जेरी पिंटो संपादित आणि पेग्विन बुक इंडियाने प्रकाशित केलेल्या ‘दि ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ या पुस्तकात अभिनेते-दिग्दर्शक दिवंगत दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रातील एका प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. या आत्मचरित्राचे शब्दांकन अनिता पाध्ये यांनी केले आहे. चित्रपटसृष्टीला महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कलाकारांवर जी पुस्तके लिहिली गेली, त्यातील काही निवडक पुस्तकांतील एखादे प्रकरण, उतारे, महत्त्वाचे लेख यांचा या पुस्तकात समावेश आहे. दादा कोंडके यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी कलावंताचा समावेश या पुस्तकात केला गेला आहे. ‘एकटा जीव’ या पुस्तकातील ‘आशा निराशा’ या प्रकरणाचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. ‘दि ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
या इंग्रजी पुस्तकात चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी, चंदेरी दुनियेतील त्यांचा प्रवास या अनुषंगाने केलेले लेखन वाचायला मिळणार आहे. ‘दि ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ या पुस्तकात हिंदी चित्रपट सृष्टीतील देवआनंद, राजकपूर, मीनाकुमारी, दिलीपकुमार, बलराज सहानी आदींवरील मजकुराचा समावेश आहे. दादा कोंडके यांच्या रुपाने मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंताला या इंग्रजी ग्रंथात स्थान मिळाले आहे. दरम्यान दादा कोंडके यांचा या पुस्तकात समावेश झाल्याने ते आता जागतिक पातळीवर पोहोचले आहेत. हा  दादांचा सन्मान तर आहेच पण त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाचीही ती पावती आहे. पेग्विनने ‘एकटा जीव’ या पुस्तकाची दखल घेतली ही दादा कोंडके यांच्या चाहत्यांसाठी आणि मराठी साहित्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब असल्याचे लेखिका अनिता पाध्ये यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.