पुणे शहर आणि परिसरात २५ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे हाहाकार उडाला. या एकाच दिवशी झालेल्या पावसात शहरातील २६ आणि ग्रामीण भागातील १० जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अद्यापही चार जण बेपत्ता आहेत.ओढे, नाले आणि नदीपात्रात अतिक्रमण करून पात्र हवे तसे वळवण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू असल्याने अधूनमधून वेगवेगळ्या भागात अशा दुर्घटना घडतात. पण ओढे, नाले बुजवल्यामुळे केवढे मोठे नुकसान होऊ शकते याचे प्रत्यंतर आंबील ओढय़ाला २५ सप्टेंबर रोजी आलेल्या पुराने आले.

सांगली-कोल्हापुरात पूर

मराठवाडा-विदर्भ उन्हात होरपळत असताना, पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या शेवटाकडे सुरू झालेल्या धुवाधार पावसाने ऑगस्टच्या पहिल्या आठवडाभरात सांगली-कोल्हापुरात महापूर आला. याआधी २००५ साली अशी पूरस्थिती अनुभवलेल्या या परिसराला यंदा त्याहून भीषण पूरस्थितीस सामोरे जावे लागले. आठवडय़ाहून अधिक काळ जलमय अवस्थेत घालवून पाणी ओसरू लागल्यानंतरही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. परंतु पुराचा तडाखा जनजीवनावर भयंकर परिणाम करून गेलाच. या काळात मदतीचा ओघ पूरग्रस्तांकडे वाहू लागला खरा; पण गेले पाच महिने हेच पूरग्रस्त शासनदरबारी संवेदनशीलतेचा अभाव अनुभवत आहेत.