निसर्गाची ओढ, भटकंतीची आवड आणि जिद्दीने केलेलं संशोधन या तीन गोष्टींच्या जोरावर सांगली जिल्ह्यातील अंबक या छोट्याशा गावातून आलेल्या एका मुलाने भारतीय वनस्पतीशास्त्र क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पती जतन करण्याचे कार्य असो की नारळवर्गीय वनस्पतींचा गुणसूत्र अभ्यास असो, डॉ. रोहित निवास माने यांनी आपल्या संशोधनातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या नावावर ३० हून अधिक शोधनिबंध, ४ नवीन वनस्पतींचा शोध आणि सह्याद्रीपासून अंदमान – निकोबारपर्यंतच्या निसर्गभ्रमंतीचा समृद्ध अनुभव आहे.
डॉ. रोहित माने हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अंबक गावचे. त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा, अंबक येथे झाले. पुढे मोहितेवडगाव व देवराष्ट्रे या गावांतून त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पदवीसाठी त्यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची वाट धरली. सुरुवातीला रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र व भूगर्भशास्त्र या विषयांमध्ये त्यांना गती मिळाली नाही. मात्र वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. एस. आर. चव्हाण, डॉ. जी. जी. घार्गे, डॉ. जी. जी. पोतदार आणि डॉ. सुषमा कीर्तने यांच्या प्रेरणेने त्यांची वनस्पतीशास्त्राशी घट्ट नाळ जुळली असं ते सांगतात. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना ग्रंथालयात त्यांना फारूक नाईकवडी यांची ‘स्टील फ्रेम’ ही कादंबरी आणि ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक त्यांच्या हाती लागले. त्यातूनच त्यांना संशोधनासाठी खरी दिशा मिळाली, असंही ते सांगतात. पदवी पूर्ण करून २०१३ मध्ये शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद येथे त्यांनी वनस्पतीशास्त्रातच एम. एस्सीसाठी प्रवेश घेतला. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांना प्रा. (डॉ.) अभय साळवे यांच्या मार्गदर्शनामुळे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. इथेच प्रा. (डॉ.) एस. आर. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ११ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांनी संशोधन कार्यास सुरुवात केली. पश्चिम घाटातील लुप्त होत चाललेल्या व प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे संवर्धन हा या कालावधीत त्यांचा प्रकल्प होता. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भ्रमंती करताना त्यांनी तेथील वनस्पतींच्या बिया गोळा केल्या, विद्यापीठाच्याच वनस्पती उद्यानात त्यांची रोपे रुजवली आणि अशा पद्धतीने अनेक प्रजाती जतन करण्याचे काम त्यांनी सुरू केले.
प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा गुणसूत्र अभ्यास झालेला नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या विषयात नवे संशोधन सुरू केले. आतापर्यंत ५० हून अधिक वनस्पतींच्या गुणसूत्रांची जगातली पहिली नोंद त्यांनी केली आहे. पीएचडी अभ्यासासाठी २०१७ मध्ये रोहित यांना प्रा. (डॉ.) मनोज लेखक यांच्या मार्गदर्शनाखाली नारळवर्गीय वनस्पतींचा संशोधन हा विषय मिळाला. या कामासाठी त्यांनी जवळजवळ संपूर्ण देश पालथा घातला. निसर्गाची करणी आणि नारळात पाणी या उक्तीप्रमाणे देशभरातील विविध राज्यांमधील नारळांची गुणवैशिष्ट्ये त्यांना या संशोधनातून लक्षात आली. कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, सिक्कीम, उत्तराखंड, डेहराडून, गुवाहाटी, पश्चिम बंगाल, दीव-दमण ते अंदमान-निकोबारपर्यंत विविध प्रांतांत भ्रमंती करत तेथील पाम प्रजातींचे संकलन त्यांनी केले.
त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. आजवर डॉ. माने यांचे संशोधन टॅक्सन, फायटोटॅक्सा, सायटोलॉजिया, रीडिया, फायटोमॉर्फोलॉजी, जर्नल ऑफ एशिया-पॅसिफिक बायोडायव्हर्सिटी, नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी, प्लान्ट बायोसिस्टम, बायोलॉजी, फायटोकीज यांसारख्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे. नुसती भ्रमंती न करता, ३० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित करत त्यांनी आपले अभ्यास विषय देशपरदेशात पोहोचवले आहेत. नव्या वनस्पतींचा शोध घेणे हाही त्यांचा आवडीचा विषय. ॲलिसिकार्पस टेट्रागोनोलोबस व्हेर मायक्रँथस, क्रोटालेरिया कांचियाना, कुरकुलिगो कोंकानेन्सिस आणि लेपिडागॅथिस डाल्झेलियाना या चार नवीन वनस्पतींचा शोध त्यांच्या नावावर आहे. संशोधन आणि अभ्यासात मनापासून रमलेले डॉ. रोहित माने हे सध्या बळवंत कॉलेज, विटा येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संशोधनाची आवड, निसर्गभ्रमंतीची ओढ आणि दुर्मीळ वनस्पती जतन करण्याची तळमळ यामुळे ते आजच्या तरुण संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.