सुप्रसिध्द हिंदी कवी व शायर डॉ. गणेश गायकवाड यांची गजल मानवी वेदना व संवेदनांचा वेध घेत असल्याने तो खऱ्या अर्थाने मानवी मूल्यांचा जागर आहे. त्यांची गजल राष्ट्रीय पातळीवर आपली नवी ओळख निर्माण करेल, असे प्रतिपादन हिंदी व उर्दू साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. दामोदर खडसे यांनी केले.
गर्दे सभागृहात डॉ. गणेश गायकवाड यांच्या ‘धूप का मुसाफिर’ या गजल संग्रहाचे प्रकाशन दामोधर खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘बारोमास’कार डॉ. सदानंद देशमुख, प्रख्यात हिंदी कवी अशोक अंजूम यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. गणेश गायकवाड हिंदी आणि उर्दू भाषेतील प्रयोगशिलता व चपलख शब्दरचनेने थेट ह्रदयालाच साद घालतात. त्यांची गजल अनुकरणीय नसून ती वेगळ्या धाटणीची व शैलीची आहे. ही गजल देश पातळीवर आपली नवी ओळख निर्माण करेल, असे खडसे म्हणाले.
बुलढाणा शहर-ए-गजल अकादमीच्या वतीने देशपातळीवरील हिंदीचे कवी व समीक्षक अशोक अंजूम यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना शाम-ए-गजल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. दामोदर खडसे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, अशोक अंजूम, नरेंद्र लांजेवार, अमीम शाह रायपुरी यांच्या हस्ते ‘धूप का मुसाफिर’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सदानंद देशमुख यांनी डॉ. गणेश गायकवाड यांच्या सृजनशील लेखनाचा आढावा घेऊन त्यांची गजल राष्ट्रीय व सामाजिक एकतेसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. अलीगढ येथून आलेले अशोक अंजूम यांनीही डॉ. गणेश गायकवाडांच्या शायरीचे वेगळेपण त्यांच्या गजलांच्या माध्यमातून उलगडून दाखविले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉ. गायकवाडांची शायरी येथून पुढे अभ्यासली जाईल, असा आशावादही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.डॉ. गणेश गायकवाड यांनी त्यांच्या मनोगतातून आजच्या सामाजिक वातावरणापासून लेखनासाठी मोठय़ा प्रमाणात विषय मिळत असल्याचे सांगून वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच नवनवीन विषयांवर शायरी करण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. या प्रकाशन समारंभास मुनव्वर राणा येणार होते, परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने येऊ शकले नाही, यांची खंतही डॉ. गायकवाड यांनी व्यक्ती केली. पुस्तक प्रकाशनानंतर याप्रसंगी दामोदर खडसे, अशोक अंजूम, डॉ. गणेश गायकवाड, अजीम शाह इत्यादींनी त्यांच्या विविध रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे संचालन रणजितसिंग राजपूत यांनी, तर काव्यवाचनाचे संचालन अजीम शाद रायपुरी यांनी केले. आभार नरेंद्र लांजेवार यांनी मानले.