गेल्या काही दिवसांपासून सर्व वृत्तपत्रांमध्ये मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांत डेंग्यूने घातलेल्या थमानाविषयी बातम्या वाचायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षांतील याच काळातील वर्तमानपत्रांचे जुने अंक चाळल्यास वाचकांना लक्षात येईल की, संभाव्य दुष्काळाच्या, मान्सूनच्या आगमनाच्या व पर्जन्यमानाच्या अंदाजाप्रमाणे याही बातम्या दर वर्षी छापून येतात. रुग्णांची व मृतांची संख्या आणि डेंग्यू आढळून येणारी शहरे यांच्या तपशिलांत थोडाफार फरक असतो.
डेंग्यू हा एक विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे चार उपप्रकार आहेत. एडिस इजिप्ती व एडिस अलेबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. डेंग्यू हा सामान्यत: एक आपोआप बरा होणारा रोग आहे. बहुतांश रुग्ण बरे होतात. या रोगाची अभिव्यक्ती सामान्य (क्लासिकल) डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, शॉकसह डेंग्यू रक्तस्रावी ताप अशा तीन प्रकारे होऊ शकते. डेंग्यूचे उपरोक्त तिन्ही प्रकार हे ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य समस्या’ म्हणून पुढे आले आहेत. गेल्या ३० वर्षांत जगभरात या रोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक देशांत डेंग्यूच्या साथी आल्या आहेत. सामान्यत: शहरी व निमशहरी भागांत दिसून येणारा हा रोग आता ग्रामीण भागातही त्याचे बस्तान बसवतो आहे. जगातील २५० कोटी लोकांना हा रोग होण्याचा धोका आहे. जगात दरवर्षी पाच कोटी लोकांना डेंग्यूची लागण होते. त्यापकी सुमारे पाच लाख जणांना रुग्णालयात भरती करावे लागते. यापकी ९० टक्के रुग्णांचे वय पाच वर्षांपेक्षा कमी असते. त्यातील अडीच टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात. डेंग्यू साथीच्या काळात त्या प्रदेशातील ४० ते ९० टक्के व्यक्तींना डेंग्यूची लागण होते. जगातील शंभराहून अधिक देशांमध्ये डेंग्यू नियमितपणे आढळून येतो.
वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल व सदोष जल व्यवस्थापनामुळे डासांच्या पदाशीला मिळणारे प्रोत्साहन यामुळे भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी पावसाळा संपला, की डेंग्यूच्या प्रमाणात वाढ होते व साथीही येतात. तसा हा रोग थोडय़ा प्रमाणात वर्षभर आढळून येतो. भारताची ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डेंग्यूचे रुग्ण नियमितपणे आढळून येतात. रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण २०११ मध्ये ०.६५ टक्के इतके होते. २००८ मध्ये देशात डेंग्यूचे १२५६१ रुग्ण होते व त्यापकी ८० मरण पावले. हे प्रमाण २०१३ मध्ये ७५०८० रुग्ण व १९३ मृत्यू इतके वाढले. या वर्षी सप्टेंबरअखेरीस देशात डेंग्यूचे १३७७१ रुग्ण आढळले असून त्यापकी ३७ मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात २००८ मध्ये डेंग्यूचे ७४३ रुग्ण आढळले व त्यापकी २२ मरण पावले. हे प्रमाण २०१३ मध्ये ५६१० रुग्ण व ४८ मृत्यू इतके वाढले.
या वर्षी सप्टेंबपर्यंत २९९७ व्यक्तींना डेंग्यू झाला व त्यापकी सात मृत्युमुखी पडले.
डेंग्यूची साथ येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. विषाणूचा प्रकार, डासांची संख्या व त्यांची वर्तणूक, रोगबाधित होण्याची व्यक्तींमधील संभाव्यता व पूर्वी डेंग्यू विषाणू संसर्ग न झालेला लोकसमूह आदी घटक यासाठी कारणीभूत असतात. बहुतांश लोकांमध्ये डेंग्यूच्या संसर्गामुळे ताप हे लक्षण दिसून येते. शिशू, मुले व पहिल्यांदाच डेंग्यूची लागण होणाऱ्या प्रौढांमध्ये इतर विषाणूजन्य रोगांत येणाऱ्या तापाप्रमाणेच ताप येतो. रुग्ण बरा होतानाच्या काळात किंवा तापासोबत अंगावर पुरळही येऊ शकते. यासोबतच श्वसनसंस्था व पचनसंस्था यांच्याशी संबंधित रोगलक्षणेही आढळून येतात. क्लासिकल डेंग्यू तापाचा अधिशयन कालावधी पाच ते सहा दिवस असतो. तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. थंडी वाजून खूप ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी ही लक्षणे दिसतात. स्नायू व सांधेदुखीमुळे व्यक्ती हालचाली करू शकत नाही. खूप थकवा येणे, भूक न लागणे, बद्धकोष्ठ, पोटात कळ येणे, जांघेत ओढल्यासारखे दुखणे, घसा खवखवणे, नराश्य येणे आदी लक्षणेही दिसून येतात. ताप पाच दिवस राहतो व नंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता अतिशय कमी असते.
डेंग्यू रक्तस्रावी ताप हा डेंग्यूचा गंभीर प्रकार आहे. सुरुवातीच्या काळात याची लक्षणे नेहमीच्या (क्लासिकल) डेंग्यूप्रमाणेच असतात; परंतु अंगावर विशिष्ट प्रकारचे पुरळ मात्र सहसा येत नाही. ताप ४० ते ४१ डिग्री सें.पर्यंत वाढतो व बालकांमध्ये तापामुळे झटके येऊ शकतात. या प्रकारात केशनलिकांमधून रक्तद्रव बाहेर पडून गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. या प्रकारच्या डेंग्यूमुळे काही रुग्ण मृत्युमुखी पडतात. तिसऱ्या प्रकारात ताप, रक्तस्राव तसेच शॉक या तिन्ही बाबी आढळून येतात. या तीव्र डेंग्यूमध्ये केशवाहिन्यांतून रक्तद्रवाची गळती झाल्याने शॉकची लक्षणे दिसून येतात. श्वसनाला त्रास होतो. गंभीर रक्तस्राव होतो किंवा विविध इंद्रिये निकामी होतात. सुमारे दोन ते चार टक्के रुग्णांना या प्रकारचा डेंग्यू होतो. या वर्णनावरून लक्षात यावे की, डेंग्यू हा साधा आजार आहे, पण काही व्यक्तींमध्ये तो गंभीर रूप धारण करण्याची किंवा त्यात गुंतागुंत निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. अशा व्यक्तींमध्ये बालके व वृद्ध, लठ्ठ व्यक्ती, गरोदर स्त्रिया, जठर वा आतडय़ातील व्रणांचे रुग्ण, मासिक पाळी चालू असणाऱ्या स्त्रिया, थॅलॅसेमियासारख्या रोगांचे रुग्ण, जन्मजात हृदयविकाराचे रुग्ण, स्टिरॉइड औषधी घेणारे रुग्ण तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आदी जुनाट आजारांचे रुग्ण यांचा समावेश होतो. साहजिकच अशा व्यक्तींना डेंग्यू झाला तर त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते.
म्हणजे, डेंग्यू हा जणू प्राणघातक रोगच, असे समजून अनावश्यक घाबरण्याचे कारण नाही. डेंग्यूवरील उपचार हे लक्षणांनुरूप आहेत. विषाणू मारण्यासाठी प्रभावी औषधे नाहीत. डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी लसही उपलब्ध नाही, हे खरे आहे. तरीदेखील, हे वाचून वाचकांनी निराश व्हायची गरज नाही, कारण जसा डेंग्यू कोणालाही होऊ शकतो तसेच त्याचा प्रतिबंधही कोणीही व्यक्ती सहज करू शकतो.
डेंग्यूचा विषाणू तर पर्यावरणात राहणारच; पण एडिस डासांचा बंदोबस्त करून किंवा ते डास आपल्याला चावणार नाहीत यासाठी उपाययोजना करून आपण डेंग्यूपासून आपला बचाव करू शकतो. काळ्या शरीरावरील पांढऱ्या पट्टय़ांमुळे एडिस डास इतर डासांपासून पटकन ओळखता येतो. पाण्याच्या कृत्रिम अर्थात मानवनिर्मित साठवणीच्या ठिकाणी या डासांची पदास होते. घर वा घराभोवतीच्या अशा साठलेल्या पाण्यात या डासांची पदास होते. फुटके डबे, फुटलेल्या बाटल्या, फ्लॉवर पॉट, नारळाची करवंटी, मातीची भांडी, झाडातील पोकळ्या अशा अनेक ठिकाणी पाणी जमा होते व त्यात हा डास अंडी घालतो. या डासाची मादी सहसा दिवसा चावे घेते. हा डास खूप दूरवर उडू शकत नाही, त्याचा पल्ला सुमारे १०० मीटरचा असतो. यामुळे या डासांचे निर्दालन करणे सोयीचे जाते. अळ्या मारणारी व प्रौढ डासांना मारणारी कीटकनाशके फवारूनही डासांचा नायनाट करता येतो.
उपरोक्त उपाय हे महानगरपालिका वा दुसऱ्या कोणी करायचे आहेत, असे सर्वसामान्य लोकांना वाटत असते; पण वर वर्णन केलेली पाणी साठण्याची ठिकाणे नष्ट करणे आपल्याच हातात आहे. याखेरीज डासांनी चावे घेऊ नये यासाठी डासविरोधी मलम अंगाला लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, अंगभर कपडे घालणे आदी उपाय तर नक्कीच करता येतील.
थोडक्यात सांगायचे तर वैयक्तिक, घरातील व घरासभोवतालची स्वच्छता ठेवल्यास डेंग्यू व अस्वच्छतेमुळे होणारे इतर अनेक आजार आपण सहज टाळू शकू. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान सुरू करून या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. दुर्दैवाने या देशाला अभियान/मोहीम संस्कृतीची लागण झाली आहे. ज्या गोष्टी नित्यनेमाने, दर क्षणाला करायला हव्या त्याचे अभियान वा मोहीम झाल्यावर मूळ उद्देश बाजूला राहून फक्त उत्सवच शिल्लक राहतो. अभियान हा प्रसिद्धीचा कार्यक्रम असतो, तर उपक्रम हा दैनंदिन जीवनात अंगीकारायचा प्रसिद्धिपराङ्मुख कार्यक्रम असतो. रोज आंघोळ करा असे ‘अभियान’ करायचे नसते! तहान लागल्यावर विहीर खणायचा काही उपयोग नसतो. दरवर्षी येणाऱ्या डेंग्यूचा बीमोड करायचा असेल, तर ‘स्वच्छता अभियाना’ऐवजी स्वच्छता अंगी बाणवण्याचा उपक्रम देशाला स्वीकारावा लागेल.
लेखक सार्वजनिक आरोग्या विशेषज्ञ आहेत.
त्यांचा ई-मेल drjvdixit@gmail.com
उद्याच्या अंकात अजित बा. जोशी यांचे ‘प्रशासनयोग’ हे सदर.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
डेंग्यूचे थैमान आणि अभियान संस्कृती
जोवर डासांची पैदास होण्याच्या शक्यता बळावत राहणार, तोवर डेंग्यूही वाढत राहणारच. डेंग्यूच्या फैलावाची, त्याच्या घातकतेची आकडेवारी पाहिल्यास हा सरसकट प्राणघातक रोग नसल्याचेही लक्षात येईल; परंतु मृतांची संख्या वाढण्यामागचे कारण, वाढता फैलाव थोपविणे पालिका वा सरकारी यंत्रणांपेक्षा लोकांच्या हाती अधिक आहे, याची साधार आठवण देणारे टिपण..
First published on: 04-11-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the cause for spreading dengue