गेल्या काही दिवसांत रस्त्यांवरील दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता कमी होऊन मुंबईतील रस्ते अंधारात बुडू लागले आहेत. वाढते प्रदूषण, इमारतींची वाढणारी उंची आणि वृक्षछाटणीतील निष्काळजीपणा त्यास कारणीभूत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘अंधाऱ्या वाटां’मध्ये वाटमाऱ्या वाढल्या आहेत. परिणामी आता दिवाबत्तीसाठी नवे धोरण आखण्याची आवश्यकता आहे.
एकेकाळी मुंबईतील रस्त्यांवर मिणमिणते दिवे असत. त्या काळी रस्ते प्रकाशाने उजळून निघण्याऐवजी अंधारच अधिक गडद होत असे. कालांतराने या मिणमिणत्या दिव्यांची जागा विजेच्या दिव्यांनी घेतली आणि यथावकाश मुंबईतील रस्ते लख्ख प्रकाशाने उजळून निघाले. जसजसा मुंबईचा विकास होत गेला, तसतसे रस्ते मोठे होत गेले आणि दिव्यांची संख्याही वाढत गेली.
पूर्वी रस्त्यांवरील दोन दिव्यांच्या खांबांमध्ये सुमारे ३५ मीटर अंतर ठेवले जात असे. काही काळाने हे अंत २५ मीटर करण्यात आले. दिव्यांची संख्या रस्त्याच्या रुंदी आणि लांबीवर अवलंबून असते. साधारण ३० फूट रुंदीच्या रस्त्यावर एका बाजूला रांगेत २५ मीटर अंतरावर दिव्याचे खांब उभारले जातात. तर ४४ मीटर रुंदी असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा २५ मीटर अंतरावर दिवे बसविण्यात येतात. मात्र दुतर्फा बसविलेले दिवे एकमेकासमोर येणार नाहीत याची काळजी घेतली जाते. ६० फूट रुंद रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर, तर ९० फूट रुंद रस्त्याच्या मध्यभागी दोन्ही बाजूला दिवे बसविले जातात. महामार्गाची रुंदी अधिक असल्याने (१२० फूट रुंदी) आणि तेथे वाहतुकीची वर्दळ असल्याने अधिक दिवे बसविण्यात येतात. मात्र आता २५ मीटर अंतराचा निकषही बाद ठरून रस्ते पुन्हा अंधारात हरवू लागले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू झाली आहेत. तसेच वाहनांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. वाहनांचा धूर आणि धूळ यामुळे रस्त्यांवरील दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता कमी होते. मात्र वाहतुकीचा जोर ओसरल्यानंतर वाहनांचा धूर हवेत विरतो आणि धूळही जमिनीवर बसते. मग प्रकाशाची तीव्रताही वाढते.
अनेक छोटय़ा मोठय़ा रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाढलेले वृक्ष दिव्यांच्या प्रकाशात अडथळा बनत आहेत. एकेकाळी चंद्रप्रकाशात रस्ते न्हाऊन निघत असत. परंतु उंच इमारती चंद्रप्रकाशात अडसर बनूल्या आहेत. या समस्येवर तोडगा म्हणून महापालिकेचे अधिक तीव्रतेचे दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यामुळे दिवाबत्तीपोटी खर्च वाढू लागला आहे. त्यामुळे आता दिवाबत्तीसाठी नवे धोरण आखण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.