आयुक्त म्हणतात घोटाळा नाही
कल्याण- डोंबिवली महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचे पत्र आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी गैरव्यवहाराचा तपास करणारे म्हाडाचे मुख्य अभियंता यांना पाठविल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. असे असताना आयुक्तांनी या प्रकल्पाचे समर्थन करणारे पत्र पाठविल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.
 काँग्रेस नगरसेवक नवीन सिंग यांनी पालिकेच्या झोपु योजनेत घर वाटप करताना गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीच दाखल केल्या आहेत. या योजनेतील लाभार्थीच्या यादीत सुमारे ४५० घुसखोर घुसविण्यात आले आहेत, अशाही तक्रारी आहेत.
तसेच प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर नगरविकास विभागाने याप्रकरणी म्हाडाच्या मुख्य अभियंत्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
 या प्रकरणाची सविस्तर माहिती आयुक्त सोनवणे यांनी म्हाडाच्या मुख्य अभियंत्यांना पाठवून नगरसेवक सिंग यांनी केलेल्या पाचही मुद्दय़ांचे सविस्तर खंडन केले आहे.
दरम्यान, पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत निविदा काढण्यापासून, समंत्रक नेमण्यापासून ते लाभार्थ्यांना घरे देण्यापर्यंत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार घडले असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी तसेच ठेकेदार यामुळे चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी शहरातील काही नागरिकांनी न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation hiding the fraud in zopu scheme