बोरिवलीमध्ये सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये पावसाळा नसतानाही पाण्याची गळती सुरू झाली असून तेथील रुग्ण सेवा धोक्यात आली आहे.रुग्णालयात एकाच विभागात क्षय आणि ‘एचआयव्ही’ रुग्णांची सरमिसळ झाली असून ही रुग्णांच्या दृष्टीने गंभीर बाब म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने उघडकीस आणली आहे.
येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या अधिकृत केसपेपरवर दाखल करून घेतले जाते व भगवती रुग्णालयातील कामगार-कर्मचाऱ्यांकडून त्याची चिकित्सा व उपचार केले जातात. या रुग्णालयातील काही विभागांमध्ये क्षय, कर्करुग्णांबरोबर इतरही रुग्णांना ठेवण्यात येत आहे. भगवती रुग्णालयाच्या नावाने एकाही रुग्णाची नोंद होत नसताना या रुग्णालयाच्या भांडारातील औषधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येत आहेत.
औषध पडताळणी दरम्यान मागविलेल्या औषधांचा हिशेब परिचारिकांना द्यावा लागतो आणि १०० रुपयांची औषधे गहाळ झाली, तरी परिचारिकांना पैसे भरावे लागतात. त्यामुळे भगवती रुग्णालयातील परिचारिका घाबरल्या आहेत. हा गंभीर प्रश्न प्रशासनाने सोडवावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी केली आहे. डॉ. आंबेडकर रुग्णालयाचे अलीकडेच उद्घाटन करण्यात आले. पण रुग्णालयाच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. या रुग्णालयात उपचारासाठी मोठय़ा प्रमाणावर रुग्ण येत आहे. पण रुग्णालयात पालिकेच्या निकषानुसार कामगार-कर्मचाऱ्यांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले. नव्या रुग्णालयातील समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी चिटणीस यांनी अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.