– चैतन्य प्रेम

संत गोरोबाकाका यांची आज पुण्यतिथी. गोरोबाकाका म्हटलं की दोन दृश्यं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. पहिलं म्हणजे, मडक्यांसाठी पायानं माती तुडवताना आपलंच रांगतं मूल त्यात आलं तरी लक्षात आलं नाही! नाथांच्या ‘वारियाने कुंडल हाले’ या गवळणीत आहे ना? ‘हरिला पाहुन भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता’ म्हणजे हरीस्मरणात तल्लीन झालेली राधा व्यावहारिक कर्माचा डेरा घुसळत होती, पण त्यातून पूर्वीसारखं ‘अमुक घडावं’ या इच्छेचं लोणी निघतच नव्हतं. मनाचा डेरा व्यावहारिक लाभाच्या अपेक्षेअभावी रिताच होता! तशी गोरोबांची स्थिती होती. माती तुडवण्यात पाय राबत होते; पण चित्त विठ्ठलनामात रंगलं होतं. इतकं की आपलंच मूल त्या मातीचिखलात आलं तरी कळलं नाही! इतकी भावतन्मयता आपल्यात येणार नाही, पण निदान साधनेला बसल्यावर जी प्रपंचाची चिंता उफाळून येत असते त्यावेळी तरी गोरोबांच्या पायाखालचा हा मातीचिखल आठवावा! त्यांनी भवितव्याचा आधारच हरिनामात एकजीव केला होता, आपण निदान भवितव्याची चिंता तरी एकजीव करायचा प्रामाणिक प्रयत्न करू!  पुढे भगवद्कृपेनं ते मूल रांगत बाहेर आलं, हे दृश्य गोरोबांवर जे चित्रपट आले त्यांतलं ‘प्रेक्षकप्रिय’ दृश्य होतं, पण त्यातले भावसंस्कार आपण चित्तात साठवले पाहिजेत.

दुसरा प्रसिद्ध प्रसंग तो म्हणजे ज्ञानदेवांच्या सांगण्यावरून थापटीनं प्रत्येकाचं डोकं थापटून ‘कच्चं मडकं’ शोधण्याचा! नामदेवांचं डोकं थापटत गोरोबा म्हणाले, ‘‘अरे हे मडकं कच्चं आहे बरं का!’’ आणि संतापानं नामदेव तिथून निघून विठोबाकडे गेले आणि त्यातूनच त्यांच्या सद्गुरूभेटीची अमृतघटिका साधली! तेव्हा सद्गुरू विसोबा खेचरांइतकीच गोरोबांविषयीही नामदेवांना आत्मीयता होती. त्यामुळे गोरोबांच्या अभंगांत काही अभंग हे नामदेवांना बोध करणारेही आहेत.  हा अभंग असा आहे : ‘निर्गुणाचे भेटी आलों सगुणासंगें। तंव झालों प्रसंगीं गुणातीत॥१॥ मज रूप नाहीं नांव सांगूं काई। झाला बाई काई बोलूं नये॥२॥ बोलतां आपली जिव्हा पं खादली। खेचरी लागली पाहतां पाहतां॥३॥ म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी। सुखासुखी मिठी पडली कैसी॥४॥’’

गोरोबाकाका म्हणताहेत, हे निर्गुण भगवंता, तुझ्या भेटीला मी सगुणासंगतीनं आलो आहे.  ज्याच्या संगतीनं आलो तो सद्गुरू देहातीत असूनही त्याला मी सगुणातच, देहभावातच जाणतो आहे आणि ज्याला भेटायचं त्याचंही विशिष्ट सगुण रूपच डोळ्यांपुढे आहे. पण जेव्हा प्रसंग घडला म्हणजेच सद्गुरूमध्येच तू दिसू लागून हा संग परिपक्व झाला तेव्हा मी गुणातीत झालो. अर्थात सत, रज आणि तम या तीनही गुणांच्या प्रभावपकडीतून मुक्त झालो. मग मला ना रूप उरलं ना नाव! सगळी रूपं आणि नामं एकाचीच आणि एकच झाली. स्त्री-पुरुष भेद ओसरला. तुझ्या नामात रंगलेल्या जिव्हेनं स्वतलाच खाऊन टाकलं! म्हणजे प्रपंच विषय चरणं आणि वाणीनं चघळणं हे संपूनच गेलं.  शेवटचा चरण मोठा विलोभनीय आहे. भगवंत हा परमसुखाचा स्रोत आहे, पण त्याची भेट काही सुखासुखी होत नाही. दुखानं माणूस जागा झाल्यावरच ती बरेचदा होते. पण नामदेवांना अगदी बालवयात ती सहज घडू लागली. त्याची आठवण देत गोरोबा विचारतात, नाम्या तुझी भगवंत चरणांशी सुखासुखी मिठी कशी पडली रे? साधकांना त्यात सूचन आहे की लहान व्हा आणि दृढविश्वासी व्हा! मग सगुण- निर्गुणाची भेट सहज शक्य आहे.