जि.प.ने गेल्या ७ नोव्हेंबरच्या सभेत नाटय़गृह, व्यापारी संकुल बांधकामाचा प्रस्ताव घेतला. आता या प्रस्तावाच्या वादाला तोंड फुटले आहे. अजून जमीन जि. प.च्या नावावर नाही. पारित प्रस्ताव विषयपत्रिकेवर घेतला नव्हता. या सभेच्या कार्यवृत्तान्ताला अजून मान्यता मिळाली नसताना लगेच वास्तुविशारद नेमण्याची प्रक्रिया चालू झाल्याने २२ जानेवारीला जि. प.च्या सभेत नाटय़गृह व व्यापारी संकुलाचा प्रश्न गाजणार असल्याचे चित्र आहे. जि. प.च्या ७ नोव्हेंबरच्या सभेतील प्रस्तावाला जि. प. सदस्य गजानन देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचे ठरविले आहे. देशमुख यांनीच ही माहिती दिली. देशमुख म्हणाले की, हा प्रस्ताव सभेच्या विषयपत्रिकेवर स्पष्टपणे बीओटी तत्त्वावर घेतला नाही. ठराव क्रमांक ४१ ऐनवेळच्या विषयात घेतला. धोरणात्मक निर्णय ऐनवेळच्या विषयात घेता येत नाही. तसेच सभागृहाने मान्यता दिली नसताना नाटय़गृह व व्यापारी संकुल बांधकामासाठी वास्तुविशारद नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व त्रुटी आपण प्रशासनाकडे लेखी स्वरुपात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच २२ जानेवारीची सभा वादळी होणार असल्याचे चित्र आहे.