गौरी सुत..योगी गणेश.. एकदंत, भालचंद्र.. पेशवा चक्र.. गजगणेश, टिटवाळा गणेश यासह गणरायाच्या विविध नावांना आकार देणाऱ्या गणेशमूर्ती बाजारात गणेशभक्तांचे लक्ष वेधत आहेत. मोदकावर स्वार असलेला गणपती यंदा प्रथमच दाखल झाला असून ग्राहकांची त्याला विशेष मागणी आहे. कारागिरांची टंचाई, कच्चा मालाचे वाढलेले भाव यामुळे मूर्तीच्या दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कायम आहे.
‘श्रीं’च्या आगमनाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी राहिला असताना शहर परिसरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेरील आवार, मेनरोड, नाशिकरोड येथील काठे गल्ली यासह अन्य ठिकाणी गणरायाची विविध रुपे बाजारपेठेत दाखल झाली आहेत. गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक अशा शाडूमातीच्या मूर्ती विषयी प्रबोधन करण्यात येत असल्याने ग्राहकांची पहिली पसंती शाडूमातीच्या मूर्तीला आहे. या शिवाय विविध सामाजिक संघटनांनी शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळांचे ठिकठिकाणी आयोजन केले. त्या अंतर्गत अनेकांनी मूर्ती तयार केल्या. शेकडोंच्या संख्येने निर्मिलेल्या या मूर्ती गणेशभक्त आपल्या घरी विराजमान करण्याच्या तयारीत आहे. त्याचा काहीअंशी परिणाम गणेश मूर्तीच्या खरेदी-विक्रीवर झाल्याचे दिसते. दुसरीकडे, ग्राहकांच्या मागणीनुसार पौराणिक ग्रंथात उल्लेख केलेल्या गणरायांच्या विविध नावांना आकार देत मूर्तीकारांनी आपल्या सृजनतेचा अविष्कार पुन्हा दर्शविला. गौरी सुत, लंबोदर, गजमुख, एकदंत, वक्रतुंड, रिध्दी-सिध्दीचा, पेशवाई चक्र असलेला, टिटवाळा बैठक असणारा, सनातन गणेशासह लालबागचा राजा, नाशिकचा राजा, श्री सिध्दीविनायक गणेश, ढोल्या गणपती असे विविध स्वरूपातील गणरायांच्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधत आहे. पारंपरिक गणेश मूर्तीवर यंदा टीव्ही मालिकांची छाप असून ‘मल्हार फेम’ गणरायालाही ग्राहकांकडून विशेष मागणी आहे. यंदा प्रथमच मोदकावर स्वार असलेला बालगणेश बाजारात दाखल झाला आहे. या शिवाय कार्टुनमधील बालगणेश बैलगाडी, मुषकावर तर काही ठिकाणी बॉलवर विराजमान आहेत. बच्चे कंपनीची आवड पाहता गणरायाने विविध रुपे धारण केली असली तरी पालकांवरील धार्मिक पगडय़ामुळे अशा काही मूर्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
साधारणत: १०१ रुपयांपासून २५ ते ३० हजार रुपयांपर्यंतच्या विविध आकारातील उंचीतील गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. कच्चा माल, इंधन दरवाढ, कारागिरांची कमतरता आदी कारणांमुळे गणपती मूर्तीच्या किंमतीत १५ टक्के वाढ झाली असल्याचे फावडे लेनमधील मूर्ती विक्रेते पुंडलिक वाणी यांनी सांगितले. मूर्तीला कुंदन, नक्षीकाम यासह सोवळ्याला पेपर वेलवेट असा साज चढवायचा असेल तर ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहे.