काही वर्षांपूर्वी मी केलेल्या एका वक्तव्याबद्दल गदारोळ उडाला होता. ते वाक्य होतं, ‘देवाला आता रिटायर करायला हवं!’ पण ती माझी भूमिका होती. माझ्यात हा जो काही स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्तपणा आला आहे, तो वेगवेगळ्या प्रसंगांमुळे आला आहे. विकासासाठी विचार करणं ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपण एखाद्या त्रासदायक गोष्टीचा विचार करणं टाळतो. तर एखादी गोष्ट मला त्रास देतेय तर मी तिचा पिच्छा सोडणारच नाही, अशी भूमिकाही अनेक जण घेत असतात. मी दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझ्या मते, वैचारिक देवाण-घेवाण व्हायलाच हवी. ती वैचारिक घुसळण आहे आणि त्याला आपला हातभार लागलाच पाहिजे. पण म्हणून, ‘मी म्हणतो तेच अंतिम सत्य आहे’ ही भूमिकाही चुकीची आहे. आपल्याला वाटतं ते मांडलंच पाहिजे; परंतु त्याचबरोबर एखाद्याच्या न पटलेल्या मतांचाही तेवढय़ाच खिलाडूपणे आदर करायला हवा.

देवाबद्दलच्या माझ्या त्या वक्तव्यामागे माझ्या लहानपणीची आठवण आहे.. सदाशिवपेठेतील ताई रास्ते राममंदिराजवळ आमचा वाडा होता. आमचा म्हणजे, आम्ही त्यात भाडेकरू म्हणून राहत होतो. त्या वेळी त्या राममंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा प्रचंड दारू प्यायचा आणि झिंगत झिंगत मंदिराच्याच पायऱ्यांवर बसून देवाला अर्वाच्य शिव्या द्यायचा! तो आला की आम्ही घाबरून आईला बिलगून बसायचो. त्या वेळी मी आईला विचारलं होतं की, ‘‘देव सगळ्यांना सद्बुद्धी देतो असं म्हणतात. मग देव याला का नाही सद्बुद्धी देत? तो तर देवालाच शिव्या घालतोय.’’

दुसरा प्रसंगही त्याच दरम्यान घडलेला; त्यानंतर तर देवावरचा माझा उरलासुरला विश्वासही पार उडाला. त्या मुलाच्या घरी आम्ही खेळायला म्हणून जायचो. त्याची आई अत्यंत सत्शील आणि साध्वी स्त्री होती. एकदा आम्ही असेच त्याच्याकडे गेलो असता तो पाटय़ावर भांग वाटत बसला होता आणि त्याची आई जवळच कपडे वाळत घालत होती. तिला पाटय़ावर चटणी वाटायची होती म्हणून तिने त्याला एक-दोनदा ‘लवकर आटप’ असं सांगितलं. त्यावर त्यानं भडकून जवळचा कप उचलून आपल्या आईला फेकून मारला. साहजिकच तो कप फुटला आणि त्याच्या आईच्या कपाळाला जखम झाली व भळाभळा रक्त वाहू लागलं. आजही ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्या वेळी तर मला अंधारीच आली होती. पण त्या मुलाला त्याचं काहीच वाटलं नाही. माझ्या डोक्यात पहिला विचार असा आला की, ‘अरे, हे देवाचे पुजारी आणि यानं याच्या आईला असं मारावं. अन् देवानं हे बघून कसं घेतलं! देव जर काहीच करत नसेल, तर मग त्याचा उपयोग काय? हट्, देव वगैरे काही नाही..’ हे माझं मत त्या वेळीच भक्कम झालं.

एक मात्र आहे की, देव मानत नसलो तरी मी मंदिरं मात्र आवर्जून बघायला जातो. कारण त्यातलं शिल्पकाम! या कलाकारांनी जे काही करून ठेवलंय, ते प्रचंड अद्भुत आणि अलौकिक आहे. कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून त्याकडे आपण पाहू शकतो. मात्र त्यावर देवत्व लादलं जातं, हे चूक आहे. आपल्याकडे सध्या असं देवत्व लादण्याचं प्रमाण भयंकर वाढतंय. त्याला कारण प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या. माझ्या मते, हा आपल्यासमोरचा प्रश्न नाहीच. प्रश्न आहे तो, हे बरोबर आहे की नाही, हा. हे बरोबर नसेल, तर ते बरोबर नाही हे लोकांना सांगणं माझं कर्तव्य आहे की नाही? जर ते माझं कर्तव्य असेल, तर मी ते का करत नाही? मग मला ‘मी रॅशनल आहे’ वगैरे म्हणवून घेण्याचा काय अधिकार? पण चिंतेची बाब म्हणजे, हा असा विचार करणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे. आता एवढं सगळं होऊन, एवढे पुरावे समोर येऊनही देव, बाबा, बुवा, साधू यांची चलती आहे. पण हा केवळ भारतीयांसमोरचाच प्रश्न नाही, तर हे संपूर्ण जगात असंच आहे. याचं कारण म्हणजे युगानुयुगं देव वगैरे विचार बालपणापासूनच आपल्या मनात कोंबले गेले आहेत. अमुक कर नाही तर देव चिडेल, तमुक कर नाही तर देव कान कापेल, वगैरे धमक्यांमुळे आपण देवाला घाबरायला लागतो अन् तो पगडा घट्ट बसतो. एकदा का या संस्कारांमध्ये माणूस अडकला, की त्याचं त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं.