मनुष्यबळ व्यवस्थापनावर राष्ट्रीय चर्चासत्रातील सूर
वाणिज्य व व्यवस्थापनाचे शिक्षण घेताना प्रत्यक्ष कृती व अनुभवाशिवाय ते पूर्ण होत नाही. गुणवत्ता टिकवताना शिक्षणासोबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यावहारिक भाषा कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास व वातावरण निर्मितीवर भर देण्याची गरज गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केली.
नाशिकरोड येथील चांडक-बिटको महाविद्यालयात मनुष्यबळ व्यवस्थापन विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. संकटांचा मुकाबला करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता तसेच आस्थापनांचा कामगारांकडे बघण्याचा दृष्टिकोन परिपूर्ण व स्वयंपूर्ण असावा. स्वत: झिजून आपली क्षमता वाढवून वेळोवेळी सिद्ध केल्यास गुणवत्ता वाढीस निश्चित हातभार लागेल, असेही डॉ. गोसावी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एम. डी. औटी यांनी चर्चासत्रातील विविध तांत्रिक सत्रांविषयी माहिती दिली. ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. भूषण भगत यांनी केले. आभार डॉ. डी. जी. बेलगावकर यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय परिषदेचे इतिवृत्त, स्मरणिका तसेच राष्ट्रीय व राज्यपातळीवरील चर्चासत्रांच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
चर्चासत्राच्या पहिल्या तांत्रिक सत्रात कामगारांची निवड करण्याच्या पद्धतीविषयी इनोव्हा रबर प्रायव्हेट लिमिटेडचे मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक संजय कुलकर्णी, प्रा. रहाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापकांनी संशोधनपर प्रबंध सादर केले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, प्रा. महेश औटी हेही उपस्थित होते. दुपारच्या सत्रात कुशल मनुष्यबळ विकास विषयावर एस. एस. एन्टरप्रायजेसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक धनंजय बेळे, बीवायके महाविद्यालयातील विपणन विभागप्रमुख डॉ. एस. एम. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापकांनी प्रबंध मांडले.