*अध्यक्षपदी सुभाष अहिरे यांची निवड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी येथील खान्देश विकास प्रतिष्ठानच्या वतीने २२ व २३ डिसेंबर रोजी पाचव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.
उद्घाटनासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर आणि विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी दिली. गुरूवारी जिजामाता हायस्कूलमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुभाष देवरे, खजिनदार मधुकर गर्दे, कवी जगदीश देवपूरकर, कवयित्री रत्ना पाटील, सहित्यिक सुभाष अहिरे, दिलीप साळुंखे, विश्राम बिरारी आदी उपस्थित होते.
एस.एस.व्ही.पी.एस. मैदानावर होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे  
यांचा अहिराणी भाषेत ‘गावनं गावपन’ हा वैचारिक लेख संग्रह तर ‘वयंबा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून जानकीनं लगीन, आहेर, मारू नका पोरले इत्यादी एकांकिकांचे लेखनही केले आहे. भटय़ानी माय, पस्तावा, जानकी, बुध्यांना पोऱ्यांनी मानता या त्यांच्या अहिराणी कथा विशेष गाजल्या आहेत. जानकीनं लगीन या त्यांच्या कथेवर त्यांनी स्वत: दिग्दर्शित केलेला अहिराणी चित्रपटही निघाला आहे. मराठी भाषेत मोलकरीण, सांगा पाहू चुकतंय कोण?, आयसोसायनेट, देश महान सरकार महान, भूकबळी, माहेर, या एकांकिका तर सुनेचं पहिल पाऊल या तीन अंकी नाटकाचे लेखनही त्यांनी केले आहे.
याशिवाय संशोधनपर पुस्तके प्रकाशित असून जागल्या ही कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे. अहिरे हे कन्नड येथील अहिराणी साहित्य अकादमीचे धुळे जिल्हाध्यक्ष असून इतर अनेक संस्थांवर पदाधिकारी आहेत. भडगाव तालुक्यातील वडजी येथे झालेल्या पहिल्या नवोदित ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.    

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aahirani sahitya sammelan in dhule