महापालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा कार्यालयाच्या परिसरात आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्याला शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच सामान्य नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विज्ञानाचे ज्ञान वाढावे या उद्देशाने आयोजित या मेळाव्याचे हे सोळावे वर्ष आहे. या मेळाव्यात महापालिकेच्या २८ शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित शंभर प्रयोग सादर केले आहेत. हे विद्यार्थी आपले नाव, प्रयोगाचे नाव सांगून व प्रात्याक्षिक करून दाखवत असल्याने तो प्रयोग अधिकच सोपा वाटतो. विशेष म्हणजे, प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखवताना विद्यार्थी जो संवाद साधतात तो मने जिंकून घेतो. प्रयोग सादर करत असलेल्या विद्यार्थ्यांना आधी प्रशिक्षण देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले ते विद्यार्थी मागासलेल्या परिसरात व झोपडपट्टीत राहणारे आहेत.
विशेषत मागासलेल्या आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी नसते. त्यामुळे त्यांच्यात विज्ञानाविषयी जागृती निर्माण व्हावी, अंधश्रद्धेचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शंभर विद्यार्थ्यांची शाळेमार्फत निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना सतत सात दिवस प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळेच हे विद्यार्थी सोमलवार, हडस यासारख्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांपुढे आपल्या प्रयोगाचे आत्मविश्वासपूर्ण प्रात्याक्षिक करून दाखवत आहेत. रामदासपेठेतील बॅरिस्टर शेषराव वानखेडे विद्यानिकेतनमधील इयत्ता नववीची विद्यार्थीनी नंदीनी रमेश बोंद्रे हिने ‘आवाज किधरसे आयी’ , राममनोहर लोहिया हायस्कूलमधील नववीचे विद्यार्थी कुणाल भीमराव ढोके आणि मितेश गोंडाने यांनी ‘वॉटर स्प्लिंकर’, कामगार नगर उर्दू हायस्कूलमधील सबीना नाज हिने ‘स्कॅटिलेन’ (मानवी शरीर रचना) हा प्रयोग सादर केला आहे. सबीनाने मानवी शरीराची रचना कशी असते हे दाखवण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग केला आहे. याशिवाय ‘संख्याचे वर्गिकरण’, गणितावर आधारित ‘विस्तार सूत्र’, ‘पाढे तयार करण्याची सोपी पद्धत’, ‘हायप्रेशर फाऊंटेन’, ‘नंबर ऑफ इमेजेस इन टू मिरर’, ‘संवाहन धारा’, ‘एनर्जी ऑफ ट्रान्सफर’ आदी विज्ञान प्रयोग आकर्षक ठरले आहेत. विशेषत हे प्रयोग सादर करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू व पदार्थाचा वापर केला आहे.
असोसिएशनचे सचिव व विज्ञान मेळाव्याचे प्रणेते सुरेश अग्रवाल म्हणाले, मागासलेल्या व झोपडपट्टीतील मुलांमध्ये आपण विज्ञानाच्या लायक नाही, अशी हीन भावना असते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे विद्यार्थी विज्ञानात मागे पडतात. त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, विज्ञानाविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्याला निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुज सिन्हा यांनी भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. गेल्या वर्षी ३३ हजार विद्यार्थी व पालकांनी भेट दिली होती. यावर्षी ४० ते ४५ हजार विद्यार्थी या मेळाव्याला भेट देतील, अशी अपेक्षा आहे.
हडस हायस्कूलमधून विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून निवृत्त झालेले विनायक ढोक हे या मेळाव्याचे परीक्षक म्हणून काम बघत आहेत. उत्कृष्ट तीन प्रयोगाला खासदार दत्ता मेघे यांच्याकडून बक्षीस दिले जात असल्याचेही ढोक यांनी सांगितले. या मेळाव्यात भोपाळ येथील एकलव्य प्रकाशनाचा पुस्तकाचा स्टॉल लागलेला आहे. या स्टॉलमध्ये विज्ञानावर आधारीत विविध प्रयोगांची पुस्तके आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व सामान्य नागरिकांनी पुस्तके खरेदी करावीत, असे आवाहन संयोजिका अर्चना रस्तोगी यांनी केले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका दीप्ती बिस्ट, समन्वयक राजेंद्र पुसेकर यांच्यासह महापालिकेचे अन्य शिक्षक प्रयत्नशील आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2013 रोजी प्रकाशित
अपूर्व विज्ञान मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
महापालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा कार्यालयाच्या
First published on: 29-11-2013 at 09:46 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apurva science exhibition gets enthusiastic response