बाई, अहो कोण आलंय पाहिले का? असे अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी बाई अर्थात विजया मेहता यांना विचारले. बाई व्यासपीठावर बसल्या होत्या. दिव्यांच्या प्रखर उजेडात त्यांनी कपाळावर हात आडवा ठेवून पाहिले. पण त्यांना कोण आले आहे, ते कळले नाही. त्यावर नीना, रिमा म्हणाल्या, अहो बाई, नाना आला आहे.  नाना आला आहे, हे कळताच नानू, काही गडबड करू नकोस हं. शांत बस, असे बाईंनी म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
‘पंचम निषाद’तर्फे रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या विजयाबाईंच्या अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अभ्यास वर्गाला मंगळवारपासून सुरुवात झाली. बाईंचे विद्यार्थी असलेल्या नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, रिमा, मीना नाईक यांच्याबरोबर अभिनेत्री अश्विनी एकबोटे, संपदा जोगळेकर-कुलकर्णी, मनवा नाईक, अभिनेते सक्षम कुलकर्णी, भूषण प्रधान, गायिका राणी वर्मा आणि पन्नासहून अधिक युवा विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते.
बाईंनी व्यासपीठावर प्रवेश करताच सभागृहातील सगळे उठून उभे राहिले. अरे कशाला उभे राहताय. आणि हे काय सगळे इतके शांत का? मला भ्यायलात का? एक सोय म्हणून मी व्यासपीठावर आणि तुम्ही सर्व माझ्यासमोर बसणार आहात. आणि हो, मला बाई काही आता या वयात कोणाची नावे लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे सहभागी मुलींना ‘बाबी’ आणि मुलांना ‘बाबू’ म्हणून हाक मारेन, असे सांगत सगळ्यांच्या मनातील भीती त्यांनी एका क्षणात काढून टाकली.
हळूहळू बाईंनी रंगमंच आणि उपस्थितांच्या मनाचा ताबा घेतला. अत्यंत शांतपणे पण ठामपणे बाई बोलत होत्या. हा अभ्यासवर्ग, प्रशिक्षण शिबीर आहे. हे पूर्ण केले म्हणजे तुम्ही अभिनेता, दिग्दर्शक किंवा लेखक व्हाल असे समजू नका. एक सांगते की प्रशिक्षण दिले जात नाही. ते काही खिरापतीसारखे वाटता येत नाही. तुम्ही ते किती घेता त्यावर सर्व काही अवलंबून आहे. या पाच दिवसात आपण प्रयोग, निरिक्षण यातून शिकणार आहोत. आधी अनुभूती घ्या आणि त्यानंतरच अभिव्यक्त व्हा.
अभिनय आणि त्यातील बारकावे, कलाकार म्हणून त्या भूमिकेत शिरणे, ती भूमिका आपल्या अंगात भिनविणे आणि त्या अनुषंगाने बाई खूप काही बोलल्या. त्यांचे नुसते ऐकणेही खूप काही शिकवून गेले, अशीच भावना पहिले सत्र संपताना प्रत्येकाच्या मनात होती..  
‘पंचम निषाद’चे शशी व्यास, अभिनेते-दिग्दर्शक अजित भुरे या वेळी उपस्थित होते. नीना कुलकर्णी यांनी ‘महासागर’ या नाटकाच्या तालमीच्या वेळी तर रिमा यांनी ‘पुरुष नाटकाच्या वेळी बाईंकडून कसे शिकायला मिळाले, ते सांगितले. हा अभ्यासवर्ग येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And vijaya mehtas acting class started