प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकण्याचे बंधन लागण्याचा हक्क महापालिकेला नसल्याचे कारण पुढे करून महापालिकेने पीओपी मूर्तीच्या विक्रीचा मार्ग खुला केल्याने आता मातीच्या मूर्ती विकणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढविण्याची भीती निर्माण झाली आहे. पीओपी मूर्तीच्या विसर्जनामुळे निर्माण होणाऱ्या जलप्रदूषणाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्याचा एक मधला मार्ग महापालिकेने शोधला असला तरी कृत्रिम तलावांच्या उपलब्धतेवरही महापालिकेची पाटी कोरीच आहे.
नागपूर शहरात फक्त सोनेगावातच एकमेव कृत्रिम तलाव असून यात दहा फूट उंचीची गणेशाची मूर्ती कशी विसर्जित करावी, असा प्रश्न गणेशमंडळांना पडणार आहे. जलसाठय़ांच्या जतनासाठी महापालिकेने उचललेले पाऊल स्वागतार्ह असले तरी येणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान महापालिकेला मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम तलावांची निर्मिती करून देणे मोठे आव्हान ठरणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यांचे अवशेष नंतर पाण्यावर तरंगू लागतात. गेल्या कित्येक वर्षांपासून नागपुरातील तलावांचे यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. शहरात महापालिकेच्या अखत्यारितील १२ पैकी गांधीसागर, सोनेगाव, सक्कदरा, नाईक तलाव आणि फुटाळा या प्रमुख तलावांसह एकूण सात तलावांमध्ये मूर्ती विसर्जन केले जाते. सोनेगावात एकमात्र कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. शहराचे चौफेर वाढलेले स्वरुप पाहता हजारो गणेश मंडळे आणि घराघरातील गणेशमूर्तीचे एकाच तलावात विसर्जश शक्यता नाही.
  शहरात ३ हजारावर गणेश मंडळे आहेत. अनेक गणेश मंडळे १० फुटांपेक्षा जास्त उंचीची गणेशमूर्ती बसवितात. काही मंडळांनी २५ फुटापर्यंतच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून विक्रमही नोंदविले आहेत. मुंबईत हा प्रश्न उद्भवत नाही कारण अथांग समुद्राचे वरदान मुंबईला मिळालेले आहे. त्यामुळे मोठय़ा आकाराच्या गणेशमूर्तीसाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करणार यावर अद्याप कोणताही प्रकाशझोत टाकण्यात आलेला नाही. महापालिकेच्या कृत्रिम तलावात २५ ते ३० हजार लिटर पाणी साठवून त्यात मूर्ती विसर्जन करण्याची सोय आहे महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर महापालिकेच्या आगामी बैठकीत विचार केला जाणार असून जास्तीत जास्त प्लास्टिकच्या टाक्या विसर्जनासाठी उपलब्ध करून दिल्या जातील, असा मार्ग शोधला जाऊ शकतो. अनेक नगरसेवकांना त्यांच्या भागातील गणेशमंडळांच्या मूर्तीच्या विसर्जनाची चिंता भेडसावू लागली आहे. एकता गणेश मंडळातर्फे शहरातील सर्वाधिक उंचीची गणेश मूर्ती दरवर्षी बसविली जाते. त्याचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेजवळ पर्यायी व्यवस्था नाही.