‘मुर्खाचा दिवस’ अर्थात १ एप्रिल हा मित्र मंडळींची हक्काने मस्करी करण्याचा दिवस. पण एक तरुण नेमका याच दिवशी ठकसेनांच्या बतावणीला बळी पडला आणि त्यांनी या तरुणाला हातोहात लुबाडले. या प्रकारामुळे तो सर्वाच्याच चेष्टेचा विषय बनला. पण हिंमत न हारता त्याने जवळपास महिन्याभराने या ठकसेनांना शोधून काढले.
निखिल मोहिते (२१) हा दादरमध्ये राहणारा पदवीधर तरुण. पदव्युत्तर व्यवस्थापनाचंही शिक्षण तो घेत आहे. गेल्या १ एप्रिलला तो परळच्या ‘कीर्ती महल’ हॉटेलसमोरून क्लासला जात होता. त्यावेळी दोन तरुणांनी त्याला रस्त्यात गाठून कुल्र्याला जाण्याचा पत्ता विचारला. पण कुल्र्याला पायी जाता येणार नाही असे सांगत, निखिलने त्यांना ट्रेनने जाण्याचा सल्ला दिला. यानंतर काही क्षणातच ते दोघे पुन्हा निखिलकडे आले. थोडं बोलायचे आहे, असे सांगत त्यांनी निखिलला आपल्या सापळ्यात गुंतविण्यास सुरुवात केली.
आम्ही एका ठिकाणी काम करतो. आमच्या मालकाने आम्हाला पगार दिला नाही म्हणून आम्ही त्याच्या कपाटातील १ लाख रुपये चोरून पळ काढलाय. आम्हाला या पैशाने सोनसाखळी घ्यायची होती. पण जर सराफाच्या दुकानात गेलो तर पकडले जाऊ. या एक लाखाच्या मोबदल्यात तुझ्या गळ्यातील सोनसाखळी आम्हाला देशील का असे त्यांनी गोड आणि आर्जवी शब्दात निखिलला सांगितले.
निखिलच्या गळ्यातील सोनसाखळी १५ हजार रुपयांची होती. १५ हजारांच्या सोनसाखळीच्या बदल्यात एक लाख रोख मिळणार म्हटल्यावर त्याला मोह आवरला नाही. तो त्यांच्या सापळ्यात अडकला. त्या दोघांनी त्याच्या समोर नोटांचे पुडके धरले होते. निखिल तयार झाला. त्यांनी नंतर हातचलाखीने ते बंडल एका रुमालात गुंडाळून निखिलच्या हातात दिले. काही मिनिटांतच हा प्रकार घडला. ते दोघे निघून गेले आणि निखिलही खुशीत आपल्या क्लासच्या दिशेने निघाला. बाथरूममध्ये जाऊन त्याने तो रुमाल उघडला तर त्यात त्याला नोटांऐवजी केवळ कागदी नोटांचे तुकडे सापडले.
फसवलो गेल्याचे लक्षात येताच निखिल हवालदिल झाला. त्याने त्वरीत भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही सुरुवातीला आज १ एप्रिल आहे. तुझ्या मित्रांनी मस्करी केली असेल, असे सांगून त्याला उडवून लावले. मात्र नंतर त्याचा गुन्हा दाखल करून घेतला.
भर रस्त्यात अशा पद्धतीने आपल्याला हातोहात फसवले गेले यावर खुद्द निखिलचाही विश्वास बसत नव्हता. मित्रांमध्येही तो चेष्टेचा विषय बनला.
मित्रमंडळींची चेष्टा आणि पोलिसांचा थंड प्रतिसाद यामुळे निखिल निराश न होता जिद्दीला पेटला. काहीही झाले तरी मी या ठकसेनांना शोधून काढेनच, असा चंग त्याने बांधला. तो पोलीस नव्हता, की गुप्तहेर नव्हता. पण असे ठकसेन पुन्हा अन्य सावज शोधण्यासाठी या भागात येऊ शकतील, असा त्याला विश्वास होता.
ज्या ठिकाणी त्याला फसवले त्या कीर्ती महल परिसरात तो दररोज जाऊ लागला. जसा वेळ मिळेल तसा तो त्या ठिकाणी त्यांना शोधू लागला. तासन् तास तो या भागात फिरू लागला. आज ना उद्या ते दोघे ठकसेन इथेच भेटतील, अशी खात्रीच त्याला होती. त्याच्या मित्रांनी यावरूनही त्याला वेडय़ात काढले. पण निखिल ठाम होता.
अखेर त्याच्या प्रयत्नांना २६ मे रोजी यश आले. गर्दीत त्याला तेच दोन ठकसेन एका सावजाला गंडवत असल्याचे दिसले. यावेळी त्यांचा सावज मेहबूब इद्रिस नावाचा टेलर होता.
निखिलला फसवले त्याच युक्तीने ते मेहबूबलाही गंडवत होते. ते पाहताच निखिलने मदतीसाठी आरडाओरडा केला. पालिकेच्या एफ प्रभागाचे सुरक्षा रक्षक आणि इतरांच्या मदतीने त्याने या दोघांना पकडून ठेवले.
पोलिसांना फोन करून बोलावण्यात आले. गोपाल सुतार आणि गौरीशंकर धोंदरा या दोघांना पोलिसांना अटक केली. हे दोघे सराईत ठकसेन असून त्यांनी अनेकांना अशाच पद्धताने गंडविल्याची माहिती समोर आली. ज्यांनी फसवले त्यांना अखेर निखिलने स्वत:च शोधून काढले होते!