आवडत्या टीमची जर्सी घालण्यापासून, आवडत्या खेळाडूचं मोबाइल कव्हर वापरण्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांतून फुटबॉलप्रेमी लाडक्या टीमला पाठिंबा देताहेत. केवळ कपडेच नाही तर अॅक्सेसरीज मग त्यात गॉगल, शूज, बॅग, सॅक सगळंच फुटबॉलमय झालंय. फुटबॉल र्मचडायझिंगवर एक नजर..

फिफा वर्ल्डकप सुरू झाल्यापासून सध्या तरुणाईच्या फुटबॉलप्रेमाला उधाण आलेलं दिसतंय. ब्राझीलमधल्या घडामोडींवर सगळे लक्ष ठेवून आहेत. रोज रात्री ९ नंतर हातातल्या फोनवर सतत बझ होत राहतं. कारण व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर अपडेट्स यायला सुरुवात होते. माहौल सध्या फुटबॉलमय आहे. स्पर्धा जशी बाद फेरीतून पुढे जाणार तसे समर्थकांच्या उत्साहाला आणखी उधाण येणार. हे लक्षात घेऊनच आता व्यापाऱ्यांनी हे प्रेम कॅश करायला सुरुवात केली आहे.
फुटबॉलप्रेमींच्या उत्साहाची दखल घेत फुटबॉलप्रेमींसाठी बाजारही सजला आहे. फुटबॉलरंगी रंगला आहे. दुकाना-दुकानांमधून फुटबॉलशी निगडित गोष्टी दिसायला लागल्या आहेत. जर्सी, टोप्या, शूज, बॅग, सॅक, गॉगल, घडय़ाळ, स्टड्स, की-चेन, वॉटर बॉटल अशा कशाकशावर फुटबॉलप्रेमाची झलक दिसते आहे. मोबाइल, लॅपटॉप कव्हरही यातून सुटलेले नाही. आवडत्या टीमला, खेळाडूला पाठिंबा दर्शवण्याचे वेगवेगळे मार्ग तरुणाई आजमावत आहे.
फॅशन स्ट्रीटवर वेगवेगळ्या देशांच्या जर्सीसारखे दिसणारे टी-शर्ट, की-चेन विकायला आले आहेत. या फिफा फीवरमधून मोठे मॉलमधली ब्रॅण्डेड स्टोअर्स आणि गल्लीतलं टपरीवजा दुकान काहीही वाचलेलं नाही. आदिदास, प्युमा, व्हेक्टर एक्स, नायके या ब्रॅण्ड्सची आऊटलेट्स सध्या फुटबॉलसंबंधी वस्तू आणि कपडय़ांनीच भरली आहेत. मोठय़ा मॉलमध्येही काचांमधून फिफा र्मचडायझिंगच दिसतंय. खेळाडूंच्या चित्राचे, नावाचे टी-शर्ट, वेगवेगळ्या देशांच्या जर्सी हे तर त्यात आहेच. पण खास त्याची सही असलेले कॉफी मग, पोस्टर्स, शूज, बॅकपॅक हेदेखील विक्रीला आहे. काही ठिकाणी तर वेगवेगळ्या देशांच्या रंगाचे टी-कोस्टर्स आणि कुशन कव्हर्सही विक्रीला आले आहेत. अॅमेझॉन.कॉम या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर ‘फुटबॉल फीवर’ नावानं खास स्टोअर उघडण्यात आलंय. लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांसाठी खास मेस्सी कलेक्शनही त्यांनी आणलं आहे. त्यामध्ये मेस्सीची सही असलेल्या वस्तू आहेत. ‘देशभरातील फुटबॉलप्रेमींसाठी एकाच ठिकाणी फुटबॉल र्मचडाइज देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. फुटबॉलच्या वॉल हँगिंगपासून लॅपटॉप- मोबाइल कव्हर, व्हिडीओ गेम आणि पुस्तकं यात आहेत. ब्राझुका हा या वेळच्या फिफाचा अधिकृत बॉल आणि त्याचं मिनिएचरही उपलब्ध आहे,’ अशी माहिती अॅमेझॉन इंडियाचे संचालक समीर कुमार यांनी दिली.
याप्रमाणेच जबाँग.कॉम आणि मिन्त्रा.कॉम या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरही खास फुटबॉल स्टोअर उघडण्यात आली आहेत. अॅडऑन्स या अॅक्सेसरीच्या ब्रँडनं फिफामधल्या टीमच्या रंगाशी साधम्र्य साधणाऱ्या अॅक्सेसरीज बाजारात आणल्या आहेत. त्यामध्ये हेअर अॅक्सेसरीज, बॅग्ज, ज्वेलरी, शूज यांचा समावेश आहे.
रायट या भारतीय ब्रँडनंदेखील फुटबॉल टीशर्ट्स, शॉर्ट्स बाजारात आणले आहेत. मुंबईबरोबरच पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, लातूर आणि इंदोर इथेही रायटची आऊटलेट्स आहेत आणि तिथपर्यंत फिफा फीवर पोचला आहे. या साऱ्याच्या किमती ३५० पासून सुरू होतात.  सेरेनिटी ब्लिसफूल लिव्हिंग या ब्रँडने तर होम डेकॉरची मालिका आणली आहे. त्यामध्ये फुटबॉलपटूंचं चित्र असलेली कुशन्स, मग, बिन बॅग, पडदे सगळं फुटबॉलमय आहे. खारच्या दुकानात हे कलेक्शन पाहायला मिळालं.
ही सगळी फुटबॉल शॉपिंग कशासाठी? फुटबॉल र्मचडाइजचाही फॅन असणारा असद पॅट्रिक म्हणाला, ‘मी या खेळाचाच फॅन आहे. वर्ल्ड कप म्हणजे या खेळाचा सगळ्यात बेस्ट फॉरमॅट आहे आणि त्या थ्रिलचा एक भाग होण्यासाठी वातावरणनिर्मिती तर हवीच. मी जर्मनीचा फॅन आहे.’ गौरेश खानोलकर खरा इंग्लंडचा फॅन. ‘पण आता इंग्लंड स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतरही मी स्पर्धा उत्सुकतेने बघतोय. आम्ही मित्र एकत्र येऊन मॅच बघतो. केक- चिप्स – कोल्ड्रिंक असा प्लॅन असतो. टीम जर्सी घालून आपला सपोर्ट दाखवायची संधी अशा वेळीच असते,’  गौरेश सांगतो.

हेअरस्टाइलची क्रेझ
नुसतं आवडत्या टीमची जर्सी घालून काही फॅन्सचं समाधान होत नाही. त्या पलीकडे जाऊन काही चाहते तर आपल्या आवडत्या खेळाडूसारखी हेअर स्टाइल करून घेतात. फुटबॉल खेळाडू तर वेगवेगळ्या चित्रविचित्र केशरचनांसाठी प्रसिद्धच आहेत. तशा हेअरस्टाइल करून घ्यायला सलॉन आणि पार्लरमध्ये गर्दी होत आहे. उत्साही फुटबॉल फॅन आवर्जून हेअर स्टाइलची नक्कल करून घेतात. त्यातलाच एक उत्साही फुटबॉल फॅन साहिल ठाकूरनं ब्राझीलच्या नेयमारची हेअर स्टाइल करून घेतली आहे. मॅनेजमेंट कॉलेजचा विद्यार्थी असणारा साहिल म्हणतो, ‘मी ब्राझीलचा सपोर्टर आहे आणि हे सांगायला याहून चांगला मार्ग कुठचा असू शकतो? नेयमार माझा आवडता प्लेअर आहे. त्याचा खेळ मला आवडतो आणि त्याची हेअरस्टाइलही कूल आहे.’