विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर शहरात गुरुवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यावरून जाणाऱ्यांची तारांबळ उडाली. वातावरण अचानक बदलल्याने अनेकांनी रेनकोट, छत्र्या बाहेर काढल्या. विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये दोन दिवसात चंद्रपूर वगळता काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने थंडी आणि बोचरे हवामान आहे. ढगाळ वातावरणाने काही ठिकाणी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.  
बुलढाणा जिल्ह्य़ात तर लहान आकाराच्या गाराही पडल्या आहेत. या पावसामुळे तूर, धान व कापसाचे नुकसान होत आहे, तर उशिरा पेरणी झालेल्या गहू, हरभरासह इतर रब्बी पिकांना मात्र पोषक ठरत आहे. अकोल्यात बुधवारी सायंकाळी अकाली पाऊस आल्याने वातावरणात चांगलाच बदल झाला होता. त्यानंतर गुरुवारीही पावसाळी वातावरण होते. वर्धा शहर व परिसरात बुधवारी रात्री व आज दुपारी पावसाने हजेरी लावल्याने गारठय़ात भरच पडली. अभ्राच्छादित वातावरण होते, मात्र शेतातील हरभरा व गहू पिकावर याचा वाईट परिणाम झाला नसल्याने कृषी विभागाचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्य़ात बुधवारी सायंकाळपासून तर आज, गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी व दुपारच्या सुमारास गोंदिया शहर व लगतच्या तालुक्यात तुरळक पावसाने हजेरी लावली. आज दिवसभर जिल्ह्य़ात गारठा होता. या वातावरणाचा फटका मिरची व हरभऱ्याला बसला आहे.
अमरावती शहरात बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात अचानकपणे बदल झाला. काही भागात गाराही बरसल्या. थंडगार बोचऱ्या वाऱ्यामुळे अमरावतीकर गारठून गेले आहेत. गेल्या देान दिवसांपासून शहरातील वातावरण बदलून गेले आहे. मकरसंक्रातीनंतर थोडय़ा उकाडय़ाचा अनुभव येत असतानाच रात्री मध्यम सरींना वातावरणात पुन्हा गारवा निर्माण केला. काही भागात पावसासह गाराही बरसल्या. पहाटे मेघ आणि धुक्याचे सावट, दुपारी उन्हातही थंड वाऱ्यामुळे तापमानात वाढ झाली नाही. सायंकाळपर्यंत थंडगार वाऱ्यांमुळे चांगलाच गारठा अमरावतीकरांनी अनुभवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloudy weather in vidharbha heavy rain in nagpur