प्रमाणे २५ किलो बियाणे प्रति हेक्टर लागते. ते पारंपरिक पद्धतीपेक्षा १५ किलोने कमी लागते. रोपवाटिका तयार करताना प्रथमत: ६० ते ७० % ट्रे मातीने भरून घेऊन त्यामध्ये २० ग्रॅम प्रति ट्रे प्रमाणे १५:१५:१५ हे खत मातीत मिसळून त्याच्यावर एकसमान बियाणे पसरवावे लागते. त्यानंतर वरून चाळणीने मातीचा थर द्यावा लागतो. त्यावर भाताचा पेंडा झाकून सकाळ व संध्याकाळी फवारणी पंपाच्या साहाय्याने पाणी द्यावे लागते, जेणेकरुन बी बाहेर पडणार नाही. ही रोपवाटिका १८ ते २१ दिवसात तयार होते.

यांत्रिक लागवडीचे फायदे..

पावसाचा खंड जरी पडला तरी कमी पाण्यावर रोपवाटिका तयार करू शकतो. याप्रमाणे तयार केलेली रोपवाटिका बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या (मिहद्रा, कुबोटा, इ.) भात लावणी यंत्राद्वारे दोन मजुरांच्या सहाय्याने करता येते. एका दिवसात ४ रांगांच्या यंत्राद्वारे २ ते ३ हेक्टर क्षेत्रावर लावणी होवू शकते. त्यासाठी एकरी १ ते १.५ लिटर पेट्रोल लागते. भात लावणी यंत्र एका हंगामात ४० हेक्टपर्यंत लावणीचे काम करु शकते. यासाठी पाच हजार रुपयेपर्यंत देखभाल व दुरुस्ती खर्च येतो. पारंपरिक पद्धतीने भात लावणी करावयाची झाल्यास हेक्टरी ३० मजूर लागतात. त्या तुलनेत यंत्राद्वारे केवळ २ मजुरांद्वारे भात लावणी होते. त्यामुळे मजुरी खर्चात ९० टक्के पर्यंत बचत होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होते.

यंत्रासाठी शासनाचे अनुदान..

बाजारात ४ रांगांचे भात लावणी यंत्र अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असून कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण या योजनेतून त्यास ५० टक्के अनुदान मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर
(https://mahadbtmahait.gov.in)) अर्ज करावा, अर्ज केल्यानंतर आपली लॉटरी पद्धतीने निवड होईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून ‘टेस्टिंग रिपोर्ट’ उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे यंत्र खरेदी करावे. यंत्र खरेदी केल्यानंतर कृषी पर्यवेक्षकांमार्फत त्याची तपासणी करुन देय ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हास्तरावरून तत्काळ वितरित करण्यात येईल.

भातशेतीतील मजुरांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून यावर मात करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. येत्या कालावधीत यामध्ये वाढ करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला असून त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. म्हणून या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन भातशेतीमध्ये यांत्रिकी पद्धतीचा उपयोग वाढवावा. –  उज्ज्वला बाणखेले, कृषी अधीक्षक रायगड

harshad.kashalkar@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
प्रसन्नतेची ९८ वर्षे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी