आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. इंद्रायणीच्या काठावरून सुरू झालेला वारीचा भक्तिप्रवाह आता चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचू लागला आहे आणि वारकऱ्यांची विठुरायाच्या दर्शनाची ओढ अधिकच तीव्र होत चालली आहे. डोळ्यांत पांडुरंगाच्या दर्शनाची आस, पायांत भक्तीची गती, मुखात हरिनामाचा गजर आणि या लाखो वारकऱ्यांची पंढरीकडे चाललेली वारी असं देखणं चित्र महाराष्ट्र गेली कित्येक शतके पाहतो आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या चित्रात एक नवा रंग मिसळला आहे… तरुणाईचा!

आषाढीच्या या पंढरपूरच्या वारीतील भक्तीरसात तरुणाईचा रंग अगदी सहजपणे मिसळतो आहे… कधी टाळ-मृदंग हातात घेत, तर कधी कॅमेऱ्याच्या लेन्समधून क्षण टिपत, कधी अभंग गात, तर कधी सेवा करत. विविध क्षेत्रांतली तरुण मंडळी आज वारीत सहभागी होतात. मोबाइल आणि सोशल मीडियावर रमणारी ही टेक्नोसॅव्ही पिढी, हातात टाळ घेऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात तितक्याच तल्लीनतेने सहभागी होते. भक्ती, सेवा आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधत, ही तरुणाई वारीला नव्या युगाशी जोडते आहे.

एमसीएचा विद्यार्थी असणारा धैर्यशील लाड असाच एक वारकरी तरुण. सातारकर फडाच्या दिंडीसोबत तो वारीत सहभागी होतो. धैर्यशील सांगतो, ‘वारी प्रत्यक्षात जरी १८-२० दिवसांची असली तरी तिच्यातून मिळणारी ऊर्जा मात्र वर्षभर पुरते. आहे त्या परिस्थितीत जुळवून घेण्याची सवय असो किंवा प्रत्येकाला ‘माउली’ म्हणत समानतेने पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्याच गोष्टी वारीत अंगी भिनतात. आजच्या काळात इंटरनेट, सोशल मीडियामुळे अनेक पर्याय समोर असूनही मन अधिकच भिरभिरतं. अशा वेळी साधन-सुविधांचा अभाव असूनही वारीतला शांत, समाधानी आनंद ही एक विलक्षण शिकवण असते. हीच शिकवण पुढील आयुष्यासाठी शिदोरी ठरते.’

सोशल मीडियामुळे वारी आज ‘ट्रेंडिंग’ झाली आहे. अनेक तरुण वारीतले काही क्षण अनुभवायला येतात, तर काहीजण ते क्षण टिपायला. आणि मग यातली बरीच मंडळी वारीच्या प्रेमात पडतात. पुण्याचे डॉ. मितेश आणि लतिका खैरनार हे यूट्यूबवर जोडपं गेले काही वर्षे वारीच्या एखाद्या टप्प्यात सहभागी होतं. यंदा मात्र त्यांनी संपूर्ण वारी करायची ठरवलं आहे. वारीच्या रोजच्या अनुभवांचे व्लॉग सोशल मीडियावर ते शेअर करतात. डॉ. मितेश सांगतात, ‘दिंड्यांसोबत चालणं हा अनुभव तर असाधारण असतोच, पण विसाव्याच्या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी, जेवणाच्या पंगती, वैद्याकीय सेवा, स्वच्छता यांसारख्या अनेक घडामोडीही तितक्याच महत्त्वाच्या वाटतात. वारी एक सांघिक भावना आहे. हे सगळं आम्ही अनुभवतो आहोत. आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांनाही दाखवतो आहोत.’

वारीदरम्यान हे दोघं रोज वारकऱ्यांशी संवाद साधतात. चालताना, मुक्कामाच्या ठिकाणी, तिथले गावकरी, स्वयंसेवक, दर्शनाला आलेले भाविक… या सगळ्यांशी बोलताना त्यांना वारीचे नवे आयाम समजत जातात. या अनुभवांविषयी लतिका खैरनार सांगतात, ‘आम्ही जितक्या वारकऱ्यांना विचारलं, ‘तुम्ही विठोबाला काय मागता?’ त्यावर एकही उत्तर पैशाचं, जमिनीचं किंवा अडचणींचं नव्हतं. ‘वारीची सेवा अखंड घडो’ हीच बहुतेकांची मागणी असते. आजच्या या ‘नेव्हर एंडिंग डिमांड्स’च्या जगात ही मागणी खरंच अद्भुत आहे’.

काही तरुणांना पंढरपूरपर्यंत पूर्ण वारी करणं शक्य नसतं. अशी काही मंडळी आपल्या सोयीनुसार वारीतला एखादा दिवस अनुभवतात. वारी पुण्यातून जात असताना, पुण्यातील आयटी क्षेत्रातील अनेकांना तिच्याबद्दल अपार कुतूहल वाटायचं. ‘आपण प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकतो का?’ अशी इच्छा त्यांच्या मनात असायची. या कुतूहलाला कृतीचं रूप देत, २००६ साली काही आयटी व्यावसायिक एकत्र आले आणि त्यांनी आळंदी ते पुणे हा टप्पा पायी चालत पूर्ण केला. याच अनुभवातून ‘आयटी दिंडी’ ही संकल्पना जन्माला आली. हळूहळू अनेक तरुण या प्रवासात सामील होत गेले. ‘चल ग सखे ,चल रे ब्रो पंढरीला’ म्हणत अनेक झेन-झीदेखील यांच्या सोबत वारी अनुभवत आहेत. आज जवळपास दोन दशकांनंतर, ही दिंडी फक्त आयटी क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती ‘एआय दिंडी’ म्हणून नव्या स्वरूपात सर्वांसाठी खुली झाली आहे! ‘एआय’ म्हणजे ऑल इन्क्लुझिव्ह… भाषा, प्रांत, वय, व्यवसाय यापलीकडे जाऊन सगळ्यांना सामावून घेणारी, सर्वसमावेशक अशी ही आधुनिक दिंडी आहे.

वारीत ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे, त्या दिवशीच्या टप्प्यावर सहभागी होता यावं यासाठी पुण्यातून विशेष बसची सोय केली जाते. त्या दिवशीचा वारीचा अनुभव घेऊन संध्याकाळी परत पुण्यात आणलं जातं. तसंच वारीपूर्व टाळ-मृदंग प्रशिक्षण, अभंग शिकवणं, वारीतले पारंपरिक खेळ शिकवणं हे उपक्रमही पुण्यात आयोजित केले जातात. तरुणाईला वारीचा थेट अनुभव देणारा, त्यांना आध्यात्मिकतेशी जोडणारा हा उपक्रम नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरतो आहे.

वारी अनुभवायची तीव्र इच्छा असूनही काही कारणांमुळे ते प्रत्यक्षात शक्य होत नाही, अशा असंख्य भाविकांसाठी काही तरुणांनी ‘व्हर्च्युअल वारी’चा अद्भुत पर्याय शोधून काढला आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले देहूचे स्वप्निल मोरे यांच्या मनात वारीचे अपडेट्स फेसबुकवर शेअर करण्याची कल्पना आली. संतपरंपरेचा वारसा आणि तंत्रज्ञानाची ताकद यांचा सुरेख संगम साधत ‘फेसबुक दिंडी’ या उपक्रमाची सुरुवात झाली. स्वप्निल मोरे यांच्यासोबत सुमित चव्हाण, मंगेश मोरे, अक्षय जोशी, अमित कुलकर्णी, सूरज दिघे या तरुण मित्रांची टीम या उपक्रमात सहभागी झाली. सुरुवातीला केवळ फेसबुक अपडेट्सवर आधारित असलेली ही दिंडी आता स्वतंत्र अॅपच्या स्वरूपातही उपलब्ध आहे. या उपक्रमाचे हे १५वे वर्ष! या उपक्रमाविषयी बोलताना स्वप्निल मोरे म्हणतात, ‘फेसबुक दिंडी’मुळे वारी खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली आहे. देश-विदेशातील प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी ही वारी आता एका क्लिकवर उपलब्ध आहे’.

या अॅपद्वारे पालखीचा मुक्काम, विसावे, रिंगणं, नीरा स्नान यांसारख्या परंपरांचा अनुभव फोटो, व्हिडीओ आणि थेट लोकेशनसह एका ठिकाणी मिळतो. गेल्या काही वर्षांपासून या व्हर्च्युअल वारीसाठी दरवर्षी एक सामाजिक संकल्पना निश्चित केली जाते. ‘पाणी वाचवा’, ‘पर्यावरण संरक्षण’, ‘महिला सशक्तीकरण’, ‘नेत्रदान’, ‘अवयवदान’, ‘वारीतला पोशिंदा’ अशा उपक्रमांमुळे ही वारी केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही अधिक अर्थपूर्ण ठरते. यावर्षी मायमराठीच्या जपणुकीचा आणि अभिमानाचा जागर करणारी थीम आहे – ‘वारी अभिजात मराठीची’. दरवर्षीप्रमाणे, यंदाही खास थीम सॉन्ग तयार करण्यात आलं आहे. ‘वारी चुकायची नाही’ या गाजलेल्या गीतानंतर यंदाचं ‘चला पाहू रे सोहळा पंढरीचा’ हे गीत सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय ठरतं आहे.

वारीत फक्त चालणं किंवा अनुभव घेणं इतक्यापुरताच तरुणांचा सहभाग मर्यादित नाही. अनेक तरुण वारीदरम्यान विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देतात. पुण्यातील ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था गेल्या दशकभरापासून ‘निर्मल वारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारी मार्ग स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करते आहे. या उपक्रमात दरवर्षी अनेक तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. वारी मार्गावर फिरती शौचालयं बसवणे, मैल्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणं, तसेच शौचालयांचा योग्य वापर व्हावा यासाठी वारकऱ्यांमध्ये जनजागृती करणं, अशी अनेक महत्त्वाची कामं हे तरुण नेटाने पार पाडतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातूनही हजारो विद्यार्थी आणि स्वयंसेवक दरवर्षी वारीच्या विविध टप्प्यांमध्ये सहभागी होतात. वारी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणं, गर्दीचं नियोजन आणि वाहतुकीसाठी मदत करणं, आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये प्राथमिक उपचारांमध्ये सहकार्य करणं अशी सेवा ते मनापासून करतात.

वारीत विसाव्याच्या ठिकाणी वारकरी मोकळ्या जागेत विश्रांती घेतात. अशा ठिकाणी सावलीच्या झाडांची नितांत गरज भासते. ही गरज ओळखून काही तरुणांनी गेल्या तीन वर्षांपासून ‘वृक्षवारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘वारकऱ्यांना विश्रांतीसाठी सावली मिळावी आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागावा’ असा या उपक्रमामागचा हेतू असल्याचं ‘वृक्षवारी’चे शुभम शेलार सांगतात.

या उपक्रमासाठी वारीपूर्व काही महिन्यांपासून नागरिकांच्या सहभागातून देशी प्रजातींच्या झाडांच्या बिया संकलित केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या मदतीने या बियांपासून बीजगोळे (सीड बॉल्स) तयार केले जातात. आळंदीपासूनच या बीजगोळ्यांचे वाटप सुरू होते आणि वारीच्या प्रत्येक टप्प्यावर ते वारकऱ्यांना दिले जातात. माळरान, डोंगराळ भाग, मोकळी शेती अशा नैसर्गिक जागांमध्ये हे बीजगोळे टाकले जातात. यावर्षी तब्बल १२,००० बीजगोळ्यांचं वितरण झालं. यातून तुकोबांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा उपदेश प्रत्यक्षात येत भविष्यात वारीचा मार्ग अधिक हिरवागार आणि सावलीदार बनण्यास नक्कीच मदत होईल.

इंद्रायणी नदी ही वारीचा महत्त्वाचा साक्षीदार. तिच्या काठावरूनच पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू होतो. मात्र या पवित्र नदीत सातत्याने होणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, ‘इंद्रामाई’ या नावाने तरुणांनी एक उपक्रम हाती घेतला आहे. वारीचा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर, देहूतील इंद्रायणी घाट आणि परिसरातील रस्त्यांची स्वच्छता करणं, घाटावर प्लास्टिक व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावणं यासाठी ही तरुणांची टीम काम करते. इंद्रायणी नदीत होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी वारीत पथनाट्य सादर केलं जातं. दिंडीत सहभागी भाविकांपर्यंत इंद्रायणीच्या संवर्धनाचा संदेश देणारे फलक लावले जातात. या उपक्रमाचे समन्वयक अमर काटकर सांगतात, ‘हे कार्य फक्त वारीपुरतं मर्यादित न ठेवता वर्षभर चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंद्रायणीमध्ये येणाऱ्या औद्याोगिक सांडपाण्यावर उपाययोजना व्हावी यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे’. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि संतसाहित्याचे अभ्यासक अक्षय जाधव वारीतील तरुणांच्या वाढत्या सहभागाविषयी संतोष व्यक्त करतात. ‘वारीत आता सोशल मीडियामुळे मोबाइल, कॅमेरे घेऊन तरुण पिढी अधिक उत्साहाने सहभागी होताना दिसते, पण हे तंत्रज्ञान केवळ सेल्फीपुरतं न वापरता, त्यातून संतविचार, समता, भक्तीचा संदेश पसरवण्यातही त्यांचा सहभाग वाढतो आहे हे विशेष महत्त्वाचं आहे’, असं ते म्हणतात.

पंढरीची वाट चालणाऱ्या तरुणाईची ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. यावरून इतकं मात्र निश्चित समजतं की आजचे तरुण वारीत फक्त चालत नाहीत; ते वारी अनुभवतात, तिला कॅप्चर करतात, तितक्याच आत्मीयतेने शेअर करतात आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंगही करतात. आणि हे पाहून एक गोष्ट पुन्हा नव्यानं उमजते – पिढ्या बदलल्या, माध्यमं बदलली, पण पंढरीची ओढ मात्र तशीच टिकून आहे.
viva@expressindia.com