महावितरणचा उदगीर येथील सहायक अभियंता गणपत पंडित मोतेवाड याला २० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदविण्यात आला.
उदगीर येथील तुळशीराम ज्ञानोबा पडीले यांच्या समाधान हॉटेलमध्ये विविध वीज उपकरणे असताना बिल कमी येत होते. ते तसेच यावे व वीज खंडित होऊ नये, यासाठी सहायक अभियंता मोतेवाड (वय ४५) याने पडीलेकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता शिवाजी चौक उदगीर येथे तानाजी बेंबडे या मध्यस्थामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एन. जी. अंकुशकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मोतेवाड याला पकडण्यात आले.