‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या संगीतावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी केंद्रातील कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांनी  विष्णुदास भावे या नाटय़गृहात नृत्याविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. हे नृत्य नवी मुंबईपुरते मर्यादित राहिले नसून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. विष्णुदास भावे नाटय़गृहात गुरुवारी आर्ट अ‍ॅड फॅशनच्या वतीने महाराष्ट्र आयकॉन २०१४ चे पुरस्कार देण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश कोठारे, मी मराठी वाहिनीचे सूत्रधार कांचन अधिकारी, सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड, मराठी पाश्र्वगायक आदर्श शिंदे, अभ्युदय बँकेचे माजी संचालक संदीप घनदाट, आरोग्य विभागचे न्यूरोसर्जन अतुल गोयल, पत्रकार समाधान साळवे, उद्योजक सतीश वैद्य, शिक्षण क्षेत्रात प्रताप खाडेभराड यांना पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या वेळी दिग्दर्शक कांचन अधिकारी यांच्या ‘हुतुतू’ या आगामी मराठी सिनेमातील ‘आयटम साँग’ची चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच ‘दुनियादारी’ सिनेमामधील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे गाणं आदर्श शिंदे यांनी गाऊन रसिकांची मने जिंकली. त्याचप्रमाणे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या वाद्यवृंदाचा कलाविष्कार सादर करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभलेले ढोलकीवादक राजेश चिखलकर यांच्या वादनावरील प्रभुत्व पाहून प्रेक्षक थक्क झाले.